श्रीमहाराजांच्या भक्तांमध्ये एकापेक्षा एक दिग्गज होऊन गेले. प्रपंचात राहूनच परमार्थ कसा साधावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे, ती. भाऊसाहेब. म्हणूनच प्रापंचिकाला ते आदर्श वाटतात तसेच जास्त जवळचे वाटतात. त्यांनी स्वत:सकट आपला प्रपंच पूर्णत: श्रींना अर्पण केला अन् खरोखरच धन्य झाले.
भाऊसाहेबांचा जन्म १८४७ मध्ये झाला. मुळातच ती. भाऊसाहेब निगर्वी, मृदू स्वभावाचे आणि मृदू वाणीचे. त्यात त्यांना सहचारिणीपण तशीच मिळाली होती. त्यात श्रीमहाराजांचे सान्निध्य मिळाल्यावर तर ते दोघे श्रींच्या प्रेमात विरघळून गेले होते. इंजीनीयरींग खात्यात नोकरी झाल्यावर ती. भाऊसाहेब सहकुटुंब गोंदवल्यासच येऊन राहिले ते केवळ श्रीमहाराजांच्या सान्निध्यासाठी. नाही तर त्यांना चांगलं पेन्शन होतं. नोकरचाकर बंगल्याची सवय होती. परंतु श्रींच्या सहवासापुढे हे सर्व वैभव त्यांना तुच्छ होते. ती. भाऊसाहेब आपलं पेन्शन श्रींच्याजवळ देत असत श्री ते भाऊसाहेबांच्या मुलांकडे देत असत. साधारण नऊ वर्षे ती. भाऊसाहेबांना श्रीमहाराजांचा सतत सहवास घडला. भाऊसाहेबांनी सर्वस्व श्रींना दिले आणि श्रींनी त्यांना आपलेसे केले. ही मुले आता माझी आहेत असे श्रींनी एकदा म्हटल्यावर खरोखरच भाऊसाहेबांनी आपल्या मुलांची, त्यांच्या शिक्षणाची व लग्नाची अजिबात कधी काळजी केली नाही. श्रीमहाराजांनी एखादी गोष्ट करावयास सांगितली की ती करताना भाऊसाहेब देहभान विसरून जात. त्यासाठी मग कोणत्याही प्रकारच्या देहकष्टाची व मानापमानाची त्यांना पर्वा नसे. श्रीमहाराजही अगदी आपलेपणाने कधीही भाऊसाहेबांच्या बिऱ्हाडी जाऊन ‘‘मुलांच्यातील मऊ भात मला चालेल अथवा कालची शिळी भाकरी असली तर मला आवडेल’’ असे सौ. बाईंना सांगत असत. श्री महाराजांशिवाय त्यांना चैन पडत नसे. ती. भाऊसाहेबांना श्रीमहाराजांशिवाय दुसरे दैवत नव्हते. महाराज हेच प्रत्यक्ष ब्रह्म, हेच आपले देव! अशी त्यांची पूर्णतया खात्री पटली होती. कुठेही मंदिरात, शंकराच्या असो की रामाच्या अथवा हनुमंताच्या - भाऊसाहेब ‘महाराऽऽज’ म्हणून डोके टेकत असत. ती. भाऊसाहेब श्रींचे विषयी लोकांना सांगत ‘अहो त्यांना काय अशक्य आहे! फक्त एकच गोष्ट त्यांना शक्य नाही! ते कोणाचे अनहित करू शकत नाहीत.’
श्रीमहाराजांनी आपल्या निर्वाणाच्या आधी ती. भाऊसाहेबांना आपल्या जाण्याची स्पष्ट कल्पना दिली होती. तरीही श्रींनी देह ठेवल्यावर ती. भाऊसाहेब बेचैन झाले. त्यांची उलघाल होऊ लागली. अन्न जाईना, झोप लागेना, तेव्हा दोनतीन दिवसांनी रात्री जरा डोळा लागल्यावर श्रीमहाराज समोर आले आणि म्हणाले ‘भाऊसाहेब मी कोठे गेलो नाही. मी इथेच आहे. तुम्हाला कधीही भेटेन.‘ हे ऐकून ती. भाऊसाहेब शांत झाले. श्रींच्या सांगण्याप्रमाणे १२ वर्षे भाऊसाहेब गोंदवल्यास राहिले. श्रींच्या अखंड अनुसंधानात त्यांनी जीवन व्यतीत केले. ती. भाऊसाहेबांचे वय ९०च्या आसपास असेल तेव्हा त्यांना कोणी विचारले, भाऊसाहेब तुम्हाला मरणाची भीति वाटते का? तेव्हा ते अगदी सहजतेने म्हणाले ‘नाही बुवा. इथे महाराजांजवळ आहे आणि तिथेही त्यांच्याचजवळ जायचे आहे.
ती. भाऊसाहेबांनी मोठेपणा असूनही कधी मिरविला नाही, दांभिकपणा त्यांना शिवलाच नाही. श्रीमहाराजांविषयी विलक्षण निष्ठा, कोणाचे अंत:करण न दुखवता वागण्याची रीत, सदासर्वदा नामस्मरण यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व झळाळून गेले. परमार्थामध्ये गुरु आज्ञा प्रमाण हे सर्वोत्तम साधन सांगितलेले आहे. भाऊसाहेबांच्या ठिकाणी या साधनाचा पूर्ण उत्कर्ष झालेला आढळतो. मोठ मोठ्या विरक्त साधकांना दुष्प्राप्य असणारे ‘निरहंकारित्व’ त्यांना पवित्र अंत:करणात उत्पन्न झालेल्या निष्काम व शुद्ध प्रेमाच्या जोरावर, प्रपंचात साधले. अत्यंत मनापासून केलेली सगुणाची उपासना, शक्य तितके नामस्मरण, व आल्या-गेल्याला प्रेमाने अन्नदान या श्री महाराजांना परमप्रिय तीन गोष्टी त्यांनी फार निष्ठेने चालविल्या. वयाच्या ९२ व्या वर्षी म्हणजे सन १९३९ साली अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास या थोर पुरुषाने देह ठेवला.