गोंदवले संस्थान परिचय

कोणत्याही काळी एखादे आध्यात्मिक संस्थान अयाचित वृत्तीने चालवणे आणि ते मूळपुरुषाच्या ध्येयवादाला शोभेल असे वर्षानुवर्षे चालवणे महाकर्म कठीण आहे. त्यातही आजची सामाजिक अस्थिरता, सर्वत्र फोफावलेला चंगळवाद व स्वार्थ अशा परिस्थितीतही शुद्ध, कोरे अध्यात्म जसेच्या तसे सांभाळणे आणखीनच दुष्कर झाले आहे. पण अशाही परिस्थितीत नामाचा अभ्यास करणारी, भगवंतावर जीवनाचा भार सोपवून समाधानाने मृत्युला सामोरी जाणारी नि:स्वार्थी व निर्भय माणसे तयार करणे हे गोंदवल्या सारख्या संस्थानाचे प्रधान कार्य आहे.

गोंदवले संस्थान ही अशी एक आध्यात्मिक संस्था असून, श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या समाधीला केंद्रस्थानी ठेवते. सगुणाची निष्काम उपासना, सतत नामस्मरण आणि आल्यागेल्याला यथाशक्ती अन्नदान या त्रयीवर संस्थानचे सारे अध्यात्म आधारलेले आहे. काळ बदलला, माणसे बदलली, वातावरण बदलले पण संस्थानच्या आध्यात्मिक गाभ्याला यत्किंचितही धक्का लागला नाही.

या गोंदवले संस्थानाकरता श्री ब्रह्मानंद महाराजांनी आपली तपश्चर्या ओतली आहे. या संस्थेची कायमची बांधलेली एक व्यवस्थित संघटना आहे. या संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते, ज्यांना पंच म्हणतात, वेळोवेळी विद्यमान पंचांकडून निवडले जातात. आत्तापर्यंत अनेक पंच होऊन गेले. सुदैवाने पण श्रीमहाराजांच्या योजनेप्रमाणे गोंदवल्याच्या संस्थेस एकामागून एक नि:स्वार्थी, कृतिशील, नाम घेणारे आणि महाराजांवर प्रेम करणारे संचालक लाभले. आपसातील किरकोळ मतभेद बाजूला ठेवून सर्व पंच एक मताने वागत आले. त्यामुळे आज वर्षानुवर्षे संस्थानचे कार्य गाजावाजा न करता श्रीमहाराजांना पसंत पडेल अशा पद्धतीने चालू असल्याचे पाहायला मिळते.

गोंदवल्याच्या बाबतीत मोठी लक्षणीय गोष्ट अशी की आत्तापर्यंत सर्व पंचांनी श्री ब्रह्मानंद महाराजांनी घालून दिलेली उपासना पद्धती जशीच्या तशी सांभाळली. त्यामुळे संस्थानामध्ये एक निरोगी द्विमुखी पंरपरा निर्माण झाली. एकीकडे ती श्री महाराजांना सन्मुख आहे. तर दुसरीकडे ती भक्तसेवेला सन्मुख आहे. म्हणून एकीकडे श्रीमहाराजांची नित्योपासना यथासांग चालण्याकडे चालकांचे सूक्ष्म लक्ष असते तर दुसरीकडे दर्शनार्थी भक्तांची शक्य तितकी सोय करण्याकडे चालक मनापासून लक्ष पुरवतात.

संस्थेच्या इतिहासामध्ये शंभर वर्षे म्हणजे काही मोठा काळ नव्हे. भक्तांच्या दोनचार पिढ्या उपासना चालू ठेवतात तेव्हा संस्था खरी वयात येते. गोंदवल्याच्या बाबतीत ही अडचण नाही. आत्तापर्यंत येथे अशी बरीच माणसे तयार झाली, ज्यांना जीवनामधील अनेक प्रसंगी श्रीमहाराजांच्या सहाय्याचा निर्णायक व नि:संशय अनुभव आला. त्यांच्या मुळेच गोंदवल्याचे आत्मतेज रसरशीतपणे टिकले आहे. श्रीमहाराजांच्या उत्सवाला नियमाने येणाऱ्या स्त्री-पुरुषांची तरुण सुशिक्षित मुले आपल्या आईवडिलांचा कित्ता गिरवतात. तेही नियमाने उत्सवाला येतात, आणि आपल्याकडून होईल तेवढी सेवा मनापासून करतात. श्रीमहाराजांवर सर्वांचे प्रेम आहे. प्रत्येकजण घरी श्रीमहाराजांची आरती व नामस्मरण करतो. याकारणाने, संप्रदायाची परंपरा खंडित होण्याचा संभव नाही.

‘गोंदवल्याच्या संस्थानचा इतिहास म्हणजे श्रीमहाराजांच्या संकल्पाचा खेळ आहे ‘ -स्मरणिका शताब्दी महोत्सव