श्रीराम समर्थ
श्रीसद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा १०७ वा पुण्यतिथी महोत्सव श्रीक्षेत्र गोंदवले येथे मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा ते वद्य दशमी शके १९४२, गुरुवार दिनांक ३१ डिसेंबर २०२० ते शुक्रवार दिनांक ८ जानेवारी २०२१ या कालावधीत पार पडला. करोना महामारीमुळे यावर्षी उत्सव अत्यंत साधेपणाने संपन्न झाला.
समाधीसन्निध श्रीसद्गुरु आहेतच, या भावनेने श्रींची निवासी भक्तमंडळी व सेवेकरी यांनी समाधिमंदिरात अखंड नामस्मरण, अखंड पहारा, आरती इ. उपासना कार्यक्रम मनोभावे केले. महामारीमुळे उत्सवाला उपस्थित राहू न शकलेली भक्तमंडळी मनाने मात्र नक्कीच गोंदवल्यास हजर होती. आपल्या सर्वांच्या भावनेने श्रींचे सान्निध्य व हे नाममय मंगल वातावरण आपल्याला आपल्या घरीच अनुभवास यावे हीच श्रींकडे प्रार्थना !