पवित्र स्थानांच्या नियमित दर्शनाने आपले मन व विचार पवित्र होत जातात व अनुसंधान टिकून राहते. त्यास अनुसरून श्रीमहाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी गुरुवारी व पौर्णिमेस येण्याची, म्हणजेच वारी करण्याची, प्रथा समाधी इतकीच जुनी आहे. गोपाळराव फडके लिखित ‘श्रीसद्गुरूलीलामृत’मध्ये तसा उल्लेख आहे. ७०-८० वर्षांपूर्वी येणारी मंडळी बहुतांशी जवळची, किंवा फलटण, वालचंदनगर, सातारा, पंढरपूर अशा मध्यम अंतरावरची असत. पुणे, सांगली अशा दूरच्या ठिकाणांहूनही येणारी काही मोजकीच मंडळी असत. ही मंडळी साधारणपणे सकाळी नऊ-दहा पासून जमा होऊ लागत आणि आरती, दर्शन व प्रसाद घेऊन दुपारपर्यंत परत जात. पण अलीकडे गोंदवले येथे ठिकठिकाणाहून येणाऱ्या बससेवा खूपच वाढल्या आहेत. त्यामुळे पौर्णिमेची वारी करणाऱ्यांची संख्या वाढून आता तिला एखाद्या छोट्या उत्सवासारखे स्वरूप आले आहे. आता आदल्या दिवसापासूनच बरीच गर्दी होते व पौर्णिमेच्या दिवशी तर दर्शनाला जवळपास ५० हजार ते १ लाख तर महाप्रसादाला १५ ते ३५ हजार भक्त असतात.