अत्यंत विद्वान पण त्याच बरोबर ’सद्गुरू सेवेचा क्षीरसागर’ असे ज्यांचे वर्णन करता येईल असे डॉ कुर्तकोटी यानी प्राचीन काळात ज्याप्रमाणे आश्रमात शिष्य गुरूंची सेवा करीत तशी श्री महाराजांची आदर्शवत सेवा ९ वर्षे केली.
धारवाड जिल्ह्यात गदग तालुक्यातील कुर्तकोटी येथे सन १८७९ मध्ये डॉ. कुर्तकोटी यांचा जन्म संपन्न अशा पाटील घराण्यात झाला. कुर्तकोटी यांचे नाव लिंगनगौडा असून ते त्यांचे वडील श्री. मेलगिरीगौडा यांचे ज्येष्ठ चिरंजीव होत. कर्नाटकात कोणीही साधुसत्पुरुष किंवा शास्त्रीपंडित आले की कुर्तकोटीस येत व वडील मेलगिरीगौडा यांचेकडे वास्तव्य करीत. त्यामुळे लहानपणीच लिंगनगौडावर सुसंस्कार झाले व विदयेची ओढ आणि वैराग्यवृत्ती वाढीस लागल्या. शालेय शिक्षणाबरोबरच शास्त्रीपंडितांकडून संस्कृतचाही अभ्यास केला. आपल्या कुशाग्रबुद्धीच्या जोरावर या बालकाने अवघ्या वीस दिवसांत संपूर्ण अमरकोश कंठस्थ केला.
मॅट्रिकची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर विशेष अभ्यासासाठी ते कलकत्याला गेले. तेथील पंडितांनी त्यांना विद्याभूषण ही पदवी देऊन गौरव केला. ‘विद्याभूषण’ होऊन ते काशीस न्याय, वेदांत, दर्शनशास्त्रांच्या विशेष अभ्यासासाठी गेले. संस्कृत, मराठी, इंग्रजी व कन्नड भाषेवरील असामान्य प्रभुत्व, उत्कृष्ट वक्तृत्व, सखोल चिंतन, यामुळे त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली.
श्रीब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकरांचे कर्नाटकातील शिष्य श्रीब्रह्मानंद रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने कुर्तकोटीस आले होते. श्रीब्रह्मानंदांनी आपले सर्वस्व श्रीमहाराजांच्या चरणी समर्पित केले होते. आपणाकडूनही अशी सेवा घडावी अशी ओढ डॉ. कुर्तकोटी यांना लागली. श्रीब्रह्मानंदांबरोबर ते गोंदवल्यास आले. श्रीमहाराजांचे दर्शन होताच त्यांचे मन श्रींकडे ओढले गेले. श्रींच्या कारुण्यपूर्ण नजरेतील दयेचा पाझर पाहून ते मोहित झाले. डॉ. कुर्तकोटी नऊ वर्ष गोंदवल्यास अगदी श्रींच्या छायेप्रमाणे राहिले. श्रींची त्यांनी दिवस-रात्र अत्यंत मनोभावे सेवा केली. श्रीमहाराज त्यांना महाभागवत म्हणत.
श्रींच्या महानिर्वाणानंतर अमेरिकेतील ओरिएन्टल युनिव्हर्सिटीकडून त्यांनी पी. एच्. डी पदवी मिळविली. डॉ. कुर्तकोटी हे अनेक दुर्लभ गुणांचे संगमस्थान होते. ते जसे दार्शनिक पंडित होते तसे प्रतिभासंपन्न कवीही होते. भारतीय व पाश्चात्य तत्त्वज्ञानाचे ते भाष्यकार होते. अनेक संशोधन संस्थांचा त्यांनी पाया घातलेला आहे. पुढे लो. टिळकांच्या सल्ल्यानुसार ते करवीर व संकेश्वर पीठाचे शंकराचार्य झाले. नंतर अस्पृश्यता-निवारण, शुद्धीकार्य आणि राजकारण, इत्यादी क्षेत्रांस त्यांनी वाहून घेतले. या सगळ्या पसारर्यामध्ये त्यांचे अंतरंग मात्र श्रीमहाराजांच्या चरणी गुंतलेले असे. श्रीमहाराजांचा विषय निघाला की त्यांना गहिवरून येई. श्रींवर त्यांची अखेरपर्यंत निष्ठा होती. नामाचे अखंड अनुसंधान त्यांनी राखले. ते जसे दार्शनिक पंडित होते तसे प्रतिभासंपन्न कवीही होते. आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात डॉ. कुर्तकोटींनी नाशिक येथे पंचवटीत मठ स्थापून तेथे वास्तव्य केले. सन १९६७ मध्ये वयाच्या ८८व्या वर्षी ते नाशिक येथेच समाधिस्थ झाले.