श्रीविठ्ठल-रखुमाई मंदिर

श्रीमहाराजांचे आजोबा श्री. लिंगोपंत यांनी दर शुद्ध एकादशीची पंढरीची वारी धरली होती. गळ्यात तुळशीची माळ असून ते येता जाता ‘पांडुरंग, पांडुरंग’ असे नामस्मरण करीत असत. पुढे वयोमानाने लिंगोपंत थकले. वारीसाठी पंढरपूरला जाणे होत नाही म्हणून त्यांना वाईट वाटे. एकदा रात्री नित्याच्या सवयीप्रमाणे पांडुरंगाचं ध्यान करून ते झोपले असता त्यांच्या स्वप्नात स्वत: पांडुरंग आले व पंतांना जागे करून हात धरून त्यांच्या एका मळ्यात नेले, व एका विशिष्ठ जागी ‘खणून पहा म्हणजे मी सापडेन. तुला पंढरीला येऊन मला भेटणे म्हातारपणामुळे कठीण झाले याचे तुला वाईट वाटते, म्हणून मीच तुझ्या घरी राहायला येत आहे.‘ असे सांगून देव दिसेनासे झाले. पुढे उठल्यावर लगेच मंडळींना बरोबर घेऊन पंत मळ्यात गेले, स्वप्नात दाखविलेली विशिष्ट जागा पूजेने पवित्र केल्यावर लोकांनी तेथे खणण्यास आरंभ केला. १०/१२ हात खणून झाल्यावर पहारीचा ‘खन्न’ असा आवाज झाल्यावर पंत स्वत: खड्डयात उतरले, आपल्या हातांनी माती दूर सारली, तो विठ्ठल- रखुमाईच्या सुंदर मूर्ती जणू काही कोणी नीट ठेवाव्यात अशा ठेवलेल्या तेथे आढळल्या.

विठ्ठलनामाच्या जयघोषात मूर्ती पालखीतून वाजतगाजत आणल्या, व चांगल्या मुहूर्तावर आपल्या घराच्या बाजूलाच पंतांनी पांडुरंग-रखुमाईची स्थापना केली. सात दिवस भजन, कीर्तन, अन्नदान केले. मूर्ती ज्या ठिकाणी सापडल्या त्या मळ्याला विठोबाचा मळा म्हणू लागले. आता या मंदिराचा जीर्णोद्धार होऊन विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती चांगल्या चौथऱ्यावर स्थानापन्न झाल्या आहेत व मंदिराचे स्वरूपही आता छान बदलले आहे.