
वाढणारी गर्दी व भक्तांची सुविधा लक्षात घेऊन २०२२ पासून २०२५ या कालावाधीत जुनी शेड असलेले मंडप काढून त्याऐवजी भव्य, हवेशीर वा प्रशस्त असे प्रसादमंडप बांधण्यात आले. त्यापूर्वी नवीन सुसज्ज असे कोठीघर, स्वयंपाकघर यांचेही बांधकाम व नूतनीकरण करण्यात आले. प्रसादभोजनाची गर्दी दररोजच्या ४००-५०० वरून २०००-२५०० वर गेली. दर पौर्णिमेला तर २० ते ४० हजार पान होते. सोय व्हावी, स्वच्छता रहावी व वेळ वाचावा यासाठी सेवेकरी रांगेतून येणाऱ्या भक्तांना ताटे वाढून देतात तसेच भक्तांना बसण्यासाठी टेबल - बाकांची सोय केली आहे, त्यामुळे वृद्ध व अपंग व्यक्तीही विनाकष्ट प्रसाद घेऊ शकतात. श्रींचे मूळ तत्त्व ‘अन्नदान’ हे अबाधित ठेवून हा काळानुरूप बदल अपरिहार्य होता. पूर्वीचाच वेळेचा वक्तशीरपणा व विशेष म्हणजे प्रसाद ग्रहण करणारे भक्त व वाढणारे सेवेकरी दोघांच्या सोयीचा म्हणून हा बदल सर्वांच्या पसंतीला उतरला आहे. आता एकाच वेळी ३००० पानांसाठी भाजी, आमटी, शिरा शिजेल एवढी भली मोठी १२-१५ पातेली आणली गेली. तेवढ्या मोठ्या तितक्याच चुली बांधल्या गेल्या. भक्तांसाठी ३०० किलो भात अर्ध्या तासात शिजेल असे ५ वाफेवरचे कुकर्स व त्यासाठी २ बॉयलर्स आता आहेत. सगळेच अवाढव्य झाले पण प्रसादाची चव तीच आहे कारण श्रीगुरूंची त्यावर अमृतदृष्टी आहे.