नाम आणि प्रेम ही जुळी भावंडे आहेत.
साधारण प्रापंचिकाची ओढ विषयाकडे असते. आज सुख कशात आहे एवढेच तो बघतो, आणि विषयात तो इतका तल्लीन होतो, की जगालाही तो तुच्छ मानतो. विषय शेवटी दु:खालाच कारणीभूत होतात हे तो विसरतो. विषय आणि मी एक होतो तेव्हा सुख होतेसे वाटते. पण वास्तविक, आजवर कुणालाही विषयाने शाश्वत सुख आणि समाधान मिळालेले नाही. असे सुख आणि समाधान मिळवण्यासाठी आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवणे हा एकच उपाय आहे. वृत्ती नेहमी एकाकार व्हावी, पण ती विषयात न होता नामात व्हावी, हेच सर्व संतांचे सांगणे आहे. &lsquo...