श्रीमहाराजांचे प्रमुख अधिकारी शिष्य

पू. श्री तात्यासाहेब केतकर

तात्यासाहेबांचे चरित्र थोडक्यात सांगायचे म्हणजे तात्यासाहेब विद्वान नसून विद्वानांना वंद्य होते, संपत्ती नसून श्रीमंत होते, पुढारी नसून मार्गदर्शक होते, महंत नसून विरक्त होते, संन्यासी नसून निष्काम होते आणि योगादिकांचा अभ्यास न करताही केवळ शरणागत होऊन सद्गुरूंशी एकरूप झाले होते. व्यवहाराच्या दृष्टीने ते प्रपंचात राहिलेले दिसले, परंतु नाममात्र व्यवहाराचे पांघरूण घेऊन आपल्या आचाराने, विचाराने व उच्चाराने त्यांनी अक्षरश: हजारो प्रापंचिकांना नामाला लावले. श्रीतात्यासाहेबांनी आपला गृहस्थाश्रम वेदान्ताच्या आचरणाला शोभेल अशा आदर्श पद्धतीनें चालवला. श्रीसद्गुरूंची कृपा ज्याच्यावर होते त्याचा प्रपंचच कसें परमार्थाचें रूप घेतो याचें हे प्रत्यक्ष उदाहरण आहे.

तात्यासाहेबांचा जन्म २२ जानेवारी १८८५ रोजी माघ शुद्ध सप्तमीस (रथसप्तमी) झाला. शालेय शिक्षण गदगला व पुढे बडोद्यास झाले. तात्यासाहेबांचे वडील श्री. भाऊसाहेब केतकर हे निवृत्त झाल्यावर श्रींच्या सांगण्यावरून १९०३ साली सहकुटुंब गोंदवल्यास येऊन राहिले. शिक्षण आटोपते घेऊन तेही गोंदवल्यास श्री. भाऊसाहेबांपाशी येऊन राहिले. ते प्रथम गोंदवल्यास आले तेव्हा श्रीमहाराजांचे दर्शन होताच त्यांना जो आनंद वाटला त्याचा पूर्ण व कायमचा ठसा त्यांच्या अंत:करणावर उमटला. गोंदवल्यास येऊन राहिल्यावर तात्यासाहेबांचे लग्न श्री. गोखले यांच्या मुलीशी श्रींच्या पसंतीने ठरले. ९ मार्च १९०४ रोजी आधी ठरलेल्या गोरजमुहूर्ताऐवजी अकल्पित रीतीने रात्री १२ च्या सुमारास श्रींनी मोठ्या कौतुकाने लग्न लावून दिले. श्रींनी तात्यासाहेब व त्यांच्या पत्नीकडून तेरा कोटी जपाचा संकल्प सोडवला. मिलिटरी अकाउंटसच्या ऑॅफिसमध्ये ३१ वर्षे नोकरी करून १९४८ साली पेन्शन घेऊन ते निवृत्त झाले.

तात्यासाहेबांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत शांत व प्रसन्न असे. त्यांना पाहिल्याबरोबरच लोकांना त्यांच्याबद्दल एक प्रकारची आपुलकी वाटे. त्यांचा वेश अगदी साधा असे. सर्वांनी चारचौघांसारखे वागावे, चौफेर ज्ञान प्राप्त करावे, खेळात प्राविण्य मिळवावे, कलेत प्रगती करावी, सर्व गोष्टींमध्ये रस घ्यावा असे त्यांना मनापासून वाटे. ते स्वत: स्वच्छतेचे, टापटिपीचे व शिस्तीचे भोक्ते होते, पण त्यांनी कशाचाही अतिरेक केला नाही. प्रपंच टाकून व्यवहाराच्या विरुद्ध वागणे त्यांना आवडत नसे. व्यक्ती लहान असो की मोठी असो, स्त्री असो की पुरुष असो, तात्यासाहेब प्रत्येकाला मान व महत्त्व देऊन वागत. आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना श्रींच्या सत्तेने घडते अशी त्यांची बालंबाल खात्री असल्याने अमुक व्हावे, अमुक होऊ नये, हा आग्रह त्यांनी कधीच ठेवला नाही. खरोखर त्यांची वृत्ती एखाद्या लहान मुलासारखी निरागस होती. आईच्या खांद्यावर बसलेले मूल विनाकष्ट प्रवास करते त्याप्रमाणे श्रींच्या भरवशावर त्यांनी आपले सबंध जीवन घालवले.

श्रीमहाराजांनी १९१३ साली देह ठेवल्यावर १९२५ साली तात्यासाहेबांच्या ठिकाणी श्रींचा आविष्कार होऊ लागला. श्रीच त्यांच्या मुखातून बोलत आहेत अशी प्रथम जवळच्या नातेवाईकांची खात्री झाली. बोलणे संपल्यावर या बरं बाळ! असे म्हणून तात्यासाहेब डोळे मिटीत व श्रींच्या समोरच्या फोटोपुढे डोके टेकून नंतर उठत. अनेकांना त्यांच्या अडीअडचणीतून मार्ग सुचवून नामस्मरणाचा खात्रीचा व सर्वांना सहज साधेल असा उपाय सुलभ रीतीने पटवून देऊन त्यांच्या मनाचे समाधान करणे, हे कार्य त्यांचेकरवी घडले. तात्यासाहेबांचा मीपणा पूर्णपणे विरून गेला. परमार्थात प्रपंच किंवा व्यवहार हा खरा अडथळा नसून आपल्या मीपणाचाच खरा अडथळा आहे असे त्यांना वाटे. तात्यासाहेब आता सर्वस्वी श्रींसाठीच उरले. त्यांच्या वागण्यात मूर्तिमंत अमानित्व दिसत असे. प्रपंचात अत्यंत अनासक्त वृत्तीने ते राहू लागले. आपल्या घरात पाहुण्यासारखे राहावे अशी श्रींची सूचना तात्यासाहेबांनी तंतोतंत पाळली.

श्रीमहाराजांच्या ठिकाणी पूर्णपणे समर्पित होऊन राहिलेले तात्यासाहेब वयाच्या ८३व्या वर्षी ३एप्रिल १९६७ रोजी हॉस्पिटलमध्ये प्रोस्टेटच्या ऑॅपरेशननंतर काही दिवसांनी श्रींच्या चरणी विलीन झाले.