काळजी, तळमळ यांनी मानवी जीवन सबंध ग्रासलेले आहे. शाश्वत समाधानाची म्हणजेच ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर सद्गुरूंच्या शब्दावर पूर्ण निष्ठा ठेवून श्रद्धेने, प्रेमाने आणि मोबदल्याची अपेक्षा न ठेवता अखंड नाम घेत जावे हे श्रीमहाराजांच्या शिकवणीचे सार आहे.

परंतु नामसाधना करणाऱ्या साधकांना साधनेविषयी अनेक गैरसमज व शंका व अडचणी उत्पन्न होतात त्या दूर करून खरा परमार्थ म्हणजे काय हे सांगण्यासाठी गोंदवले येथे १९८६ ते १९९७ ह्या काळात एकूण १३ नामस्मरण-अभ्यास’ शिबिरे आयोजित करण्यात आली. शिबिरास येणाऱ्या मंडळींनी पू. बाबा बेलसरे यांची निरूपणे ऐकून विषय समजावून घ्यावाच पण त्याबरोबर साधनेचा अभ्यासही करावा हा त्यामागचा हेतू! पू. बाबांच्या ( प्रा. के.वि. बेलसरे) सर्वांगसुंदर निरूपणांनी शिबिरार्थींचे मन प्रसन्न व अंतर्मुख होई तर राहण्याचा व खाण्यापिण्याचा कसलाही त्रास शिबिरार्थींना होऊ नये याची काळजी गोंदवले संस्थान घेत असे. अशा ह्या सुंदर संगमातून प्रत्येकी ५ दिवसांची झालेली शिबिरे म्हणजे चिकित्सक, मुमुक्षू व भक्तमंडळींना दरवर्षी पर्वणीच असे. पू बाबांनंतरही अनेक वर्षे नामसाधना शिबिरांचे आयोजन करण्यात येते. पू. बाबांची व्हिडीओ कॅसेट द्वारे निरूपणे ही आजही पुनःप्रत्ययाचा आनंद देतात व इतक्या वर्षांनंतरही साधकांना अत्यंत मार्गदर्शक ठरत आहेत.
तसेच आधुनिक काळानुरूप तरुण पिढीला रुचेल आवडेल अशा पद्धतीने पीपीटी प्रेझेन्टेशन द्वारे परमार्थ हा विषय पोचवावा यासाठी श्री रवींद्र पाठक यांचे मार्गदर्शन असणारे शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या शिबिरालाही अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे.