श्रीमहाराजांची मंदिरांविषयींची कल्पना अगदी स्पष्ट होती. सोन्याचांदीने मढवलेल्या भव्य मंदिरांपेक्षा साध्या दगडविटांनी बांधलेली छोटी मंदिरेच श्रींना पसंत होती. मंदिराविषयी ते म्हणत की,
‘मंदिर साधे पण स्वच्छ असावे; तिथे उत्तम उपासना चालावी. मुख्य भर त्यामध्ये चालणाऱ्या नामाच्या उपासनेला असावा. मंदिरात नुसते पुष्कळ लोक जमविण्यापेक्षा थोडेच लोक पण नामात राहिले तर जास्त चांगले. मंदिरातील सामूहिक वातावरणाने मन एकाग्र होण्यास व उपासना नेटाने होण्यास चांगली मदत व्हावी. रामावर भरवसा ठेवावा व कोणाकडे काही मागू नये. मंदिरात एकमेकांशी नम्रतेने वागावे. रामाचे स्मरण सतत होण्यासाठी आणि ते टिकविण्यासाठी भगवंताचा उत्सव करावा. रामाची भक्ती करण्याने आपला संसार अगदी कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल. नामात दंग व्हा, मग राम पाठीमागे आहे याचा अनुभव येईल.’
श्रीमहाराजांच्या वेळेपासुन असलेली मंदिरे बांधून बराच काळ झाला असल्यामुळे या सर्व मंदिरांचा क्रमशः जीर्णोद्धार करण्यात आला. थोरले राम व धाकटे राम तसेच शनीमंदिर व दत्त मंदिराच्या इमारती नवीनच बांधल्या आहेत. या मंदिरांच्या पुजाऱ्यांच्या राहण्याच्या जागा पडीक झाल्यामुळे त्या पुन्हा नव्याने बांधल्या आहेत. या सर्व मंदिरांतून रोज काकडआरती, पूजा, सायंआरती, दुपारचे पोथी वाचन, वगैरे उपासना कार्यक्रम होत असतात. मंदिरांचे उत्सवही व्यवस्थित साजरे होतात.