समाधिमंदिर

समाधिमंदिर कालानुरूप खूप बदलले! पहिल्याच्या दुप्पट विस्तार झाला. स्वच्छता व साधेपणा हे डोळ्यापुढे ठेवून त्याचे नूतनीकरण झाले. सभागृहात भिंतींवर संगमरवरी दगड चढला. आज समाधिमंदिरावरचे गोपाळकृष्णाचे मंदिर, समाधिमंदिर, तीर्थमंडप येथील संगमरवरी दगड व ग्रॅनाईट यांची रंगसंगत प्रसन्न वातावरण निर्माण करत आहे. मंदिराचे दरवाजे-खिडक्यांवरील कोरीव काम प्रसन्नतेत भर टाकत आहेत. मंदिराचा कळस हा तर या सर्व मंदिर परिसराचा शीर्षबिंदु. जवळजवळ ७५ वर्षांपूर्वीचा आता ढासळू लागलेला अपूर्व नक्षीचा कळस जसाच्या तसा प्रमाणबद्ध व उत्तम रंगसंगतीचा नव्याने बनवून घेतला आहे. सर्व बदलले परंतु श्रींची समाधी तशीच आहे. त्यांना आवडे तसे साधेपण तसेच आहे. समाधीवर उत्तम वस्त्र असेल, उत्तमोत्तम फुले, हार त्यावर असतील पण कोणताही दागिना त्यावर नाही.