श्रीराम समर्थ
दसरा म्हणजे सीमोल्लंघन ! आपण सीमित आहोत. देहबुद्धीने मर्यादित आहोत. ईश्वर हा दृष्यापलिकडे असल्याने असीम आहे. तो ‘आहे’ एवढेच सांगता येतं; हेच नाम ! म्हणून नाम घेणं हेच सीमोल्लंघन ! नाम व भगवंत एकरूप आहेत व महाराज नामाशिवाय नाहीत. म्हणून भगवंताचे स्वरूप तेच श्रीमहारांजाचे समजावे. भगवंत सर्वव्यापी आहे तसे श्रीमहाराजही आहेत, म्हणून महाराज गोंदवल्याला आहेत हे जेवढं खरं वाटतं, तेच घरातही वाटायला हवं. आज मार्गदर्शन करायला ते देहाने नसतील पण त्यांना जे आवडेल ते त्यांना सांगून करावं, म्हणजे ते कर्म त्यांना हवं असेल तर आपोआप पूर्ण होईल; नाहीतर अपुरं राहील.
भगवंताला शरण जायला ''मी त्याचा आहे'' याची जाणीव ठेवावी, म्हणजे ''मी तोच आहे'' हा अनुभव येईल. शरण जायला १- सत्संगती २- सद्विचार ३- अनुभव, उपयोगी पडतील. प्रत्येक गोष्ट त्यांना सांगावी व शांत राहावे. प्रपंचाची हयगय करू नये. महाराज म्हणाले, ''सीमोल्लंघन'' एका दृष्टीने मी केलं कारण गुरुआज्ञा पाळली, गुरुआज्ञा पाळायला काहीतरी दृष्यकर्म करावं लागतं, म्हणजे सीमा ओलांडावी लागते. आजची आपली ‘कर्तेपणाची’ भूमिका सोडणं हेच सीमोल्लंघन ! 'तू कर्ता व कल्याण करणारा आहेस ' ही भावना हवी.
मला लहानपणी असं प्रेम बघायला मिळालं नाही त्यामुळे हे (तात्यासाहेब , भाऊसाहेब व त्याच्या पत्नी व सुनेमध्ये असलेले ) नि:स्वार्थ प्रेम पाहून मी पार मोहून गेलो. घरातील प्रत्येक गोष्ट भाऊसाहेबांना विचारून केली जाई, भाऊसाहेब महाराजांना विचारीत. तात्यासाहेब, "भाऊसाहेबांना काय आवडतं ते विचार !", म्हणत असे केल्याने कोणाच्या डोक्यात ताप राहायचा नाही, ते सांगतील ते ऐकायचं! मी त्यांच्या सहवासात एवढं शिकलो की देहाने तरी सांगतील ते ऐकायचं! मनाने अजून जमलं नाही. एखाद्या गृहस्थांची बायको गेली तरी ४ वर्षांनी उठता -बसता आठवण येतेच ना ! तसेच महाराज जीवनात शिरायला हवेत. प्रत्येक गोष्ट तिथून होते आहे , असं प्रेमाने वाटायला हवं. महाराज देहाने नसेल तरी ते आहेत ही भावना नामाने वाटेल, कारण नामातच ते खरे आहेत. एकदा महाराज स्वतः म्हणाले होते की ‘अरे ! मी कोण आहे माहित आहे ?’, समोरचे गृहस्थ म्हणाले, ‘काहीतरी विलक्षण तुमच्यात आहे , एवढ खरं !’ तेव्हा म्हणाले , ‘अरे! ओंकार ,ओंकार म्हणतात तो मीच !’ म्हणजे कोणतही नाम घ्या मी तिथे आहेच. ‘त्याने मला पाहिलेले वा अनुग्रह घेतलेला असो वा नसो’. एकदा एक वेश्या अनुग्रह मागायला एका गृहस्थामार्फत आली तेव्हा महाराज म्हणाले , ‘‘ती धंदा सोडायला तयार असेल तर बोलवा’’. ती म्हणाली, ‘माझी परिस्थिती बरी असल्याने आता धंदा सोडलाय’. महाराजांनी स्नान करून अनुग्रहाला बोलावले व दिला, त्यावर मी विचारले, ' त्या बाईच्या मनात हे विचार कसे आले ? व अशा बाईला तुम्ही कसा अनुग्रह दिला ? त्यावर महाराज म्हणाले , ‘रेसच्या घोडयांना नंबर दिलेला असतो. तो कायमचा असतो. ते मेले तरी राहतो. त्या नंबरवरून सबंध इतिहास कळतो. तसंच मला जी व्यक्ती भेटली तिला मी तिच्या कुठच्याही जन्मी ओळखेन! उगाच माझ्याकडे कोणी व्यक्ती कशी येईल ?’ परमात्मा सर्वव्यापी आहे, म्हणून महाराज सर्वत्र आहेत ही भावना राहिली कि तो माझ्यात आहेच, हे आलंच ! नामाने हे साधलं कि दसरा आनंदाचा होईल. हा आनंद कायम टिकला की दसरा दरवर्षी निराळा करायला नको. त्याचा रोजचा दसरा!
।।जानकी जीवन स्मरण जय जय राम ।।
- पू. श्री बाबा बेलसरे यांच्या प्रवचनाच्या आधारे - दसरा १९८१