गोंदवले येथील व्यवस्थापन:

श्रीमहाराज हयात असताना त्यांची स्वतःची मालकीची जी मिळकत होती त्याबाबतचे काही व्यवहार म्हसवडचे केसकर यांना माहीत होते व इतर सर्व व्यवहार श्रीमहाराज सांगतील त्याप्रमाणे त्याचेतर्फे गोपाळराव मोकाशी हे पाहात. श्रीमहाराजांनी १९१२ साली आपल्या मिळकतीचे एक व्यवस्थापत्र करून श्रीब्रह्मानंद, आप्पासाहेब भडगावकर, बापूसाहेब साठ्ये व तात्यासाहेब चपळगावकर यांना ट्रस्टी नेमले व सर्व मिळकतीचा श्रीरामदेव संस्थान हा ट्रस्ट केला. त्यांचेनंतर वरील ट्रस्टींनी सर्व इस्टेट ताब्यात घेतली व थोरले राममंदिर पुजारी गोपाळराव मोकाशी, धाकटे राममंदिर पुजारी दामूमामा देशपांडे, व दत्त-शनीमंदिर पुजारी बाळंभट जोशी, यांचेकडून नोकरनामे लिहून घेतले. या व्यवस्थापत्राप्रमाणेच सर्व मंदिरांची व्यवस्था आजपर्यंत चालू आहे. श्रीब्रह्मानंदमहाराज यांनी स्वतः पहिली दोन वर्षे हजर राहून श्रीमहाराजांचा पुण्यतिथीउत्सव केला. तसेच मंदिरातील नित्योपासना व उत्सवातील कार्यक्रमाची आखणीही करून दिली. दोन वर्षांनंतर ही सर्व जबाबदारी श्रीब्रह्मानंदांनी गणपतराव दामले यांचेवर सोपविली. ही जबाबदारी स्वीकारताना, हे काम आपल्या हातून पार पडणे कठीण आहे ह्या भावनेने श्रीब्रह्मानंदांना तसे म्हटल्यावर त्यांनी सांगितले की, “तूच काय, मी काडी उभी करीन आणि सर्व काही काडीकडून करवून घेईन. मी गोंदवल्यास कायम आहेच. जर कोणी हात उगारला तर वरचेवर धरून ठेवीन. तू पुढे होऊन कर, श्रीमहाराज कोणतीही गोष्ट कमी पडू देणार नाहीत. श्रींचे दर्शनास येतील त्यांना सारभाताला कमी करू नको. नामस्मरण, गोरक्षण आणि आलेल्यास प्रसाद (भोजन) हे श्रींचे आवडते कार्य गोंदवले येथे अखंड चालू राहिले पाहिजे.” असा त्यांनी आदेश दिला. गणपतराव दामले हे श्रीमहाराज हयात असताना त्यांचे सहवासात बराच काळ राहिले होते. त्यानंतर उत्सवाची पहिली दोन वर्षे त्यांनी श्रीब्रह्मानंद यांचेबरोबर काम केले होते. समाधीचे बांधकाम चालू असताना आप्पासाहेब भडगावकर यांनी स्वतः गोंदवल्यास राहून आपल्या देखरेखीखाली काम करून घेतले.

गेल्या १०० वर्षांत गोंदवले संस्थानचे प्रथम पासून खालील पंच आजपावेतो होऊन गेले.

श्रीब्रह्मानंद महाराज, श्री आप्पासाहेब भडगावकर, श्री बापूसाहेब साठ्ये, श्री तात्यासाहेब चपळगावकर, श्री पागा फडणीस, श्री गणपतराव दामले, श्री. मनोहर, श्री. दत्तोपंत तबीब, श्री. दत्तोपंत खाडीलकर, सरदार गिरवीकर, श्री. टेंबे, श्री. जगन्नाथपंत आठवले, श्री. गोपाळराव कर्वे, श्री. गोपाळस्वामी, डॉ. रघुनाथराव घाणेकर, श्री. अण्णासाहेब गाडगीळ, श्री. बापूसाहेब दामले, श्री. बाळासाहेब पाठक, श्री. सुरेशराव बोन्द्रे, श्री. वसंतराव मिजार

श्री. विश्राम पाठक, श्री. जयंत परांजपे, श्री. श्रीधर मनोहर, डॉ अवधूत गुळवणी हे विद्यमान पंच सध्या संस्थानचे व्यवस्थापन करतात. पहिले पदसिद्ध पंच श्रीमहाराज आहेतच.

हे सर्व कार्य श्रीमहाराजांच्या सत्तेने चालते अशी सर्व पंचांची भावना व श्रद्धा आहे.