गोंदवले येथे पुण्यतिथी महोत्सवास फार मोठ्या प्रमाणावर मंडळी येतात, दहा दिवस राहतात, स्वतःच्या उद्धाराकरिता समाधीसन्निध नाम घेतात व बाकीचा वेळ पडेल ती सेवा करतात. या दहा दिवसात मंदिरात अखंड भजन, प्रवचन, कीर्तन, शास्त्रीय गायन यांचे कार्यक्रम पहाटे ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत चालू असतात. भक्तांना ही आनंदाची पर्वणीच असते. हे सर्व श्रीमहाराजांचे सत्तेनेच चालते अशी प्रत्येकाची श्रद्धा आहे.

श्रींच्या पुण्यतिथी महोत्सवातील कार्यक्रम:

मुहूर्त मेढ : श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सवाची मुहूर्त मेढ मार्गशीर्ष शुद्धप्रतिपदेला रोवली जाते. त्यासाठी प्रथम विश्वस्तांच्या हस्ते श्रींची पूजा केली जाते.
श्रींचा पुण्यतिथी उत्सव मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेपासून- दशमीपर्यंत साजरा केला जातो.

कोठीपूजन : मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेस काकड आरती नंतर कोठीपूजनाचा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमाची सुरुवात सनईवादनाने होते. त्यानंतर ६.१५ ते ६.३० वेदघोष होतो त्यानंतर सकाळी ६.३० ते ६.५० ईशस्तवनपर भजनाचा कार्यक्रम संपन्न होतो. विश्वस्तांच्या हस्ते कोठीपूजनाचा कार्यक्रम होतो. श्रीब्रह्मानंदमहाराज यांनी सांगितल्यानुसार त्यांनी दिलेल्या ‘अक्षय पिशवी’ ची व तीमधील चांदीच्या रुपयाची प्रथम पूजा केली जाते. श्रीब्रह्मानंदमहाराज समक्ष हजर असून, कितीही मंडळी जमली तरी कोठीतील साहित्य कमी पडू देणार नाहीत अशी सर्वांची श्रद्धा आहे. अक्षय पिशवीबरोबर पालखीतील चांदीच्या पादुकांची व श्रीब्रह्मानंदमहाराज यांच्या फोटोची पूजा करतात. कोठीतील धान्य, स्वयंपाकघरातील चुली, वगैरेंची हळदकुंकू व फुले वाहून पूजा करतात. नंतर आरती होऊन प्रसाद वाटतात. सगळीकडे रांगोळ्या, फुलांची, भाज्यांची सजावट केलेली असते. कोठीपुजनानंतर, गोशाळेत गोमाता पूजन व नंतर स्वयंपाकघरात अग्निपूजन करतात. उत्सवास सुरुवात झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत असतो. हा उत्साहाचा संचार दहा दिवस उत्सव संपेपर्यंत कायमच असतो.

माळ व भजन पहारा : कोठीपूजनानंतर पहिल्या दिवशीच्या स्वयंपाकास सुरुवात होते. मंदिरातील नित्याची प्रातःकाल पूजा झाल्यावर पंचपदी भजन होते व श्रींच्या समाधीपुढे संकल्पाचा नारळ ठेवून माळ व भजनी पहाऱ्यास सुरुवात होते. हा पहारा अखंड चालून दशमीचे दिवशी दुपारचा महानैवेद्य झाल्यावर पुरा होतो. मंदिराचे सबंध आवार चोवीस तास नामघोषाने दुमदुमून जाते. गेली काही वर्षे स्त्रियांचाही वेगळा माळेचा पहारा असतो.

ब्रह्मानंदमंडप कार्यक्रम : दहा दिवस रोज सकाळी काकडआरतीने कार्यक्रमास सुरुवात होते. दिवसभर कार्यक्रम चालतात. रात्री ११ वाजता कीर्तन होऊन दिवसाची सांगता होते. निरनिराळ्या गावांहून भजनी दिंड्या येतात. अगोदर पत्रव्यवहाराने वेळा व दिवस ठरवून त्याप्रमाणे कीर्तनकार येतात. मोठ मोठे गायक आपली गायनसेवा श्रींसमोर सादर करतात.

लघुरुद्राभिषेक : काकडआरती कार्यक्रम समाधिमंदिरात होतो. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम ब्रह्मानंद मंडपात सुरू झाला की मंदिरातील सभामंडपात निरनिराळ्या ठिकाणांहून निमंत्रित अशा वैदिक मंडळींचेकडून श्रींचे पादुकांवर लघुरुद्राभिषेक सुरू होतो. लघुरुद्र झाल्यानंतर आरती होते.

दर्शन : श्रींच्या दर्शनाकरता १० दिवस सतत गर्दी असतेच. दर्शन शांततेने रांगेने होते. काही वेळा फार मोठ्या रांगा लागतात. रोज सकाळी ९.३० नंतर महापूजेस सुरुवात होते. श्रींचे पादुकांवर अभिषेक होतो. पालखीतील पादुकांची पूजाही त्याचबरोबर करतात. ही महापूजा यथासांग झाल्यावर पालखीत श्रींच्या पादुका व फोटो ठेवून पालखी नगरप्रदक्षिणेस निघते. गावातील प्रत्येक मंदिरात आरती होऊन पालखी मिरवणुकीने पुन्हा समाधिमंदिराकडे येते. मग मंदिराला बाहेरून १३ प्रदक्षिणा घालतात. ही पद्धत सज्जनगडावर आहे तशीच येथे चालू आहे.

श्रींचे पुण्यस्मरण : गुलालाचा कार्यक्रम: दशमीचे दिवशी भल्या पहाटे समाधी परिसरात सर्वत्र सडा-सम्मार्जन करून रांगोळ्या घालतात. मंडपात मंडळी जमू लागतात. काकडआरतीचा कार्यक्रम लवकरच उरकला जातो. त्यात प्रथम सनईने सुरूवात होते. मग ५.३० वाजेपर्यंत सुरेल स्वरात संथपणे ' रघुपति राघव राजाराम । पतितपावन सीताराम ॥’ हे भजन एकचित्ताने सामुदायिकरित्या म्हटले जाते.

श्रींचे पुण्यस्मरणाचा क्षण जवळ येत चालल्यामुळे मंडळी अधिकाधिक एकाग्रचित्त होत जातात. सतत दहा दिवस गुरुगृही अहोरात्र पडेल ती सेवा करून, त्यात नामाचे अनुसंधान टिकवून प्रत्येकाचे मन वाहत्या झऱ्याप्रमाणे उल्हसित झालेले असते. बरोबर ५ वाजून ५५ मिनिटांनी, सर्व भक्तमंडळी एकाच वेळी फुले उधळतात व ‘श्रीराम, श्रीराम” असा गजर आसमंतात दुमदुमतो. त्यानंतर सर्व आरत्या म्हटल्या जातात. नंतर समाधिमंदिरात सकाळचे भजन होते. "श्रीरामदासी भिक्षा" सकाळी ८ वाजता मंदिरातून निघते. गावातून जाऊन परत समाधि मंदिरात येते. नंतर समाधि मंदिरात १३ कोटी जपाची सांगता होते व नवीन संकल्प केला जातो.

अशा तऱ्हेने १०० हून अधिक वर्षे ही परंपरा अखंडित चालू आहे व भक्त मंडळी बदलत असली तरी सर्वांचा भाव व उत्साह तोच आहे.