सगुणस्वरूप व आवडी निवडी

श्रीमहाराजांबद्दल त्यांची आई सौ गीताबाई म्हणत त्याच्या तीन खुणा आहेत ‘दिसायला तो मोठा सुंदर आहे , बोलण्यात तो मोठा चतुर आहे आणि तो अखंड रामनाम घेतो. ‘महाराजांच्या तोंडावर एक प्रकारचे तेज तरळत असून त्यावर खेळत असणाऱ्या मंद स्मिताने प्रत्येक माणसावर त्यांची सहज छाप पडे. त्यांचे शरीर भरदार असून चालणे मोठे ऐटबाज दिसे. श्रीमहाराज म्हणजे मूर्तिमंत निरंतर आनंद, प्रेमळ मंद हास्य, राजासारखी ऐट, अकृत्रिम निरपेक्षता, दुसऱ्याचे दु:ख कमी करण्याची तळमळ आणि जिवाला तृप्त करणारी मधुर वाणी.

श्रीमहाराज खेळण्यात व पोहोण्यात फार पटाईत होते. घोड्यावर बसण्याची कला त्यांना फार चांगली येत होती. ते पळण्यात व झाडावर चढण्यात फार निष्णात होते. प्रवासाची विलक्षण आवड असून वयाच्या १२ वर्षापासून ४५ वर्षापर्यंत केलेल्या प्रवासाने त्यांना तत्कालीन समाजजीवन उत्तम रीतीने पहाण्यास मिळाले. त्यांना गोडाचा कंटाळा असून बाजरीची भाकरी, पिठले असे जाडे भरडे अन्न आवडे. त्यांना स्वच्छ व वळणदार हस्ताक्षर आवडे, तसेच स्पष्ट उच्चार व अर्थ समजून वाचन करण्याची, उत्तम काव्याची आणि गोड गळ्याच्या गायनाचीही त्यांना आवड होती. त्यांना लहान मुले विशेष आवडत. लोकांना जेवायला घालण्याची त्यांना फार हौस होती.

स्वाभाविकपणे जरी त्यांना भजनाची, देवाच्या गोष्टींची, नामस्मरणाची, व एकांताची गोडी होती; तरी प्रापंचिक लोकांचा त्यांनी कधी कंटाळा केला नाही. स्वभावत: त्यांना विद्वान माणसापेक्षा अडाणी मनुष्य, श्रीमंतापेक्षा गरीब मनुष्य आणि शहरात राहण्यापेक्षा खेडेगावात राहणे आवडे.

अमृतवाणी

श्रीमहाराजांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या वाणी मध्ये प्रकट होत असे. त्यांच्या संभाषणाचा ओघ अगदी अखंड असून आवाजात एक प्रकारचे माधुर्य असे. विषयाची मांडणी करताना सुंदर कल्पना, चतुर कोटया व यथार्थ उपमा यांचा ते उपयोग करु लागले की मनुष्य अगदी मोहित होऊन जाई. त्यांची वाणी अत्यंत प्रसन्न, प्रेमळ व प्रसादाने नटलेली असे व मानवी जीवनाचे सर्वांगीण ज्ञान त्यांच्या बोलण्यातूनही सहज प्रकट होई. त्यांच्या ठिकाणी अभिजात विनोदाची कला होती. प्रत्येकाला ते त्याच्या व्यवसायातीलच एखादी उपमा देऊन भगवंताच्या नामाचे महत्व समजावून सांगत.

भगवंताच्या नामाचे श्रेष्ठत्व व महत्त्व वर्णन करीत असताना त्यांच्या वाणीला पराकाष्ठेचे तेज व गांभीर्य चढे त्यांच्या वाणीला कृत्रिमतेचा लवलेश नसल्यामुळे ती ऐकणाऱ्याच्या हृदयाला जाऊन भिडत असे. सर्व प्रकारच्या दु:खी जीवांना श्रीमहाराजांच्या वाणीने समाधान प्राप्त होत असे. त्यांनी सहज बोललेली वाक्ये परमार्थाची सूत्रेच बनत. त्यांचा पिंडच भगवंताच्या प्रेमाचा असल्यामुळे प्रपंचामध्ये ते प्रेम कसे अनुभवावे याचे विवेचन ते अत्यंत मनापासून व तळमळीने करीत. तात्त्विक व गहन विचार सोपे करण्यास महाराज अत्यंत व्यावहारिक दृष्टांत वापरत व आपल्या तर्क शुद्ध, पण प्रेमळ युक्तीवादाने भगवंताची सत्यता नास्तिकाच्या गळी बरोबर उतरवित. तरीपण त्यांच्या बोलण्यामधे कमालीची लीनता असून तितकाच ठामपणा असे. कोणताही विषय काढा- त्यावर महाराजांचे मूलग्राही व स्पष्ट मत असे.

लोकांना भगवंताकडे वळविण्यासाठी श्रीमहाराजांनी आपल्या वाणीची सर्व शक्ती कामाला लावली आपली वाणी नामाला वाहिली तर ती काय चमत्कार करू शकते हे श्रीमहाराजांनी स्पष्ट दाखविले.

व्यवहार व आचरण

श्रीमहाराजांचा व्यवहार हा सर्वस्वी त्यांच्या तत्त्वज्ञानाचा परिपाक होता. या जगातील संपत्ती व कीर्ती पायाशी चालून येत असताना त्यांची उपेक्षा करणारे जीवन कसे असते हे त्यांनी दाखवून दिले. त्यांचा व्याप पुष्कळ मोठा होता, पण तो सांभाळण्याची हिंमतही त्यांच्या ठिकाणी होती. इतक्या प्रपंची लोकांशी रात्रंदिवस व्यवहार करीत असताना आणि हा व्यवहार वर्षांनुवर्षे चालू असतादेखील श्रीमहाराज कधीही कोणाचे मिंधे राहिले नाहीत. त्यांनी कधीही कोणापुढे हात पसरला नाही. श्रीमहाराजांनी कधीही कोणाकडून वर्गणी गोळा केली नाही. त्यांनी आपला चरितार्थ अगदी स्वतंत्र ठेवला. त्यांच्यापुढे कोणी पैसा ठेवला तर त्याचा अनादर केला नाही, पण स्वप्नातदेखील त्याची कधी अपेक्षा केली नाही. गोंदवल्यास किती तरी गरीब कुटुंबे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून होती; तरी, मी त्यांचा पोशिंदा आहे ही भावना कधी त्यांना शिवली नाही. खरे म्हणजे दुसऱ्यासाठी झिजल्यावाचून त्यांना चैन पडत नसे. श्रीमहाराजांना लौकिकाचा, प्रसिद्धीचा, वर्तमानपत्री चर्चेचा आणि व्यासपीठावरील व्याख्यानांचा अगदी मनापासून कंटाळा असे. त्यांनी प्रसिद्धी फार कटाक्षाने टाळली.

त्यांनी जन्मभर परमार्थाचे अखंड चिंतन केले व लोकांकडून तसे चिंतन करवून घेण्याचा प्रयत्न केला. परमार्थाबद्दल लोकांमध्ये नाना तऱ्हेच्या गैरसमजुती, नाना प्रकारचे विपरीत आचार दृढमूल झालेले असतात. हे सर्व प्रकारे दूर करण्याचा प्रचंड खटाटोप श्रीमहाराजांनी केला. सर्व प्रकारच्या लोकांशी श्रीमहाराजांचे वागणे सारखेच म्हणजे उदारवृत्तीचे आणि प्रेमळपणाचे असे. पण भगवंताच्या नामाच्या किंवा संतांच्या उलट जर का कोणी बोलला तर त्यांचा अंतरात्मा सळसळून, एखादे आव्हान स्वीकारल्याप्रमाणे ते भांडावयास उभे ठाकत. अशा प्रसंगी त्यांचे भाषासामर्थ्य, वेदान्तविषयाचे अगाध ज्ञान, आणि विलक्षण वादपटुत्व सर्वांना पाहण्यास मिळे. श्रीमहाराज फार सुसंस्कृत होते. एकंदर स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात फार आदर असून ते स्त्रियांना फार पूज्य मानीत. आई व आईच्या प्रेमाविषयी बोलणे निघाले तर त्यांचा गळा भरून येई व डोळ्यांना पाणी येई. आई म्हणजे भगवंताच्या प्रेमाची प्रापंचिक मूर्ती होय असे ते म्हणत.

श्रीमहाराज म्हणजे कारुण्याची मूर्ती! प्रपंच सर्वस्व मानणारा प्रापंचिक असो, समाजातील उपेक्षित असो वा पराकोटीचा स्वार्थी व दुष्ट बुद्धीचा मनुष्य असो त्यांनी कधी कोणाचा अव्हेर केला नाही. त्यांच्याबद्दल कधी तुच्छता दर्शविली नाही. तर नाना उपायांनी त्यांना सुधारण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली. आपल्याला विरोध करणाऱ्या लोकांच्याही उद्धाराचीच चिंता त्यांनी वाहिली.

लोकसंग्रह

श्रीमहाराजांकडे गुरुत्व आपोआप आले, कारण गुरू होण्याची सर्व लक्षणे त्यांच्या अंगी स्वत:सिद्ध होती. गुरुत्व असूनदेखील श्रीमहाराजांनी आपल्या शिष्यांना शिष्यपणाने कधीच पाहिले नाही. आपल्या अनुयायांवर पोटच्या मुलाप्रमाणे ते प्रेम करीत. अक्षरश: हजारो लोक त्यांच्या संगतीला राहून गेले. प्रत्येकाशी त्यांची निकट ओळख होती, म्हणून त्यांचे मंदिर प्रत्येकाला प्रेमाचे, हक्काचे वाटे. अनेक दीन-दरिद्री, अज्ञानी, भाबड्या व अपंग लोकांना त्यांचा आधार होता. जो कोणी येईल त्याच्याशी श्रीमहाराज मित्राप्रमाणे बरोबरीच्या नात्याने वागत. स्वत: तीव्र अध्यात्म प्रवृत्तीचे असूनही ते प्रापंचिकांमध्ये पूर्णपणे मिसळले व त्यांच्यामध्ये राहूनच त्यांना परमार्थात पुढे ढकलले आणि म्हणून ते प्रत्येकाला अगदी जवळचे वाटत. कट्टर सनातनी असो किंवा सुधारक असो, अत्यंत पापभीरू असो किंवा गुन्हेगार असो, या सर्वांशी श्रीमहाराज प्रेमाने वागले आणि भगवंताच्या नामाचे महत्त्व अगदी शांतपणे त्यांना सांगत राहिले.

विशिष्ट गुण

श्रीमहाराजांच्या ठिकाणी काही गुण असे होते की सामान्य मनुष्याने जर त्यांचा अभ्यास केला तर त्याचा प्रपंच तर उत्तम होईलच होईल, पण त्याची पारमार्थिक उन्नतीदेखील झाल्याशिवाय राहणार नाही.

साधी वृत्ती: ऐश्वर्य, ऐषआराम, बडेजाव यांचा त्यांना अगदी मनापासून तिटकारा होता. लोकसंग्रहापूर्वी तर त्यांची राहणी फार साधी होतीच, पण गुरुत्व धारण केल्यानंतरदेखील त्यांनी आपली साधी वृत्ती सोडली नाही. त्यांचे कपडे अगदी साधे असत. त्यांचे खाणे, बोलणे अगदी साधे असे, पुष्कळ साधी व हलकी कामे ते स्वत:च करीत. रामाच्या पुढे झाडून काढणे, कधी कधी तेथे सारवणे, शेतामध्ये खणणे व नांगर धरणे वगैरे साधी कामे श्रीमहाराज नेहमी स्वत: करीत असत. त्यांना आपल्या मोठेपणाचे भानच नसे. या साधेपणामुळे अगदी सर्व लोकांना ते फार जवळचे वाटत.

लीनता: कोणत्याही दर्जाचा मनुष्य त्यांच्याजवळ गेला तरी त्याच्याशी ते अत्यंत लीनतेने वागत. किंबहुना, आपल्या बहुतेक सर्व विरोधकांना श्रीमहाराजांनी आपल्या लीनतेने जिंकले असे म्हणावयास हरकत नाही. त्यांच्या बोलण्याचालण्यामध्ये उद्धटपणाचा लवलेशदेखील सापडत नसे. मोठेपणा, वैभव, ऐश्वर्य आणि लीनता यांचा सुरेख संगम त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे आढळतो. आपला अभिमान नष्ट करायला लीनतेसारखे साधन नाही, म्हणून भगवंताच्या नामाला लीनतेची जोड द्यावी असे ते वारंवार सांगत.

सहनशीलता: त्यांना आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या दिव्यांतून जावे लागले. निंदा, तुच्छता, अवहेलना, अपमान, आघात, वगैरे गोष्टी तर त्यांच्या नित्याच्या अनुभवाच्याच बनल्या होत्या.

पण चुकूनदेखील त्यांनी आपल्या शांत वृत्तीचा भंग होऊ दिला नाही, इतकेच नव्हे तर स्वत:ची निंदा करणार्यांचीही त्यांनी कधी निंदा केली नाही. स्वत:चा उघड उघड अपमान करणाऱ्यांचा कधी अपमान केला नाही आणि स्वत:वर संकट ढकलणाऱ्यावर कधी उलटा आघात केला नाही. लोकांकडून येणारा मान जितक्या सहजरीतीने त्यांनी गिळला तितक्याच सहजतेने लोकांकडून येणारा अपमानही त्यांनी गिळला आणि दोघांनाही सारख्याच आपलेपणाने भगवंताच्या नामाचे महत्त्व ते जन्मभर सांगत राहिले.

निरलसता: सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत सारखे त्यांचे काम चालू असे. आळशी मनुष्य त्यांना कधी आवडला नाही. आळसाने आयुष्य फुकट जाते, प्रपंचाची नासाडी होते; मग परमार्थ नाहीसा होईल हे काय सांगायला पाहिजे? आळस दैन्यपणा, आणि कष्टीपणा या तीन करंटेपणाच्या खुणा आहे. त्यांच्यापासून माणसाने दूर राहावे असे ते नेहमी सांगत. श्रीमहाराजांनी आपला देह अगदी खऱ्या अर्थाने पुष्कळ झिजविला.

संतोष: व्यावहारिकदृष्टया त्यांनी प्रयत्नाला मोठे स्थान दिले, परंतु आपल्याला जितका प्रयत्न करणे शक्य आहे तितका केल्यानंतर जे फळ मिळेल त्यात अत्यंत समाधान मानण्यास त्यांनी शिकवले. त्यांच्या मनाला काळजी कधीच शिवली नाही, आणि रामाने ज्या परिस्थितीत त्यांना ठेवले तिच्यात समाधान मानल्यावाचून ते कधी राहिले नाहीत.

जनप्रियत्व: कोणाच्याही अंत:करणाला धक्का पोहोचेल असे न वागणे, न बोलणे, हे तर त्यांचे व्रत होते. अंत:करण दुखवणे म्हणजे भगवंताला दुखविण्यासारखेच आहे, असे ते वारंवार सांगत. कोणीही कसाही असो, श्रीमहाराजांनी त्याला जोडला पण कधी तोडला नाही. ते जेथे गेले तेथे तेथे लोकांना हवेसे वाटले. इतकेच नव्हे तर गाव सोडून ते परत निघाले म्हणजे गावातील मंडळींच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय कधी राहिले नाही. अशा प्रकारचे जनप्रियत्व यावे म्हणून त्यांनी प्रत्येकाला जे हवे होते ते दिले असे मुळीच नाही; परंतु जो जो मनुष्य त्यांना भेटला त्याच्यावर त्यांनी आईसारखे प्रेम केले. या स्वच्छ व निष्कपट प्रेमामुळे त्यांना भेटणाऱ्या माणसाचा जीव शांत व तृप्त होई, आणि म्हणून तो त्यांच्या सान्निध्याचा भुकेला बने.

आर्जव: विद्वान-अडाणी, गरीब-श्रीमंत, माणूस कसाही असो, सर्वांशी श्रीमहाराजांचे बोलणे अतिशय गोड व आर्जवी असे. येणारा मनुष्य लक्ष देवो अथवा न देवो त्याच्या हिताची गोष्ट ते जीव तोडून सांगत असत.

मनापासून काम करणे: त्यांनी केलेली प्रत्येक कृती अत्यंत मनापासून असून त्यात एक प्रकारचे सौंदर्य असे. सामान्यातील सामान्य गोष्ट करताना जीव ओतून करावी असे त्यांचे सांगणे असे. तसेच पुष्कळ वेळ, कसेतरी करत नामस्मरण करण्यापेक्षा थोडा वेळ का होईना पण जीव ओतून केलेले नामस्मरण त्यांना आवडे.

व्यवहाराचा परमार्थासाठी उपयोग करून घेणे: श्री महाराज म्हणत, हे जग जर भगवंताने निर्माण केले असेल तर त्यात सर्वस्वी वाईट गोष्ट कशी असेल. त्यामुळे प्रपंच मुळात सर्वस्वी चांगला नाही तसा तो सर्वस्वी वाईटही नाही. आपण त्याचा उपयोग भगवंताच्या प्राप्तीसाठी करून घेतला पाहिजे.

कार्य

श्रीमहाराजांनी आपल्या चारित्र्याने लोकांना धडा घालून दिला. विचाराने संसाराचे अंतरंग शोधून काढण्यास शिकविले. भगवंताच्या निष्ठेने जीवनातील बऱ्यावाईट प्रसंगांना टक्कर देण्यास तयार केले. संस्कृतीचे व धार्मिकपणाचे बीज मनात रोवले. व आपल्या प्रत्येक माणसाला आत्मोन्नतीकडे सन्मुख होऊन वागण्याचे भाग्य या जन्मातच दिले. लोकांना शिकवण्याचा त्यांनी कधी कंटाळा केला नाही. कष्ट करताना ते कधी त्रासले नाहीत. त्यांनी चुकूनही कधी परपीडा केली नाही. दुसऱ्याला पाहून ते कधी हसले नाहीत व कोणाच्या मागे त्याचे उणे कधी काढले नाही. शरण आलेल्या निंदकाला त्यांनी कधी दूर लोटले नाही, स्वत:च्या प्रौढीची गोष्ट कधी सांगितली नाही, व आलेल्या माणसाला खायला घातल्याशिवाय त्याला कधी परत जाऊ दिले नाही. स्वत: सिद्ध असून साधन कधी सोडले नाही, व लोकसंग्रहामुळे पुढे पुष्कळ ऐश्वर्य आले तरी आपली उदासवृत्ती कधी सोडली नाही. भगवंताच्या नामाची थोरवी गात गात त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला. नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले, जन्मभर नामाचे त्यांनी गायन केले आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षणही नामाचे महत्त्व सांगण्यात त्यांनी घालविले. श्रीमहाराजांनी जन्मभर काया-वाचा-मनाने जगात एका नामाशिवाय दुसरे काही सत्य मानलेच नाही.

गोंदवलेकर महाराज - चरित्र आणि वाङमय - लेखक प्रा. के.वि. बेलसरे, यांच्या ग्रंथाच्या आधारे