मुखी भगवंताचे नाम । हाती प्रपंचाचे काम । ऐसा जोडा मनी राम ।

नामाशिवाय दुसरी इच्छा न होणे ही खरी सदगुरूची कृपा.

सद्गुरू हे गाडीवानाचे काम करतात, आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात.

परमार्थ म्हणजे हवे-नकोपणा नाहीसा होणे.

सद्गुरू शिष्याचे भोग टाळीत नाहीत, पण भोग भोगत असताना ते त्यांचे समाधान टिकवतात.

परमार्थात मिळवण्यापेक्षा, मिळवलेले टिकवणे हेच जास्त कठीण आहे.

नामावरची निष्ठा कसे काम करते, हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळते.

नाम कुठवर घ्यावे? आपला श्वासोच्छ्वास चालू आहे किंवा स्वतःची स्मृती आहे तिथपर्यंत. नामाशिवाय जगणे अशक्यच आहे असे वाटले पाहिजे.

व्यवहार उत्तम प्रकारचा केला, पण परमात्मा विसरला तो व्यवहार दु:खच देता झाला.

आपल्या मुखात आपोआप भगवंताचे नाम येणे ही आपल्यावर भगवंताचीच कृपा आहे.

ज्याच्या अंतरात खरोखर नाम असते, तेथे भगवंताला यावेच लागते.

जेथे नामाची मस्ती तेथेच श्रीरामाची वस्ती.

नामस्मरण हा सर्व प्रार्थनांचा, सेवेचा, पूजेचा राजा आहे.

भगवंत हा कुठेतरी मोहात पडतोच, भुंगा जसा लाकूड पोखरतो पण कमळात अडकतो, तीच अवस्था नामाच्या बाबतीत भगवंताची होते.

जेथे नामाचे स्मरण ते माझे वसतीस्थान, जेथे रामाचे नाव तेथेची माझा ठाव, हेची वसावे चित्ती, दीनदास म्हणे राम देईल मुक्ती.

आपल्या इच्छेनुसार गोष्टी घडत नाहीत, ही भगवंताची कृपाच आहे.

खरा परमार्थी असतो तो सतत आत्मपरीक्षण करत असतो, त्याला दुसर्याचे अवगुण दिसतच नाहीत, त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की त्याला इतर सर्वजण परमेश्वररूप भासतात.

सात्त्विक मनुष्य म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घ्यावी अशी वृत्ती असणारा होय.

प्रपंचाची आवड असू नये, प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. देहाने ते कर्तव्य करावे आणि मनाने अनुसंधान ठेवावे.

समाधान हीच खऱ्या आनंदाची खूण आहे.

व्यापारीलोक आज रोख उद्या उधार अशी पाटी लावतात, त्याप्रमाणे आपणही आनंद रोख, दु:ख उधार अशी वृत्ती ठेवावी.

नामाने देहबुद्धी कमी होते, म्हणून नामात राहणारा मनुष्य प्रारब्धाचे भोग भोगीत असताना देखील आनंदात असतो.

शुद्ध असावे आचरण, तसेच असावे अंत:करण, त्यात भगवंताचे स्मरण, हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन.

वासनेचा पूर्ण क्षय झाल्यावरच, संतस्वरूपाची ओळख होते.

जगाची आस सोडल्याशिवाय भगवंताचे दास होता येत नाही.

नामस्मरण करीत असतांना ते नाम आपल्या कानानी ऐकावे म्हणजे एकाग्रता व्हायला मदत होईल.

दृश्यामधला जर देव पाहायचा असेल तर आपले आई, वडील हेच आहेत.

भगवंता तुझी कृपा माझ्यावर असू दे; आणि अशी कृपा म्हणजे, तुझे स्मरण मला अखंड राहू दे.

परमात्म्याला प्रपंचरूप बनवण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मारूप बनवावे.

भगवंत आणि अहंपणा एका अंत:करणात राहू शकत नाही.

नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे. वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे.

व्यवहारातील कामे करण्यासाठी कर्तव्याचे स्मरण हवे आणि समाधानी वृत्तीत जगण्यासाठी कर्तव्यात भगवंताचे स्मरण हवे. आपल्या सोबत सदैव भगवंत आहे असे वाटणे हेच खरे अनुसंधान होय.

असा करावा संसार, जेणे राम ना होईल दूर, देहाने कर्तव्याची जागृती, त्यात ठेवावी भगवंताची स्मृती.

वासना म्हणजे भगवंताच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा.

भगवंताचे प्रेम यायला तीन मार्ग आहेत १) सत्संगती २) सद्विचारांची जोपासना ३) अखंड नामस्मरण.

भगवंत, भक्त, आणि नाम हा अध्यात्माचा त्रिवेणी संगम आहे.

जोवरी चाले श्वास तोवरी रामाचा ध्यास.

संत हे रोग बरे करत नसून रोगाची भीती नाहीशी करतात.

स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते.

भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे त्यांत समाधान मानून त्याचा विसर पडू न द्यावा.

संत विषयात देव पाहतात, आपण देवात विषय पाहतो.

वासना म्हणजे भगवंताच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात, त्यांच्या तावडीत आपण सापडता कामा नये.

नामाला स्वतःची अशी चव नाही त्यात आपणच आपली गोडी घालून ते घेतले पाहिजे.

आपण आपल्या अंत:करणाला नामाची धग लावावी, त्याने आपले दोष वर येतील, ते काढून टाकले की अंत:करण शुद्ध होईल.

जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो, त्याच्या प्रपंचात मी आहे, जो समाधानी आहे त्याच्या अंत:करणात मी आहे, जेथे अन्नदान आहे तेथे मी आहे, जिथे नि:स्वार्थी प्रेम आहे तेथे मी आहे.

जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो तेच काम त्याचे नाम करीत असते.

देहबुद्धीचा अंध:कार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा उपाय नाही.

वृत्ती स्थिर होणे, शांत होणे याचे नाव समाधान

नुसते देहाने पूजापाठ करून परमार्थ घडत नाही तर आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे.

ज्याने वासनेला जिंकले त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असे समजावे.

नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे, सर्व संशय आपोआप नाहीसे होतील. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार होय, आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे हाच परमार्थ होय.

मला भगवंताशिवाय कळत नाही ही परमार्थाची पहिली पायरी होय, मी आणि भगवंत वेगळे नाही हे अंगी मुरणे ही शेवटची पायरी होय.

जोवरी चाले श्वास तोवरी रामाचा ध्यास. मनुष्याला जिवंत राहण्यासाठी हवेची जरुरी, तसेच परमार्थामध्ये नामाची जरुरी आहे.

परमार्थी माणसाने दैन्यवाणे राहायचे कारण नाही, पैसा असेल तर रोज त्याने श्रीखंड पुरी खावी, पण उद्या उपवास पडला तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये.

परिस्थिती चांगली आली की, नाम घेईन असे म्हणणारा कधीच नाम घेत नाही.

सुख-दुःख हे वस्तूत नसून ते आपल्या मनःशांतीवर अवलंबून आहे.

जे कर्म बंधनाला कारण होते ते अज्ञान, आणि जे मोक्षाला कारण होते ते ज्ञान समजावे.

जसे वडिलांचे पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे करतो तसे ग्रंथवाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी.

परिसाला जसे लोखंड लागले की त्याचे सोने होते, तसे नामाला आपले मन चिकटले की आपल्या आयुष्याचे सोने नक्कीच होते.

भगवंत, भक्त, आणि नाम हा अध्यात्माचा त्रिवेणी संगम आहे. प्रपंचाचे प्रेम आपल्याला सहवासाने आले आहे. तसे नामाच्या अखंड सहवासाने त्याचे प्रेम आपोआपच येईल.

जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने पाळावीत.

काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये, उद्या काय होणार याची काळजी करू नये, आज मात्र भगवंताचे ‘नाम’ घेत आनंदाने आपले कर्तव्य करावे.

ज्याचे समाधान खरंच भगवंतावर अवलंबून आहे, त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल.

नामात योगाची सर्व अंगे आहेत हे लक्षात ठेवावे.

जे घडते ते परमेश्वराच्या इच्छेने घडते अशा भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान काय आहे हे खात्रीने कळेल.

नामातच नामाचे प्रेम आहे. ताकात लोणी असतेच ते वर दिसत नाही. ताक घुसळल्यावर जसे ते वर येते तसे भगवंताचे नाम घेतले की प्रेम आपोआपच वर येते.

आपला देह केव्हा जाईल याचा नेम नाही म्हणून म्हातारा झाल्यावर नाम घेऊ असे म्हणू नये.

नामाचे साधन हे ‘फास्ट’ गाडीप्रमाणे आहे. रंग दिसणे, प्रकाश दिसणे, आवाज ऐकू येणे ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंताकडे नेऊन पोहोचवते.

शुद्ध अंतःकरण = आपण कोणाचा द्वेष मत्सर करू नये आणि दुसरा कोणी आपला द्वेष करत आहे ही कल्पनासुद्धा आपल्याला येता कामा नये.

देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो पण ज्याची कसोटी पाहायची आहे त्याला भगवंत जास्त पैसा देतो.

प्रपंचातला अहम् दूर झाला की परमार्थातील वाट दिसू लागते.

परमात्मप्राप्तीसाठी पोषक सत्संगती, सद्विचार, सद्ग्रंथ वाचन, सदाचार, अखंड नामस्मरण ह्या पूरक गोष्टी होय.

नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, अब्रूने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा.

स्वतःचे विस्मरण आणि भगवंताचे स्मरण हेच खरे भक्तीचे रहस्य होय.

आपली वृत्ती भगवंतमय होणे याचेच नाव भक्ती होय.

आपल्या बोलण्यामध्ये नव्हे तर पाहण्यामध्येसुद्धा प्रेम असावे सर्वांशी अगदी निष्कपट प्रेमाने वागावे. बोलणे अगदी गोड असावे.

आपण जे मिळविले ते स्वतःच्या प्रयत्नांनी मिळाले ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही.

ज्याने परमात्म्याला आपले म्हटले त्याची वासना नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.

भगवंताच्या इच्छेनेच सर्व होते आणि तोच सर्व करतो अशी भावना ठेवणे यासारखे समाधान नाही.

येणारा प्रत्येक दिवस हा आपला शेवटचा दिवस म्हणून जगलो तर एक दिवस त्या सगळ्या जगण्याचा अर्थ कळतो.

मी सेवा करतो असे जो म्हणतो त्याची खरी सेवा होतच नाही.

कुठल्याही फळाची अपेक्षा न करता सत्कर्म करणे म्हणजे भक्ती होय.

सर्वांभूती भगवत्भाव ठेवावा हेच परमार्थाचे सार आहे.

नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईलच.

भगवंताच्या भक्तीची सुरुवात त्याच्या गोड नामानेच होते.

मरणाच्या मागे नामस्मरणाचा ससेमिरा लावून ठेवावा म्हणजे मरणाची भीती नाहीशी होईल.

नाम घेत असतां जे घडेल ते आपल्या हिताचेच असते हा भरवसा बाळगावा.

नाम घेणाऱ्याला सत्कर्मे टाळू म्हणून टाळता येणार नाहीत. नाम मुखी आले की सत्कर्मे हातून आपोआप घडू लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्मे हातून घडणार नाहीत.

कुणाचेही मन दुखावणे म्हणजे हिंसाच.

प्रेमाने जग जिंकता येते. प्रेम ही भगवंताची खूण आहे.

पाणी जसे शरीराचे जीवन आहे. तसे नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे.

अंतःकरण न दुखवता बोलणे हे वाचेचे तप असे म्हणतात.

नाम हे घराच्या छपराप्रमाणें आहे. इतर साधने खोल्यांप्रमाणे आहेत.

फार चिकित्सा करणे हे देहबुद्धीचे लक्षण आहे.

दुसऱ्याचे मन दुखवणे म्हणजे भगवंताचे मन दुखवणेच होय.

नुसत्या नीतिमान व्यवहाराने परमार्थ साधत नाही, त्यामध्ये भगवंताचे अधिष्ठान असावे.

भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व कळले.

उत्सवांत मजा करणे हा हेतू नाही. त्यातला हेतू प्रपंचात भगवंत आणणे हा आहे. भगवंताच्या स्मरणांत राहणे हा उत्सवाचा शेवट आहे.

ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरे काम करतो.

अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे.