श्रीब्रह्मानंद हे श्रीमहाराजांचे पूर्णत्वाला पोचलेले ब्रह्मज्ञानी कल्याण शिष्य होते. सद्गुरुंसाठी त्यांनी सर्वस्व देण्यास मागेपुढे पाहिले नाही. मोठ्या कष्टाने मिळविलेली सगळी विद्या त्यांनी गुरुचरणी वाहून टाकली व गुरुआज्ञापालन हेच साधन केले. ज्या हिरिरीने त्यांनी पूर्वायुष्यात शास्त्रांचा अभ्यास केला, त्याच हिरिरीने त्यांनी नामाचा अभ्यास केला व आपली जिव्हा रामनामासाठी वाहून घेतली. आपल्या हयातीत आपले महत्त्व वाढू न देता आपल्या सद्गुरूंचीच प्रतिष्ठा त्यांनी वाढविली.
श्रीब्रह्मानंदांचा जन्म कर्नाटकातील जालिहाळ या गावी २७ फेब्रुवारी १८५९ रोजी झाला. त्यांचे नाव अनंत असे ठेवण्यात आले. बालपणी अनंताचे लक्ष शाळेतील अभ्यासाकडे नसून खेळण्याकडेच होते. वडील श्री. बाळंभट्टांनी ८ व्या वर्षी अनंताची मुंज केली अनंतापाशी कुशाग्र बुद्धी व उत्तम स्मरणशक्ती असल्यामुळे संस्कृत स्तोत्रे व वेदमंत्र अनंताने भराभर मुखोद्गत केले. चौदा वर्षांचे असताना, मेणसगी येथे श्री. धोंडभट्ट दादा मोडक यांचेकडे त्याने वेदाध्ययनास सुरुवात केली. मेणसगी येथे तीन वर्षे राहिल्यावर मोडकांच्या आज्ञेवरून मुळगुंद येथे श्री. गुरुनाथशास्त्री यांचेपाशी अनंताने वेदाध्ययन केले. तीन वर्षांत तर्क, साहित्य व व्याकरण यांचा अभ्यास संपविला. त्यांची विद्या पाहून लोक त्यांना अनंतशास्त्री या नावाने संबोधू लागले. यानंतर अनंतशास्त्री यांनी गदग व सोर्टूर येथे काही दिवस राहून वेदांतशास्त्राचा पुढील अभ्यास केला. यामुळे त्यांची विरक्तवृत्ती वाढून ईश्वरोपासना व सत्संग यांत त्यांचा अधिक वेळ जाऊ लागला. पण याच सुमारास त्यांच्या हातापायावर कोडाचे डाग दिसू लागले. या रोगामुळे आपण कष्टाने मिळविलेली विद्या फुकट जाणार की काय असे त्यांना वाटू लागले. एकंदर जीवनाचा अर्थ काय? हा प्रश्न त्यांना सतावू लागला व ते अंतर्मुख झाले. पुढे श्रीवेंकटेशाचा दृष्टांत होऊन सदगुरूभेटीसाठी उत्तर भारतात जाण्याचा आदेश मिळाला. श्रीमहाराजांचे शिष्य भय्यासाहेब मोडक यांनी सुचविल्यावरून श्रीब्रह्मानंद श्रींचे दर्शनास गेले. त्यांच्या चित्ताची होत असलेली तळमळ शांत झाली. त्यांची योग्यता पाहून श्रींनी त्यांना अनुग्रह दिला. तेथून श्रींबरोबर ते गोंदवल्यास आले. तेथे अहोरात्र त्यांनी श्रीमहाराजांची सेवा केली. श्रीमहाराजांच्यासमोर ते कधीही बसले नाहीत. सदैव हात जोडून, बाजूला अगर मागे उभे राहत. श्रीमहाराजांनी हाक मारली की, ‘जी’ म्हणून पुढे येत व त्यांचे म्हणणे ऐकून काहीही न बोलता त्यांची आज्ञा पार पाडीत. त्यांची शरीरकष्टाची तयारी, सेवावृत्ती, वैराग्य, भगवद्दर्शनाची आतुरता इत्यादी गुण पाहून श्रीमहाराजांना संतोष झाला. अनंतशास्त्री यांच्याकडून अधिक परमार्थसाधन करून घेण्यासाठी श्रीमहाराजांनी त्यांना नर्मदाकाठी सर्पेश्वरी येथे जाऊन श्रीराममंत्राचे साडेतीन कोटीचे पुरश्चरण करण्याची आज्ञा केली. तेथे राहून अडीच वर्षे तप केल्यावर त्यांचा ग्रंथीभेद झाला व अष्टसात्त्विकभाव प्राप्त झाले. तेव्हा श्री महाराजांनी दर्शन दिले व त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांचे ‘ब्रह्मानंद’ हे नामकरण केले व जपानुष्ठान संपवून इंदुरास येण्याची आज्ञा केली. नंतर काही काल गोंदवल्यास वास्तव्य झाल्यावर काही दिवसांनी श्रीमहाराज त्यांना म्हणाले, ‘ब्रह्मानंदबुवा झाडाखाली झाड वाढत नाही. हा एक रुपया तुम्ही लक्ष्मीचा प्रसाद म्हणून घ्यावा, आणि कर्नाटकात जाऊन रामनामाचा प्रसार करावा’. पुढे ब्रह्मानंद कर्नाटकात बेलधडीस आले व तेथे त्यांनी राममंदिर बांधले. वेंकटापूर येथील मंदिराचा जीर्णोद्धार केला. श्री ब्रह्मानंदानी आपल्या आयुष्यात संपूर्ण कर्नाटकात उपासनामार्गाचा खूप प्रचार केला. श्रीब्रह्मानंदांचे शेवटचे मोठे कार्य म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या समाधिमंदिराची उभारणी व तेथील उपासनापद्धतीची व पुण्यतिथीउत्सवाची व्यवस्था करणे. शके १८३६ (सन १९१४) च्या मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेस गोंदवले समाधिमंदिरात, श्रीमहाराजांच्या पादुकांची स्थापना श्रीब्रह्मानंदांच्या देखरेखीखाली झाली. पहिल्या दोन उत्सवांस ते स्वतः हजर होते. श्रीब्रह्मानंदांनी घालून दिलेल्या पद्धतीप्रमाणेच गेली शंभर वर्षे पुण्यतिथी उत्सव साजरा होत आहे. उत्सवाचे प्रारंभी कोठीपूजन होते, त्यात कोठीचे अधिष्ठाते म्हणून श्रीब्रह्मानंदांच्या प्रतिमेचे पूजन होते.
सन १९१८ मध्ये कागवाड येथील जवळच नवबाग येथे नामस्मरण करीत हा श्री महाराजांचा कल्याण शिष्य अनंतात विलीन झाला. त्यांनी आधी सांगून ठेविल्याप्रमाणे त्यांचा देह कृष्णानदीत विसर्जन करण्यात आला. नवबाग येथे श्रीब्रह्मानंदांचे समाधिमंदिर बांधण्यात आले आहे.