श्री महाराजांच्या समाधीस केंद्रस्थानी ठेवून आजवर या परिसराचा विकास होत गेला. उत्सवास येणाऱ्या मंडळींचे प्रमाण दरवर्षी वाढतच गेले. रोजच्या रोज बरीच मंडळी दूरदूरच्या गावांहून दर्शनास येऊ लागली. तसेच व्यवस्थेसाठी कायम स्वरूपी सेवेकरी राहू लागले. त्यामुळे निवासी जागा कमीच पडू लागल्या म्हणून इमारती बांधण्यास सुरुवात झाली. आयोजित कार्यक्रमांसाठी सभागृह, भक्तांसाठी प्रसाद, पाणी, स्वच्छतागृह इ. गरजा व त्या त्या प्रमाणात सोयी वाढत गेल्या.
आजही कोणी अतिथी परगावाहून दर्शनासाठी आल्यास त्याची राहण्याची, भोजन-प्रसादाची व्यवस्था केली जाते. श्रींच्या शिकवणुकीप्रमाणे आचरण करण्याकरता नामस्मरण करणारी साधक मंडळीही गोंदवल्यास येऊन राहतात. त्याकरता स्वयंपाकघर, कोठी, ऑफिस, निवासी इमारती, पूजेच्या फुलांकरता बाग, इत्यादी सर्व व्यवस्था या आज मुख्यत: समाधिमंदिर परिसरात आहेत. समाधि मंदिराच्या समोरच्या बाजूस, रस्त्यापलिकडे चैतन्य हॉस्पिटलची इमारत आहे.