१८ ऑक्टोबर

भगवंताच्या प्राप्तीची साधने.

भगवंत आणि आपण ह्यांच्यामध्ये अभिमानाचा पडदा आहे; हा दूर झाला म्हणजे आपल्याला भगवत्प्राप्ती झाली. हा दूर व्हायला अनेक मार्ग आहेत. कर्ममार्ग, हठयोग, राजयोग वगैरे मार्गांनी हा तितका लवकर दूर होत नाही; उलट क्वचित् प्रसंगी वाढतोही. भक्तिमार्ग सोपा आहे. भक्ती म्हणजे भगवंताला अभिमानरहित अनन्य शरण जाणे, भगवंताचे होऊन राहणे, भगवंताशिवाय दुसरे काहीच न दिसणे, सर्वत्र भगवत्प्रचीती येणे. अशी भक्ती प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तृत्व भगवंताकडे देणे, सर्व त्याच्या इच्छेने चालले आहे असे मानणे, आणि आपली प्रत्येक क्रिया त्याला समर्पण करणे. असे केल्याने आपला अभिमान लवकर नाहीसा होतो. हे साधत नसेल तर गुरुआज्ञेत राहणे, म्हणजेच आपला मान, अभिमान, शहाणपण हे सर्व गुंडाळून ठेवून, गुरु सांगतील तसे, सबब न सांगता वागणे. हेही साधत नसेल तर संतांजवळ नुसते पडून राहणे. त्यांच्या सांगण्याने, सहवासाने, अभिमान हळूहळू कमी होतो.

भक्ती दोन प्रकारांनी उत्पन्न करता येते. पहिला प्रकार म्हणजे सर्व सोडून, लंगोटी लावून, ‘ भगवंता, तू मला भेटशील तेव्हाच मी उठेन, ’ अशा निग्रहाने बसणे. हा मार्ग कठीण आहे. प्रापंचिकाला हा साधणार नाही. दुसरा प्रकार म्हणजे सहवासाने भक्ती उत्पन्न करणे. भगवंताचे गुणवर्णन वाचणे, त्याचेच गुण श्रवण करणे, त्याच्या दर्शनास जाणे, प्रत्येक कृत्य भगवंताकरिता करणे, प्रत्येक कृत्यात त्याचे स्मरण ठेवणे; असा त्याचा अखंड सहवास ठेवावा, म्हणजे भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होते. विषयाकरिता केलेली भगवद्भक्ती ही खरी भक्ती होऊ शकत नाही. भगवत्सेवा निष्काम पाहिजे; कारण भक्ती म्हणजे संलग्न होणे. मी विषयाशी संलग्न असतो तेव्हा ती विषयाची भक्ती होते, भगवंताची नाही. तेव्हा, आपण करतो ही भगवंताची सेवा नसून विषयाची सेवा होते हे ठरल्यासारखे झाले; म्हणजे मी विषयाचाच गुलाम झालो. विषयांचा गुलाम होऊन मी विषय कसचे भोगणार ? मालक होऊन विषय भोगावेत. संत, भगवंत हे निरतिशय सुख देणारे आहेत. त्यांच्याजवळ विषय मागणे म्हणजे रामाजवळ भिक्षेचे फडके मागण्याइतकेच वेडेपणाचे नव्हे का ? आपण सेवेचे फळ मागून भगवंताला मात्र दूर करतो. भगवंताची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्याभोवती फिरत असावे. भगवंतामध्ये जे मिसळतात ते परत येत नाहीत, हे लक्षात ठेवावे.

२९२. भगवंताच्या प्राप्तीच्या आड येणारे नाहीसे व्हावे म्हणून तळमळणारा जो असतो, त्याचे साधन बरोबर चाललेले असते.