पूर्वपीठिका व इतिहास

समाजाला सुख समाधान देण्यासाठी दोनच माणसे खरी उपयोगी पडतात. एक डॉक्टर आणि दुसरा संत. डॉक्टर देहाचे रोग बरे करतो आणि संत मनाचे रोग बरे करतो. श्रीमहाराज अत्यंत कनवाळू होते. लोक त्यांना दयासिंधूच म्हणत. प्रपंचात दीन झालेल्या लोकांना त्यांनी अधिक जवळ केले. त्यांचेकडे आलेल्या मंडळींचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य कसे राहील याकडे बारकाईने लक्ष असे. सामान्य मनुष्य देहास असह्य रोग झाला म्हणजे जास्त दीन होतो हा सर्वांचा अनुभव आहे. श्रीमहाराज देहात असताना अशा लोकांना स्वत: औषधे देत किंवा डॉक्टर-वैद्य मंडळींकडून त्यांना औषधे देववीत.

गोंदवल्यास गेली अनेक वर्षे रोजच्या उपासनेबरोबरच विनामूल्य बाह्यरुग्णसेवा चालू होती. गोंदवल्यास दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या जसजशी वाढू लागली तशी त्यांचेकरता व गावातील गरीब लोकांसाठी दवाखाना काढून १९८३ साली डॉ. अप्पा आठवले यांच्या पुढाकाराने येथील समाधीमंदिर परिसरातच दवाखाना सुरू करण्यात आला. प्रारंभी प्रमुख विश्वस्त डॉ. घाणेकर हेच डॉक्टर म्हणून काम पाहत होते. १९९८ पासून डॉ. फडणीस हे डॉ. घाणेकरांच्या मार्गदर्शनाखाली दवाखान्याचे काम पाहू लागले. जसजसा दवाखाना अधिक कार्यरत होत गेला तसतशी पेशंटस् ची संख्याही वाढत चालली. आजूबाजूच्या खेड्यापाड्यांतून रुग्ण येऊ लागले व ही दवाखान्याची जागा कमी पडू लागली. म्हणून चारपाच वर्षांच्या अवधीत समाधीमंदिराच्या आवाराचे समोर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस प्रशस्त आवारात एक स्वतंत्र छोटी इमारत (सुमारे ५०० स्क्वे.फू.) बांधून तेथे मोठ्या प्रमाणावर पेशंटस् वर औषधोपचार सुरू झाले. १९९२-९३ सालापर्यंत या दवाखान्यास चांगलेच स्वरूप प्राप्त झाले. डोळे, कान नाक-घसा व दंतरोग यांच्या विशेष तपासण्या व त्यावर औषधयोजना नियमितपणे सुरू झाले.

नवीन आधुनिक रुग्णालयाचा श्रीगणेशा

माण प्रदेश हा तसा दुष्काळी भाग. लोक अत्यंत गरीब, शेतीचे उत्पन्न तुटपुंजे, त्यामुळे गोंदवले सभोवतालचा बराच मोठा प्रदेश हा आधुनिक वैद्यकसेवेपासून वंचित राहिलेला असा भाग होता. कुणास मोठे दुखणे झाल्यास त्याला शहरात नेऊन औषधयोजना करणे त्यांच्या अवाक्याबाहेरचे होते. ही परिस्थिती पाहून गोंदवल्यास एखादे हॉस्पिटल काढून तिथे गरीबांसाठी विनामूल्य सुविधा व ऑपरेशन्सच्या सोयी पुरवाव्यात असा विचार विश्वस्तांनी केला. ऑपरेशन थिएटरची मांडणी व त्याच्या अनुषंगाने लागणाऱ्या सुविधा कशा असाव्यात यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची मते आजमावण्यात आली. याप्रमाणे गोंदवले येथे समाधीमंदिराच्या समोर सातारा-पंढरपूर रस्त्यावर भव्य व सुंदर अशी रुग्णालयाची इमारत बांधली गेली व रविवार दि. १मे १९९४ रोजी श्रीमहाराजांचे थोर भक्त पूज्य केशवरावजी उर्फ बाबा बेलसरे यांचे हस्ते श्रीमहाराजांच्या फोटोचे पूजनाने, रुग्णालयाच्या कार्याला सुरुवात झाली. पूज्य बाबा बेलसरे यांनी यावेळी अशी सूचना केली की ह्या रुग्णालयाचे कार्य हे मूळ मंदिराच्या कार्याचा एक भाग आहे हे विसरता कामा नये. थोडक्यात म्हणजे मंदिरातील नित्यनैमित्तिक उपासना वगैरे सर्व योग्यप्रकारे सांभाळून व संस्थेच्या आध्यात्मिक गाभ्याला धक्का न लावता हे रुग्णालयाचे कार्य केले पाहिजे. श्रीचैतन्य हॉस्पिटलच्या इमारतीच्या उद्घाटनानंतर लगेचच डॉ. बावडेकरांच्या पुढाकाराने रुग्णालयाला लागणाऱ्या सर्व वस्तूंची खरेदी करून रुग्णालयात मोठी ऑपरेशन्स करण्याच्या दृष्टीने रुग्णालय सुसज्ज करण्याचे काम सुरू झाले. तीन-चार महिन्यातच बहुतेक व्यवस्था पूर्ण झाली. दरम्यान आजूबाजूच्या खेड्यातील मंडळींना असे रुग्णालय गोंदवले येथे झाले आहे असे समजावे

म्हणून व हॉस्पिटलच्या कार्याची सुरुवात या दृष्टीने पुण्या-मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांच्या सहाय्याने दोन भव्य शिबिरे घेण्यात आली. जवळजवळ २४०० पेशंटस् नी त्या शिबिरांचा लाभ घेतला. या शिबिरात नेत्रचिकित्सा विभागात सर्वाधिक रुग्ण होते.

रुग्णालय आजचे

हे रुग्णालय गोंदवले संस्थानने बांधले असून त्याची सर्व व्यवस्थाही संस्थानच पहाते. गोंदवल्यास दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने गरीब रुग्णांची संख्या अधिक असते. गोंदवल्याचे चैतन्य रुग्णालय काळानुरूप विस्तारत गेले. श्रीमहाराजांना अभिजात व उत्तुंग कार्याची अत्यंतिक आवड होती, त्यामुळेच आरोग्यशास्त्रातील अभिजात नाविन्यपूर्ण व रुग्णांना उपयुक्त अशा अत्याधुनिक उपकरणांनी हॉस्पिटल सुसज्ज होत गेले.

यामध्ये जनरल तपासणी, स्त्रीरोग तपासणी, सोनोग्राफी, नेत्ररोग तपासणी या विभागांमध्ये आधुनिक चेअर युनिट, स्लीट लॅम्प, केरॅटोमीटर, ए-स्कॅन, डिजिटल एक्स रे मशिन अशा सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पॅथोलॉजी लॅब उभारण्यात आली व येथेही ऑटोअॅनॅलायझर, सेल काउंटर, मायक्रोस्कोप अशी आधुनिक मशिन्स ठेवण्यात आली आहेत. तसेच मंदिरातील पाण्याच्या तपासणीसाठी वॉटर अॅनालिसिस यंत्रणा उभारण्यात आली आहे. जनरल वॉर्ड, डोळ्यांच्या पेशंटसाठी वेगळा वॉर्ड, क्रिटिकल, गंभीर रुग्णांसाठी आयसीयु असे सर्व मिळून ५० बेड असणाऱ्या अशा भव्य हॉस्पिटलमध्ये जवळजवळ ९० निष्णात डॉक्टर्स येऊन आपली सेवा श्रीमहाराजांच्या चरणी अर्पण करीत आहेत.

केवळ दुर्गम भागातील अत्याधुनिक हॉस्पिटल हेच गोंदवल्याच्या चैतन्य रुग्णालयाचे वैशिष्टय नाही तर इथे श्रीमहाराजांची सत्ता कार्य करते व आपण फक्त निमित्तमात्र आहोत अशी येथे सेवा करणाऱ्या डॉक्टरांची प्रामाणिक भावना आहे. एव्हढेच नव्हे तर श्रीमहाराजांच्या हॉस्पिटलमध्ये आपण आलेलो आहोत व आपल्या उपचाराची सर्व सूत्रे त्यांच्या हातात असल्याने आपण निश्चित बरे होणार अशी रुग्णाची श्रद्धा आहे. हा केवळ कल्पनाविलास नसून गेल्या १५ वर्षांमध्ये झालेल्या १६००० हजारहून अधिक शस्त्रक्रियांमध्ये एकही रुग्ण आजतागायत दगावलेला नाही. श्रींच्या सत्तेची याहून वेगळी प्रचीती काय हवी? खरोखर आजच्या व्यावहारिक जगामध्ये श्रीमहाराजांच्या श्रद्धेवर अत्याधुनिकतेचा आधार घेत गोरगरीब रुग्णांना विनामूल्य सेवा देणारे चैतन्य हॉस्पिटल हे एक विरळातील विरळ उदाहरण आहे.