भगवंतांच्या नामात रंगण्याची कला साधावी म्हणून गोंदवले येथे विविध उत्सव व त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजिले जातात त्यांपैकी गुढीपाडवा, रामनवमी, गुरुपौर्णिमा, गोपालकृष्ण जन्मोत्सव, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी, दत्तजयंती व श्रीरामदास नवमी हे उत्सव प्रामुख्याने साजरे होतात.
गुढीपाडवा : हिंदू वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यातील वर्षप्रतिपदेपासून होते. त्यामुळे अर्थातच गुढीपाडवा हा सण समारंभपूर्वक साजरा केला जातो. गुढी उभारण्याचे ठिकाणी म्हणजे मंदिरापुढील अंगण शेणाने सारवले जाते. नंतर तिथे सुरेख रांगोळी काढतात. मोठया बांबूला सोवळे, साखरेची गाठी, हार व तांब्याचा तांब्या असे घालून रीतसर गुढी उभारून पूजा केली जाते. नंतर नवीन वर्षाचे पंचांग वाटप समाधि मंदिर, ऑफिस, कोठी, थोरले व धाकटे राम मंदिर, श्रीदत्त व शनी मंदिर या सर्व ठिकाणी केले जाते.
रामनवमी : पाडवा ते रामनवमी असा उत्सव थोरले व धाकटे अशा दोन्ही राममंदिरात केला जातो. रोज सकाळी काकड आरती, भजन, रामाची पाद्यपूजा केली जाते. नंतर जपाचा पहारा सुरू करतात. श्रीमहादेवास रुद्र अभिषेक व श्रीरामास पवमान अभिषेक केला जातो. नऊ दिवस अखंड नामस्मरण व भजनपहारा (पुरुषांचा) चालू असतो. रोज अध्यात्मरामायणाचे वाचन, रामपाठ, महापूजा, नैवेद्य व आरती असा कार्यक्रम असतो. संध्याकाळी करुणाष्टके, सवाया, विष्णुसहस्रनाम, कीर्तन, सायंआरती, पंचपदी भजन असे सर्व कार्यक्रम होतात.
श्रीरामजन्म १२.३० वाजता झाल्यावर न्हाणी, पाळणा व आरती म्हटली जाते. नंतर सुंठवडा वाटतात. दशमीला सकाळी ८ वाजता मंदिरातून रामदासी भिक्षा निघते व थोरले राम मंदिरात जाते तिथे रामराज्यारोहणाचे कीर्तन होते. नंतर दुपारी १२ वाजता नैवेद्य व पंचपदी भजनाने पहारा उठवला जातो.
चैत्र शुद्ध दशमीला रामाची पालखी सायंकाळी ७ वाजता थोरले राम मंदिरातून समाधिमंदिरात येते. तेथे अभंग व आरती होते नंतर प्रसाद वाटप होऊन परत थोरले राम मंदिरात जाते.
गुरुपौर्णिमा उत्सव : आषाढातील गोंदवल्यास होणारा गुरुपौर्णिमा उत्सव हा मोठा व साग्रसंगीत साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेच्या आधी सात दिवस हा सप्ताह असतो. सकाळी ९ ते ११ समाधिमंदिरात श्रीसदगुरुलीलामृत या पोथीचे पारायण होते. सात दिवस पुरुषांचा अखंड नामस्मरण व भजनाचा पहारा असतो. तर स्त्रियांचा पहाटे ४ ते रात्री १० असा सात दिवस नामस्मरणाचा पहारा असतो. रोज सकाळी समाधिमंदिरात रुद्र अभिषेक असतो व रोज संध्याकाळी कीर्तनसेवा असते.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ८.३० वाजता रामदासी भिक्षा असते. गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम आषाढ शु. १२,१३,१४, या दिवशी असतात. पौर्णिमेला भजनाचे कार्यक्रम असतात. गुरुपौर्णिमेला दुपारी १२ वाजता नैवेद्य झाल्यावर पंचपदीभजन होऊन पहारा उठवण्यात येतो.
श्रीभगवान गोपालकृष्ण जन्मोत्सव सोहळा : हा जन्मोत्सव सप्ताह श्रावण कृ. १ ते श्रावण कृ. ७ पर्यंत चालतो. श्रावण कृ. ८ रोजी जन्माष्टमी रात्री १२.३० वाजता साजरी होते. हे सात दिवस अखंड नामस्मरण व भजनाचा पहारा असतो. प्रतिपदेला सकाळी ६.३० वाजता पहारा सुरु होतो. गोकुळअष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या नैवेद्यानंतर पहारा उठवण्यात येतो.
दररोज सकाळी श्री गोपालकृष्ण पवमान अभिषेक आणि श्रीमहाराजांचे समाधीस रुद्र अभिषेक केला जातो. संध्याकाळी समाधिमंदिरात कीर्तनसेवा होते. जन्माच्या दिवशी श्रीकृष्ण मंदिर फुलापानांनी, खेळण्यांनी दिव्याच्या माळांनी सजविले जाते. श्रीकृष्णजन्माचे कीर्तन रात्री ११ ते १२.३० पर्यंत समाधिमंदिरात होते. जन्माच्यावेळी फुले उधळली जातात. नंतर न्हाणी, पाळणा, आरती म्हणतात. त्यानंतर श्री विष्णुसहस्रनाम म्हटले जाते. श्रीकृष्णाचा जयजयकार करतात.
दत्तजयंती : मार्गशीर्ष शुद्ध १५, पौर्णिमेस दत्तमंदिरात सकाळी रुद्र अभिषेक करतात. सूर्यास्ताच्या वेळेस सायंकाळी ५ ते ६.१५ श्रीदत्तजन्माचे कीर्तन होते. व जन्माचे वेळी फुले उधळतात. नंतर न्हाणी, पाळणा, आरती करतात व प्रसाद वाटप होऊन हा कार्यक्रम संपन्न होतो. दत्तमंदिर केळीचे खुंट बांधून व फुलांच्या माळा, मंडप घालून सजवले जाते.
श्रीरामदास नवमी उत्सव : माघ व. १ ते व. ९ या दरम्यान दासनवमी उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवात पुरुषांचा अखंड नामस्मरण व भजनाचा पहारा असतो. दररोज सकाळी श्रींचे समाधीस रुद्र अभिषेक असतो आणि दासबोध ग्रंथाचे पारायण दररोज सकाळी ९ ते ११ असते. रोज संध्याकाळी कीर्तनसेवा होते. पुण्यतिथीच्या म्हणजे दासनवमीस सकाळी ८ वाजता समाधिमंदिरातून रामदासी भिक्षा निघते व त्यानंतर १०.३० वाजता कीर्तन होते. १२ वाजता फुले उधळून पुण्यतिथी साजरी केली जाते.