श्रींचा पुण्यतिथी उत्सव २०२२

श्रीराम समर्थ

दिनांक ९ डिसेंबर २०२२ ते १८ डिसेंबर २०२२ या कालावधीत श्रींचा पुण्यतिथी उत्सव अत्यंत उत्साहात व आनंदात पार पडला. कोरोना संकटामुळे हजारो भाविकांची इच्छा असूनही गेली दोन वर्ष येता आला नव्हतं पण या वर्षी  मात्र त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली. 
श्रीब्रह्मानंद महाराजांनी घालून दिलेल्या परंपरेनुसार दिनांक ९ डिसेंबर म्हणजे मार्गशीर्ष प्रतिपदेला कोठी पूजनाने उत्सवाला प्रारंभ झाला.  यावेळी  वेदघोष, ईशस्तवन, भक्तिगीते झाल्यानंतर मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर श्रींच्या पादुकांचे पूजन, अक्षय बटव्याचे पूजन झाले.  दरवर्षीच्या प्रघाताप्रमाणे श्रींना अत्यंत प्रिय असलेल्या गायींचे गोशाळेतील पूजन, स्वयंपाकघरातील अग्निपूजन हे सर्व विधिवत पार पडले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वयंपाक घरातील भांड्यांची आकर्षक सजावट व  मुख्य कोठी घरात भाज्या, फळे, धान्य यापासून तयार झालेल्या कलाकृतीही अत्यंत वेधक पद्धतीने मांडण्यात आल्या होत्या. कोठीपूजनानंतर नामसाधना मंदिरातील सर्व प्रतिमांचे पूजन व रामनाम जपानंतर सर्वजण समाधी मंदिरात परतले. त्यानंतर गोपालकृष्णासमोर अभंग होऊन विश्वस्तांतर्फे अखंड नामजप व भजनी पहाऱ्याला सुरुवात करून देण्यात आली. आता उत्सवाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.  
दरवर्षी आपल्या कल्पक व नाविन्यपूर्ण कलाकृतींनी श्रींना विविध पद्धतीने साकार करणारे चिंचवडचे श्री प्रशांत कुलकर्णी यावर्षी काय करणार याची भाविकांना उत्सुकता होती. त्याप्रमाणे यावर्षी ते व त्यांच्या सहकाऱ्यानी पूजेच्या विविध मंगलमय साहित्यातून श्री महाराजांना साकार केले व नेहमीप्रमाणे ते उत्सवाचे आकर्षण ठरले.
श्रींसमोरच्या वैविध्यपूर्ण रांगोळ्यानी रोज परिसर सुशोभित करण्यात येत होता. विविध प्रतिथयश गायक कलाकार, कीर्तनकार, भजनी मंडळं, महाराजांकडे आपली सेवा सदर करण्यास उत्सुक असतात. त्यांनी सादर केलेल्या अविष्कारातून गोंदवले दहा दिवस भक्तिरसात न्हाऊन निघाले. महाराजांना अत्यंत प्रिय असणारे नामस्मरण करण्यासही साधक मंडळी उत्सुक होती.  यासाठी अत्यंत शांत अशा ध्यान मंदिरात साधकांनी उपस्थिती लावली.
प्रथेप्रमाणे रोज मोठ्या दिमाखात श्रीमहाराजांची पालखी ग्राम प्रदक्षिणेला गेली व संपूर्ण गावात सडा रांगोळ्या घालून व औक्षण करून ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात तिचे स्वागत केले. त्यानंतर अत्यंत सुग्रास अशा भोजन प्रसादाने भाविक तृप्त होत होते. 
सगुणाची उपासना, नामस्मरण व अन्नदान या श्री महाराजांना आवडणाऱ्या तीन गोष्टी उत्सवात अगदी कटाक्षाने पार पडण्यासाठी विश्वस्त व सेवेकरी तत्पर असतात.  त्यांना आवडणाऱ्या या तीन गोष्टी भरघोस प्रमाणात पार पडल्यावर सगळ्यांना वेध लागतात ते अत्यंत भावपूर्ण अशा दशमीच्या पुण्यतिथी पुण्यपर्वाचे! 
गुलालाचा दिवस आला. हजारो भाविकांनी खचाखच भरलेला मंडप... तेवढ्याच गर्दीने ओसंडलेले समाधी मंदिरालगतचे रस्ते...मनात मात्र फक्त श्रींच्या समाधी दर्शनाची आस. रविवार दि. १८ डिसेंबर श्रींच्या पुण्यतिथीचा मुख्य कार्यक्रम असल्याने आदल्या दिवसापासूनच गोंदवल्यात भाविक दाखल होऊ लागले होते. पहाटे तीन वाजल्यापासून समाधी मंदिरात भाविकांची गर्दी वाढत गेली. साडेपाचच्या सुमारास समाधी मंदिर परिसर भाविकांनी भरून गेल्याने मुख्य चौकापर्यंत सातारा लातूर महामार्ग भाविकांनी व्यापला होता. पहाटे सनई वादनानंतर चार वाजता भूपाळ्यांसह काकड आरती व भजन झाल्यानंतर सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांनी रघुपती राघव भजन गायले. त्यानंतर रामदास आचार्य यांच्या  प्रवचनानंतर  ‘भजनाचा शेवट आला. एकवेळ राम बोला’ या श्रींच्या शेवटच्या भजनाने परिसरात निःशब्द शांतता पसरली. श्रींच्या निर्वाणाची वेळ जवळ येताच हजारो मुखातून श्रीरामाचा जयघोष सुरू झाला आणि भक्तिरसात न्हावून निघालेल्या भाविकांनी पाच वाजून ५५ मिनिटांनी श्रीमहाराजांच्या समाधीवर गुलाल फुलांचा वर्षाव केला. अन् श्रींच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला. या गुलालाच्या मुख्य कार्यक्रमानंतर आरती व श्लोक पठण करण्यात आले. त्यानंतर गुरुमाऊलीच्या समाधी दर्शनासाठी आसुसलेल्या लाखो भाविकांनी श्रींच्या चरणी माथा टेकला. 
समाधी परिसरात व मुख्य रस्त्यावरही मोठे स्क्रीन लावून भाविकांना या संपूर्ण सोहोळ्याचा आनंद घेता येण्याची चोख व्यवस्था करण्यात आली होती. तसेच जे भक्त प्रत्यक्ष उपस्थिती लावू शकले नाहीत त्यांच्यासाठी यू ट्यूब लिंक वरून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले होते.
सोमवारी एकादशीच्या दिवशी पहाटे पाच वाजता श्रींची पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाली. त्यावेळी थोरले श्रीराम मंदिरासमोर भजनाचा कार्यक्रम झाला व नंतर समाधी मंदिरात त्यानंतर ह.भ.प. रामदास आचार्य यांचे लळिताचे कीर्तन झाले.  गेल्या पुण्यतिथी महोत्सवानंतर वर्षभरात समाधी मंदिर परिसरात तसेच गावोगावीच्या भक्तांनी केलेला २३३ कोटी ११ लाख ३० हजार इतका श्रीराम नामजप सकाळी श्रींच्या समाधीवर अर्पण करण्यात आला. तसेच पुढील वर्षभरासाठी तेरा कोटी रामनाम जपाचा संकल्प करण्यात आला. अशा तऱ्हेने या आनंदमय सोहोळ्याची सांगता झाल्यावर या गोड स्मृती व रामनामाची शिदोरी घेऊनच सर्व भाविक आपापल्या घरी परतले.