श्रींच्या समाधीची स्थापना

मार्गशीर्ष वद्य दशमी शके १८३५ (२२ डिसेंबर १९१३) यादिवशी, श्रीमहाराजांनी भौतिक देहाचा त्याग केला. सध्या समाधीचे आवार म्हणून जे दिसते त्या ठिकाणी त्या काळी श्रींची गोशाळा व गायींची देखभाल करणारे ‘गायमास्तर’ अभ्यंकर यांची राहण्याची झोपडी, या दोन कच्च्या वास्तू आणि गायींसाठी लागणाऱ्या गवताच्या गंजी, याशिवाय काहीही नव्हते. देह ठेवण्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी तेथे जाऊन आपल्या सर्व गायींच्या पाठीवर आपला मायेचा हात फिरवून, श्रीमहाराज म्हणाले, “मी थोडा वेळ इथे बसतो.” लगेच कोणीतरी पुढे होऊन ती जागा झाडून स्वच्छ केली आणि श्रींसाठी एक खुर्ची मांडली.

तीवर बसून सर्वांशी बोलण्याच्या ओघात म्हणाले, “ही जागा फार छान आहे. इथे कायमचेच येऊन राहावे असे मला फार वाटते.” दुसरे दिवशी पहाटे श्रींनी देहत्याग केला. तेव्हा त्यानंतरच्या व्यावहारिक व्यवस्थेचा विचार करता श्रींच्या वरील उद्गारांची आठवण होऊन, गोशाळेतल्या त्या विशिष्ट ठिकाणीच देहाचे अंतिम विसर्जन करण्याचा निर्णय घेण्यात आला, आणि श्रींच्या त्याच सूचक शब्दांना अनुसरून त्या देहाच्या दहनाने पवित्र झालेल्या त्याच जागी समाधि उभारावी असेही ठरले. ती सज्जनगडावरील श्रीसमर्थांच्या समाधीच्या पद्धतीची, म्हणजे तळघरात असावी असेही लवकरच ठरले, आणि त्याप्रमाणे कामास सुरुवात होऊन पहिल्या पुण्यतिथीउत्सवाचे आत गाभारा आणि संगमरवरी सिंहासनही तयार झाले. याठिकाणी स्थापन करावयाच्या पादुकांसंबंधी विचार करतांना एक मागील घटना श्रीब्रह्मानंद व श्रीमहाभागवत यांच्या लक्षात आली. ती अशी की, इ.स. १९०९ मध्ये श्रीमहाराज कर्नाटकचे दौऱ्यावर असताना ते कुर्तकोटीस गेले होते. त्या आधीच श्रीमहाभागवतांच्या मनात आले होते की आपल्या गुरूंच्या पादुका नित्यपूजेसाठी आपल्या घरात असाव्यात आणि या हेतूने काळ्या पाषाणाच्या घोटीव पादुका, व भोवती कुंडलिनीप्रतिक नागाचे वेटोळे आणि त्यावर उभारलेला फणा, अशा स्वरूपाच्या त्यांनी करवून आणलेल्या होत्या. श्रीमहाराजांना आपल्या घरी नेऊन त्या पादुकांवर प्रत्यक्ष उभे करून त्यांची महापूजा केली होती. स्थापनेबाबत मात्र श्री म्हणाले होते की, ‘पुढे ते योग्य वेळी होईल’ हेही सूचक उद्गारच होते हे ध्यानी घेऊन आता समाधिस्थानी त्या पादुकांची स्थापना करण्याचे ठरले, आणि त्याप्रमाणे पहिल्या पुण्यतिथीउत्सवाच्या पहिल्या दिवशी, मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा शके १८३६ या दिनी विधीपूर्वक स्थापना झाली. पहिल्या आणि पुढील वर्षी दुसऱ्या उत्सवास श्रीब्रह्मानंद स्वतः उपस्थित राहिले, आणि उत्सवाची तपशीलवार पद्धती त्यांनी घालून दिली.

श्रीब्रह्मानंद तिसऱ्या उत्सवास आले नाहीत. परंतु तरीही उत्सव थाटाने व नामघोषात आनंदाने पार पडला हे वृत्त समक्ष हजर असलेल्या मंडळींनी सांगितल्यावर श्रीब्रह्मानंदांना फार आनंद झाला व त्यांनी धन्योद्गार काढले. श्रीब्रह्मानंदांनी दामले यांना तिसऱ्या पुण्यतिथीचे वेळी एक ‘अक्षय पिशवी’ त्यात रुपया घालून दिली, व ‘उत्सवाचे अगोदर कोठीपूजनाचे वेळी ह्या पिशवीची पूजा करा म्हणजे काही कमी पडणार नाही’ असे सांगितले. तेव्हापासून दरवर्षी ह्या पिशवीची कोठीपूजनाचे वेळी पूजा होते.

समाधिमंदिर व इतर मंदिरे

श्रीब्रह्मानंदमहाराजांच्या देखरेखीखाली, मार्गदर्शनाखाली समाधिमंदिर बांधून घेण्यात आले. बहुतेक सर्व काम १९१८ साल पर्यंत पूर्ण झाले होते. श्रीब्रह्मानंदमहाराज यांनी १९१८ साली भाद्रपद अमावस्येस देह ठेवला व श्रीआईसाहेब यांचे त्यानंतर बरोबर एक महिन्याने गोंदवले येथे देहावसान झाले. श्री आईसाहेबांचे देहावसान झाल्यानंतर थोड्याच दिवसांत श्रीमहाराजांचा घोडा बत्ताशा याने श्रींचे समाधीपुढे पटांगणात येऊन प्राण सोडला. सज्जनगडला ज्याप्रमाणे खाली समाधी व त्यावर राममंदिर आहे. त्याप्रमाणेच गोंदवल्यास योजना करावी असे श्रीब्रह्मानंदमहाराज यांनी ठरविले. गोशाळेचे प्रतिक म्हणून हे गोपालकृष्णमंदिर बांधले आहे. पं. श्रीमहाभागवत यांनी अत्यंत देखणी अशी श्रीगोपालकृष्णमूर्ती करवून घेतली. तिची स्थापना सन १९२० मध्ये बापूसाहेब साठ्ये यांचे हस्ते करण्यात आली. सन १९३५ चे सुमारास श्रीआईसाहेबांचे मंदिर बांधून तयार झाले. समाधिमंदिराचे सभामंडपास भिंती नव्हत्या.

त्या नारायण कुंदापूर यांचे पुढाकाराने पूर्ण बांधण्यात आल्या. त्यांच्याच देखरेखीखाली श्रीगोपालकृष्णाच्या मंदिरावर शिखर बांधण्यास सुरूवात झाली. परंतु ते काम पुरे होण्याचे आतच ते गेले. अपूर्ण राहिलेले शिखर १९५२च्या सुमारास वीज पडून नादुरुस्त झाले. त्यानंतर ते सर्व दुरुस्त करण्यात आले.

मागच्या २५ एक वर्षात समाधिमंदिरही खूप बदलले! पहिल्याच्या दुप्पट विस्तार झाला. स्वच्छता व साधेपणा हे डोळ्यापुढे ठेवून त्याचे नूतनीकरण झाले. शतसांवत्सरिक महोत्सवाच्या निमित्ताने श्रीमहाराजांच्या समाधीचा गाभारा तसेच समोरील पायऱ्या, वरील चौथरा आणि गोपालकृष्णमंदिर ह्यांना पुन्हा नव्याने अत्यंत सुंदर अशा मार्बलने सुशोभित करण्यात आले. तसेच मंदिराचे दरवाजे-खिडक्या कोरीव कामात करून घेण्यात आल्या नूतनीकरणाचे हे काम समाधिमंदिरापाठोपाठच श्रीमहाराजस्थापित धाकटे व थोरले श्रीराममंदिर तसेच दत्त व शनिमंदिर ह्या ठिकाणी पूर्ण करण्यात आले.

नामस्मरण

श्रीमहाराजांना अन्नदान, गोरक्षण, नामस्मरण ह्या तीन गोष्टी आवडत असत. त्यामुळे गोंदवले येथे समाधीसन्निध सद्गुरु आहेतच ह्या भावनेने अखंड नाम चालू ठेवले पाहिजे हा सर्वांचा आग्रह आहे. श्रीसमाधिमंदिरात वेळोवेळी नामजपाचे संकल्प करण्यात आले. काही वेळा गावोगावी जप करून असा संकल्प पूर्ण करण्यात आला, तर काही वेळा समाधिमंदिरात बसून जप करून पूर्ण केला गेला. १९४२साली तेरा कोटी रामनाम जपसंकल्प सोडण्यात आला होता. त्याची पूर्तता १९४३ चे पुण्यतिथीउत्सवात सांगतासमारंभ व संहिता स्वाहाकाराने झाली. १९६० चे गोकुळअष्टमीचे वेळी श्रीक्षेत्र गोंदवले येथे पू. तात्यासाहेब केतकर यांचे प्रेरणेने तेरा कोटी रामनाप जप व गायत्रीपुरश्चरणाचा संकल्प सोडण्यात आला. ही जपसंख्या १९६१ चे उत्सवाचे वेळी पूर्ण झाली. हा जप समाधिमंदिरात बसूनच करण्यात आला. ह्या काळात जवळ जवळ एक वर्षापेक्षा जास्त काळ पू. तात्यासाहेब केतकर गोंदवले येथे स्वतः राहिले. त्यामुळे बरोबर बरीच मंडळी जपात भाग घेण्यास राहिली होती.

ह्यावेळी काशीकर व हुच्चुराव यांनी सर्व पुढाकार घेतला होता. प्रवचने, कीर्तने इत्यादी कार्यक्रम वर्षभर चालू होते. त्यामुळे वर्षभर उत्सवाचे वातावरण होते. उत्सवाचे वेळी सांगता-समारंभ फार मोठ्या प्रमाणावर झाला. पू. तात्यासाहेब केतकर यांचे हस्ते वैदिकमंडळींचा सन्मान करण्यात आला. १९६२-६३ मध्ये मंदिरात तेरा कोटी जप संकल्प करण्यात आला. गावोगाव भक्तांकडून जो जप नोंद करण्यात आला तो सर्व मिळून या पन्नासाव्या पुण्यतिथी उत्सवात ५० कोटी जप पूर्ण झाला व १९६३ चे डिसेंबरमध्ये सुवर्णमहोत्सवाचे वेळी या जपाची सांगता करण्यात आली.

नामाची गोडी व अनुभव प्रत्येक साधकास यावा या दृष्टीने वरचेवर तेरा कोटी रामनामजप संकल्प करून ते पार पडले. इतरही जपानुष्ठाने झाली. दरवर्षी त्यांची सांगता पुण्यतिथी उत्सवात होत असते. आनंदाची गोष्ट म्हणजे दरवर्षी हा रामनाम जपसंख्येचा आलेख वर्धमान आहे.

गोरक्षण

श्रीमहाराजांचे गायींवर अतिशय प्रेम होते. ते वारंवार गोशाळेत जाऊन गायींची व्यवस्था नीट होत आहे ना याची खात्री करून घेत. अभ्यंकर, भगवानराव ह्यांना तीच सेवा दिली होती. त्यानंतर गायींची सेवा विश्वनाथबुवा, बसाप्पा ही मंडळी करत. पाठकमास्तर, गणपतराव जोशी इत्यादी मंडळीही गायींचेकडे लक्ष देत. श्रींचे निर्वाणानंतर एकदा मोठा दुष्काळ पडला व गोशाळेतील गायींना कडबा नाही अशी अवस्था झाली. वाहतुकीची साधने नसल्यामुळे दुसरीकडून कडबा आणणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यावेळी हे गायींचे मोठे खिल्लार पुण्यास आणले. तळेगावजवळ तळवडे येथे गणपतराव दामले यांची जमीन होती, त्यातून कडबा-गवत पुण्यास आणत. शिवाय इतरत्र हिंडून कडबा गोळा करीत.

शनीच्या पाराचे मागील बाजूस एक बखळ होती तेथे या गायी ठेवल्या होत्या. त्यावेळी वासुदेवराव फडके व गणपतराव दामले यांनीही इतरांचे बरोबर गळ्यात पेटी अडकवून गोरक्षणास मदत जमा करून गायींचे रक्षण केले. अशा रीतीने वेळोवेळी आलेल्या अडचणीतून मार्ग काढून गोरक्षण चालू ठेवले आहे. आधुनिक गोशाळा कुर्तकोटी इमारतीमागे बांधून झाली. बाजूलाच नवीन अत्याधुनिक गोबरगॅसची उभारणी झाली आहे.

उपसंहार

गोंदवले येथे फार मोठ्या प्रमाणावर मंडळी येतात, राहतात, स्वतःचे उद्धाराकरिता समाधीसन्निध नाम घेतात व बाकीचा वेळ पडेल ती सेवा करतात. प्रत्येकजण, अगदी ट्रस्टीही, अत्यंत सेवाभावनेने ह्या यंत्रणेत सहभागी असतात. बाहेरच्या जगात डॉक्टर, प्रोफेसर, इंजिनिअर, मोठे अधिकारी असणारी मंडळीही येथे हलक्यातले हलके काम करण्यास कमीपणा मानत नाहीत. काही सेवेकरी कायम गोंदवल्यास राहून नित्यनैमित्तिक उपासना, कोठी, स्वयंपाकघर वगैरे क्षेत्रात पडेल ती सेवा आपलेपणाने करतात. गुरुगृहीचे सेवाकार्य करण्यात प्रत्येकास आनंदच वाटतो. म्हणूनच एक शतकाहूनही अधिक काळ हे सर्व चक्र व्यवस्थित चालले आहे. हे सर्व श्रीमहाराजांचे सत्तेनेच चालते व ते कधीही कमी पडू देणार नाहीत अशी प्रत्येकाची श्रद्धा आहे. त्यामुळे गोंदवले हे जागृत स्थान असल्याचा आजवरचा अनुभव आहे. काळानुरूप बाह्यांगी बदल केल्यावाचून गत्यंतर नाही. पण तो बदल करूनदेखील हे स्थान जागृत ठेवणे हे आपल्या नाम निष्ठेत आहे. श्रीमहाराजांची उपासना यथास्थित चालू ठेवली, पुष्कळ माणसांनी पुष्कळ नामस्मरण केले आणि प्रेमाने अन्नदान केले तर महाराजांच्या सत्तेची प्रचिती पदोपदी येईल यात शंका नाही.