अलीकडच्या काळात श्रीरामनामाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर ज्यांचे हातून झाला ते बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडर्याचे श्रीप्रल्हादबुवा होत.
त्यांचा जन्म सन १८९२ मध्ये झाला. धर्माचरणी व भक्तियुक्त वातावरणात बुवांचे बालपण गेले. त्यांचे शालेय शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले. पण घरी वडील व वडीलबंधू नंतर दिसोडचे श्री.सखाजीशास्त्री शुक्ल यांचेकडे बुवांचे वेदशास्त्रपुराणाचे सखोल अध्ययन झाले. सन १९०४ मध्ये जालना येथील श्रीरामानंद ऊर्फ पांडुरंगबुवा साखरखेडर्यास आले असताना बुवांच्या आईवडिलांचा रामानंदांच्या ठिकाणी पूज्यभाव निर्माण झाला. रामानंदांनी काळे कुटुंबातील सर्वांना, आपल्याबरोबर गोंदवल्यास नेले. त्यावेळी वयाच्या बाराव्या वर्षी प्रल्हादबुवांना श्रीमहाराजांचे प्रथम दर्शन झाले. गोंदवल्याहून परत गेल्यावर, प्रल्हादबुवा शक्य तितका काळ श्रीरामानंदांच्या संगतीत घालवून त्यांची मनोभावे सेवा करू लागले. सन १९१० मध्ये रामानंदांनी बुवांना अनुग्रह देऊन रामनामाचे तेरा कोटी पुरश्चरण करण्याची आज्ञा केली. गुर्वाज्ञेने त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. वडिलांनी अग्निहोत्राची दीक्षा त्यांना दिली. रामानंदांनी त्यांना समर्थसांप्रदायिक रामदासी दीक्षाही दिली होती. एके दिवशी रामानंदांचे दासबोधातील वैराग्यलक्षणावरील प्रवचन श्रवण केल्यावर, बुवांना तीव्र विरक्ती वाटू लागली व ते घर सोडून नेसल्या वस्त्रानिशी सहकुटुंब राममंदिरात राहावयास गेले. रामानंदांजवळ श्रीमहाराजांनी उपासनेसाठी दिलेले शाळिग्रामाचे श्रीरामपंचायतन होते. एकदा बुवा जालन्यास गेले असता ते रामपंचायतन रामानंदांनी त्यांना दिले व रोज पंचायतनाची पूजा करून तीर्थ घेतल्याशिवाय पाणीसुद्धा पिऊ नये असे सांगितले. ही आज्ञा बुवांनी जिवाची पर्वा न करता पाळली.
रामानंदांच्या शेवटच्या आजारपणात व गोंदवल्यास सन १९३० मध्ये त्यांचे निर्वाण होईपर्यंत, श्रीप्रल्हादबुवा आपल्या गुरूची सेवा अहोरात्र करीत होते. साखरखेडर्यास बुवांनी रामानंदांच्या पादुकांची स्थापना केली व काही वर्षांनी तेथेच त्यांच्या संगमरवरी मूर्तीची स्थापना करून भक्तांच्या सहाय्याने मंदिरही उभे केले.
स्वत: देह ठेवीपर्यंत जवळजवळ पन्नास वर्षांत प्रल्हादबुवांनी मराठवाड्यातील, विदर्भातील हजारो मुमुक्षूंना रामनामाची उपासना दिली. लीनता, गुरुभक्ती, स्वधर्माचरण, प्रसंगी देहास कष्ट देऊन व्रतपालन व अखंड नामस्मरण, हे त्यांचे गुणविशेष होते. जनात राहून परमार्थ कसा साधावा हे त्यांनी आपल्या आचरणाने दाखवून दिले. वऱ्हाडात त्यांचा प्रचंड शिष्यसंप्रदाय आहे.
श्रीमहाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी पर्वकाळी गुलाल टाकण्यापूर्वी जमलेल्या जनसमुदायासमोर त्यांचे प्रवचन होत असे. वयाच्या 81व्या वर्षी सहस्रचंद्रदर्शनाचे वेळी त्यांची रौप्यतुला करण्यात आली. त्यावेळी लाखो भक्त जमले होते. अकोला येथे सन १९७९ मधील कार्तिक शुद्ध चतुर्थीच्या दिवशी श्रीमहाराजांच्या परंपरेतील या थोर शिष्याने देह ठेवला. त्यांची समाधी व त्यांची संगमरवरी मूर्ती श्रीरामानंदमहाराजांच्या समाधिमंदिराच्या आवारात स्थापन केली आहे.