प्रत्येक माणूस या ना त्या मार्गाने समाधान शोधत असतो. पण सुख दु:खाचे हेलकावे देणे हा प्रपंचाचा मूळ स्वभाव असल्याने त्याच्या आहारी जाणाऱ्या माणसाला प्रापंचिक यश मिळून सुद्धा जीवनाच्या अखेर पर्यंत समाधान मिळत नाही. नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्यजन्माचे ध्येय नाही. जनावरे देखील आपापला प्रपंच करतात. आपल्या खऱ्या स्वरूपाचा म्हणजे भगवंताचा विसर पडणे हे सर्व असमाधानाचे मूळ आहे. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली, तरच प्रपंचातील कष्टांचे सार्थक होते. असे श्रीमहाराजांचे अनुभवसिद्ध मत आहे.

 

अंत:करण शुद्ध होऊन पूर्ण समाधानाचा व खऱ्या आनंदाचा साक्षात्कार होण्यासाठी संताची संगत व भगवंताचे नाम हे दोनच उपाय प्रापंचिकाच्या पचनी पडतात. त्यातदेखील संताची संगत मिळणे व टिकणे कठीण असते. परंतु नामस्मरणाला कसलीही अट नाही, कसलेही बंधन नाही, त्यातच सत्संगती लाभते व भगवंताचे चिंतन आपोआप घडते. चिंतनातून अनुसंधान उदय पावते आणि अनुसंधान पक्के झाले की स्वत:च्या हृदयात भगवंताचे दर्शन घडते. हे श्रीमहाराजांच्या उपदेशाचे सार आहे.

प्रपंचामध्ये का होईना, पण निष्कपट प्रेम करावयास शिकणे हे भगवंतावर प्रेम करावयास शिकण्याची पहिली पायरी आहे. घरच्या माणसांना दीनवाणे व कष्टी कधी ठेवू नये, त्यांची आबाळ कधी करू नये, असे सांगून श्रीमहाराज म्हणत की ज्या प्रपंचात राम नाही त्या प्रपंचात आराम होणार नाही! नवराबायकोमध्ये, आईबाप व मुलांच्यामध्ये, भाऊबहिणींच्यामध्ये निष्कपट प्रेम असले तर त्यांना त्याचे विशेष कौतुक वाटायचे. सासू-सून प्रेमाने राहिल्या तर ते दोघींचीही स्तुती करीत. ’आपला परमार्थ हा प्रपंचात मिसळला पाहिजे. प्रपंच करीत असताना कर्तव्याची जागृती राखून त्यामध्ये भगवंताची अखंड स्मृती ठेवली तर कोणालाही समाधानाची प्राप्ति होऊ शकते.’ असे महाराजांचे सांगणे आहे.

श्रीमहाराज सांगत,’ बाळ, भगवंताने प्रपंचामध्ये ज्या परिस्थितीत आपल्याला ठेवले आहे, तिच्यामध्ये समाधान मानावे आणि त्याच्या नामाला कधी विसरू नये. जो नाम घेईल त्याच्यामागे राम उभा आहे, नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो. एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका.’