श्रीमहाराजांचे प्रमुख अधिकारी शिष्य

श्रीआनंदसागर

श्रीमहाराजांच्या शिष्योत्तमांमध्ये ज्येष्ठ शिष्य म्हणून श्रीआनंदसागर यांचे नाव घेतले जाते. श्रीब्रह्मानंद आनंदसागरांना ज्येष्ठस्थानी मानत. 'साधकावस्थेमध्ये भगवंत दर्शनाची प्रचंड तळमळ व पूर्ण सद्गुरूकृपेनंतर आनंदाने भरून गेलेले जीवन' असे त्यांच्या चरित्राचे थोड्क्यात वर्णन करता येईल.

त्यांचे संपूर्ण नाव गोविंद अनंत कुळकर्णी. मूळगाव अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव. श्रीआनंदसागरांची लौकिक शिक्षणाकडे फारशी ओढ नव्हती. एकांत आणि चिंतनशील होण्याकडेच त्यांचा अधिक कल होता. आठव्या वर्षी उपनयन संस्कार झाल्यावर कुटुंबाचे वास्तव्य इंदूरला झाले. लहानपणी वडील वारले, अशा परिस्थितीत लिखाणाचे काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागले. बालपणापासूनच दासबोधाचे वाचन आणि चिंतन होत होते व चिंतनाला सखोलता प्राप्त होत होती. एकदा दासबोधातील ’शुचिष्मंता’ समासाचे वाचन चालू असताना त्यांचे मन एकाग्र झाले व अशा कोणा सिद्ध पुरुषाचे दर्शन होईल का? असा विचार त्यांचे मनात येताच खडावांचा आवाज त्यांच्या कानावर आला आणि समोर साक्षात श्रीब्रह्मचैतन्य महाराज उभे असलेले त्यांनी पाहिले. केशरी गंध, तुळशीची माळ, कफनी आणि हातात कुबडी घेतलेले श्रींचे भव्य रूप पाहून गोविंद थक्कच झाला. मला येऊन भेट असे श्रींनी सांगितले आणि लगेच ते अंतर्धान पावले.

श्रीमहाराज इंदूरला असतानाच श्रीआनंदसागर त्यांचे भेटीस गेले. ज्यांच्या भेटीसाठी मन तळमळत होते, त्यांचे दर्शन होताच मन शांत झाले. दुसऱ्या दिवशी श्रींनी श्रीआनंदसागर व त्यांच्या आईवर अनुग्रह करून त्यांना रामसेवा करण्यास सांगितले. पुढे श्रींच्या आज्ञेप्रमाणे बडवईला जाऊन साडेतीन कोटी जपानुष्ठानास प्रारंभ केला. श्रींनी त्यांची योग्यता पाहून ’श्रीआनंदसागर’ हे नाव ठेविले. आनंदसागर श्रीमहाराजांची आज्ञा अत्यंत काटेकोरपणे पाळीत. गोंदवल्यास असताना एकदा एकादशीच्या दिवशी सकाळी श्रींनी आनंदसागरांना सांगितले, “आनंदसागर, तू भजन करीत बैस. मी जरा जाऊन येतो. मग आपण आरती करू.” असे सांगून श्रीमहाराज जे गेले ते दुसऱ्या दिवशी द्वादशीला आले. आनंदसागरांचे भजन अखंड चालू होते. ते दृश्य पाहून श्रीमहाराजांना प्रेमाचे भरते आले आणि ते म्हणाले, शिष्य असावा तर असा! पुढे जालना येथे त्यांनी श्रीराममंदिराची स्थापना केली. तेथे तेरा कोटींचे अनुष्ठान केले.

१९०७ साली चंद्रग्रहणाच्या दिवशी आनंदसागर अंबडला जाण्यास निघाले. मंदिरातून निघण्याच्या वेळी त्यांनी आईला नमस्कार केला. त्या दिवशी नांदुऱ्यास रात्रीच्या भजनात त्यांनी ‘स्वामी माझा पाहिला या माणगंगातीरी’ हे पद अत्यंत गहिवरून म्हटले. ग्रहण लागल्यावर सर्वजण नदीवर स्नान करून आले. आनंदसागर डोळे मिटून ध्यानस्थ बसले. ग्रहण सुटल्यावर जमलेल्या भक्तमंडळींना ते म्हणाले, “मी आता जातो, श्रीमहाराज तुमचे कल्याण करतील.” एवढे बोलून “महाराज, राम, महाराज” हे तीन शब्द उच्चारून त्यांनी देह ठेवला. ‘माझी समाधी बांधू नका’ असे त्यांनी त्यावेळी भक्तमंडळींना सांगितले. श्री महाराजांना हे वर्तमान कळल्यावर आपला उजवा हात गेल्यासारखे त्यांना झाले. श्रीआनंदसागरांच्या अस्थी हर्दा येथे श्रीमहाराजांनी ठेवून घेतल्या होत्या. त्या अस्थी मी प्रयागला घेऊन जाणार आहे, असे त्यावेळी श्री म्हणाले. पुढे श्रींचे महानिर्वाण झाल्या वर श्रींच्या अस्थींबरोबर आनंदसागरांच्या अस्थीही प्रयाग येथील संगमात विसर्जित झाल्या आणि त्रिवेणी संगमातच गुरु शिष्यांच्या अस्थींचाही संगम झाला.