४ एप्रिल
संत कसे असतात ?
आपले शहाणपण बाजूला ठेवून जो संताला शरण जातो तोच खरा साधक. ज्याला सर्व सृष्टी रामरूप दिसते, आणि शिष्यालाही जो रामरूप पाहतो, तोच खरा गुरू. सद्गुरू कधीही मिंधेपणाने वागत नाही, आणि त्याला भीतीचा लवलेशही नसतो. आपला शिष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे संतांना कळते. देहबुद्धीचे लोक विषयाचे दास असतात, पण संत मात्र विषयावर मालकी गाजवतात. संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले, किंवा त्याची आवड उत्पन्न झाली म्हणजे संताची प्रचीती आली असे समजावे. औषध काय आहे हे न कळतासुद्धा रोग्याने ते श्रद्धेने घेतले तर त्याला गुण येतो, किंवा एखाद्याला स्वयंपाक करता आला नाही तरी त्याला अन्नाची चव समजते आणि तो पोटभर जेवू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्याला ज्ञानाचा अनुभव येईल, पण शब्दाने त्याला तो सांगता येईलच असे नाही.
मीठ खारट आहे याचे जसे आपल्याला दु:ख होत नाही, त्याचप्रमाणे जगामधल्या लढाया, हाणामाऱ्या, सज्जनांचा छळ, संकटे, यांचे संतांना वाईट वाटत नाही. ‘वाईट वाटत नाही’ याचा अर्थ ते त्यांना आवडते असा मात्र मुळीच नव्हे. पण मीठ जसे खारटच असणार, तशा जगात या घडामोडी होणारच, जगाची रहाटीच अशी आहे, हे समजून तो दु:ख करणार नाही. किंबहुना, मीठ फार झाले तर खारटपणा जसा सहन होत नाही, तसे त्यालाही होईल. इतकेच नव्हे, तर त्याचा प्रयत्नही जगातले वाईट कमी करण्याकडेच असतो.
विहिरीतल्या बेडकांना जशी समुद्राची कल्पना येत नाही तशी आपल्याला संतांची कल्पना येत नाही. संत हे पहिल्याने आपल्यासारखेच होते, परंतु अनुसंधानाच्या मार्गाने ते वर गेले. आपल्याला संत ‘शोधण्याची’ मुळीच जरुरी नाही. आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपला शोध करीत आपल्याकडे चालत येतील. आपली भावना कशी आहे इकडे संतांचे लक्ष असते. संत हा गुप्तपोलिसासारखा आहे; तो आपल्यामध्ये आपल्यासारखा राहतो, पण आपल्याला ओळखता येत नाही. संताला स्वत:च्या शरीरात काय चालले आहे ते सर्व दिसते; म्हणून तो रोगाची काळजी करीत नाही. संताला कर्म मागेपुढे करता येते, पण ते टाळता येत नाही; ते कुणाला तरी भोगलेच पाहिजे. संत जे साधन सांगतात ते आपल्या शक्तीप्रमाणेच असते. संत जो बोध सांगतात, त्याचे आपण थोडेतरी पालन करू या.