श्रीमहाराजांचे प्रमुख अधिकारी शिष्य

श्रीपांडुरंगबुवा (श्रीरामानंद महाराज)

वऱ्हाडातील चांदकी या गावी सन १८८६ मध्ये श्रीपांडुरंगबुवांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना भजनकीर्तनाची आवड होती. आठव्या वर्षी त्यांची मुंज झाली. लहानपणी वडील वारले, म्हणून त्यांचे मामांनी त्यांना नागपूर येथे घरी नेले व शाळेत घातले. पुढे ते काशीला गेले. काशीक्षेत्री चार महिने राहून अनुष्ठान केले. अनुष्ठान समाप्तीचे वेळेस त्यांना समर्थांचा दृष्टांत झाला - गोदातीरी जा, तिथे तुला दीक्षा मिळेल. तेथे लोक त्यांना श्रीपांडुरंगमहाराज म्हणू लागले. काशीहून ते गोदातीरी मंगरूळ क्षेत्री आले. तेथील मठाचे अधिकारी पुरुष श्रीअंबादास यांनी त्यांना रामदासी दीक्षा दिली व रामानंद हे नाव ठेवले. पुढे जालना येथे श्रीआनंदसागर यांचेकडे जाण्यास त्यांना सांगितले. श्रीआनंदसागरांनी त्यांना गोंदवल्यास श्रीमहाराजांकडे नेले.

श्रीमहाराजांनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले व जवळ बसवून अनुग्रह दिला. श्रीमहाराज त्यांना पांडुरंगबुवा म्हणून हाक मारीत . एक वर्षाच्या वास्तव्यानंतर श्रीमहाराजांनी त्यांना आज्ञा केली की, एका वस्त्रानिशी तीर्थाटनास निघावे, जवळ भांडेही ठेवू नये. भिक्षा मागून रामरायास नैवेद्य दाखवून अन्न भक्षण करावे. मौन धरून नामस्मरण करीत जावे. रात्री भजन करावे. याप्रमाणे चातुर्मास करून तीर्थाटन करून परत येऊन भेटावे. याप्रमाणे आज्ञापालन करून परत आल्यावर श्रीमहाराज प्रसन्न झाले. चातुर्मास मौन आणि निरशन, फक्त द्वादशीस नैवेद्य, तेच भोजन व तीर्थाटन - असे व्रत सांगून, श्रीगुरुपौर्णिमेस गोंदवल्यास यावे अशी आज्ञा केली. त्याप्रमाणे रामानंदांनी कित्येक वर्षे बारा ज्योतिर्लिंगे, सप्तपुर्‍या, चारीधाम, गंगाप्रदक्षिणा अशा तीर्थयात्रा केल्या. बद्रीनारायणास तीन वेळा जाऊन आले. रामनवमी जालना येथे, गुरुपौर्णिमा गोंदवले येथे व दासनवमी मंगरूळ येथे, असे तीन क्षेत्री न चुकता जात असत. श्रीमहाराजांनी त्यांना अनुग्रहाचा अधिकार देऊन श्रीरामोपासनेचा प्रसार करण्यास सांगितले. श्रीमहाराजांनी त्यांचा विवाह गोंदवले येथे स्वत:च्या समोर श्रीआनंदसागरांच्या कन्येशी करून दिला. श्रीमहाराजांनी त्यांना उपासनेसाठी गंडकी शिळेवर ओतलेले श्रीराम पंचायतन दिले. परंपरेने प्राप्त झालेले हे पंचायतन आजही साखरखेर्डा येथील मंदिरात पाहावयास मिळते.

श्रीमहाराजांचे आज्ञेप्रमाणे त्यांनी वऱ्हाडात व मराठवाड्यात श्रीरामनामाचा खूप प्रसार केला. परस्त्री मातेसमान मानून सांगितलेला जप जो करील त्याला ते अनुग्रह देत. खडतर वैराग्य व सदगुरुभक्तीच्या दिव्य तेजाने अल्पावधीतच अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. जालना येथील श्रीआनंदसागरांनी उभे केलेल्या राममंदिरची व्यवस्था त्यांनी सांभाळली. एका सधन भक्ताने सभामंडपाचा सर्व खर्च देऊ केला असता तो नाकारून श्रीरामानंदांनी भिक्षेने पैसे जमा करून मंदिराचा मोठा सभामंडप आपल्या देखरेखीखाली बांधविला. ते अभिजात कवी होते. त्यांची काव्यशक्ती फार मोठी होती. त्यांनी श्रीमहाराजांवर सुंदर कवने केली आहेत. गोंदवले येथील नित्योपासना ग्रंथात त्यांनी केलेली पदे दिली आहेत. त्यांनी महाराजांवर अनेक सुंदर भावपूर्ण कवने केली आहेत. ते भजनेही फार सुंदर म्हणत. एकतारीवर ते भजन म्हणू लागले म्हणजे त्यांचे देहभान हरपून जाई.

गोंदवल्यास देह ठेवण्याचे भाग्य श्रीरामानंदांना मिळाले. त्यांची तशी इच्छा होती, ती श्रीमहाराजांनी पुरविली. रामानंदांची श्रीमहाराजांवर अत्यंत निष्ठा होती. त्यांच्या आज्ञेचे ते तंतोतंत पालन करीत असत. १९३० साली बुवांनी गोंदवल्यास आपला देह ठेवला. त्यांच्या पद्यातील चरण त्यांनी सत्य करून दाखविले - धन्य तेचि भूमी । धन्य ते चरण । धन्य ते मरण । तया ठायी ॥