दिनक्रम

श्रीमहाराजांच्या अस्तित्व भावनेने आज १०० वर्षाहून अधिक काळ गोंदवल्यास उपासना चालू आहे. श्रीगुरूंच्या समाधीला केंद्रस्थानी ठेवून त्रिकाळ पूजा, आरती, नैवेद्य, भजन, कथा-कीर्तन, श्रवण-मनन व सर्वात महत्वाचे नामस्मरण या भक्ती मार्गाच्या साधनांचे नित्य आचरण आजही येथे मनापासून केले जाते. तसेच त्यांना आवडणारे ‘मुक्तहस्ते अन्नदान’ यातही इतक्या वर्षात खंड पडला नाही. त्यामुळे आजही श्रीगुरूंच्या अस्तित्वाची प्रचिती या गोंदवल्याच्या पवित्र भूमीत पदोपदी येते.

1/2

नामस्मरण

गोंदवले हे आध्यात्मिक केंद्र आहे. जेथे नाम तेथे महाराजांचे स्थान. नामाची गोडी व अनुभव प्रत्येक साधकास यावा या दृष्टीने वरचेवर तेरा कोटी रामनामजप संकल्प करून ते पार पाडले जातात. दरवर्षी त्यांची सांगता पुण्यतिथी उत्सवात होत असते. दरवर्षी १३ कोटी रामनाम जपसंख्या पूर्ण करण्यात येते. पुण्यतिथीच्या दिवशी पुन्हा संकल्प सोडण्यात येतो. तो पुढील पुण्यतिथीपर्यंत पूर्ण करण्यात येतो. रोज मंदिरात सकाळ-दुपार सामुदायिक जप केला जातो. तसेच वेळोवेळी नामसाधना शिबिरे आयोजीत करण्यात येते व यासाठी बरेच भक्त येऊन ५-६ दिवस रहातात व या जपयज्ञामध्ये आनंदाने सहभागी होतात. या व्यतिरिक्त गावोगावचे भक्त त्या त्या उपासना केन्द्रात केलेला जपही मोठ्या श्रद्धेने दर उत्सवामध्ये श्री महाराजांचरणी अर्पण करतात.