३ एप्रिल

संतांना कसे ओळखावे ?

धान्यामध्ये काही खडे असे असतात की, धान्यापासून ते वेगळे निवडता येत नाहीत. तांदळांत पांढरे खडे असतात, ते निवडू गेले तरी निवडले जात नाहीत. त्याप्रमाणे साधू लोक हे आपल्यात असतात, त्यांना पाहू गेले तर ते आपल्यासारखेच संसारात वावरत असलेले दिसतात; पण खरे पाहता ते आपल्यापेक्षा वेगळे असतात. पुस्तकांतून साधूची लक्षणे पुष्कळ दिलेली असतात. पण त्याप्रमाणे आपण पाहू गेलो तर साधू ओळखता येईलच असे नाही. साधूचे एकच अचूक लक्षण सांगता येईल, ते हे की, जो सर्व ठिकाणी देवाला पाहू शकतो तो साधू. पण एवढ्यावरून आपल्याला तो ओळखता येईल का ? नाही; तर जेव्हा आपण साधू व्हावे, तेव्हाच आपल्याला साधूला ओळखता येईल.

जगात आपण कुणाचीच निंदा करू नये. आपण जेव्हा दुसऱ्याचे दोष पाहतो, म्हणजेच ते जेव्हा त्याच्याजवळ आहेत असे दिसतात, त्या वेळेस तेच दोष आपल्याजवळ सूक्ष्म रूपाने असतात असे समजावे; आणि आपण लगेच देवाला शरण जाऊन, ‘हे माझे दुर्गुण काढून टाक’, म्हणून त्याची करुणा भाकावी, आपण जेव्हा ‘जगात न्याय उरला नाही’ असे म्हणतो, त्या वेळेस आपल्याजवळ तो दोष आहे समजावे. म्हणून आपण कुणाचे दोष पाहू नयेत. आपण आपल्या स्वत:ला आधी सुधारावे. चित्तशुद्धी केल्याशिवाय आपल्या मनात सर्व ठिकाणी भगवद्भाव उत्पन्न होणार नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला दुसऱ्याचे दोष दिसतात, तेव्हा आपलेच चित्त अशुद्ध आहे असे समजून आपण परमात्म्याची करुणा भाकून त्याला शरण जावे, आणि ‘माझे चित्त शुद्ध कर’ अशी त्याला विनंती करावी. असे केले म्हणजे आपले चित्त शुद्ध होत जाते, आणि मग भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही.

जे मिश्रण आहे ते पचायला कठीण असते; उदाहरणार्थ, भाजणी. मिश्रण नसलेले एकच शुद्ध अन्न पचायला सोपे असते. हे जसे खरे, त्याचप्रमाणे आपले अंत:करण अगदी शुद्ध असावे, म्हणजे ते सर्वांमध्ये लवकर मिसळते. पण आपल्या अंत:करणामध्ये स्वार्थाचे मिश्रण असल्यामुळे ते सर्वांमध्ये समरस होऊ शकत नाही. शुद्ध अंत:करणाच्या माणसाचे चालणे हळू, आणि बोलणे मृदू असते. तो सर्वांना प्रिय होतो. जगातले आपले समाधान किंवा असमाधान, ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून असते. ‘माझ्याकरिता मी नसून, मी लोकांकरिता आहे. माझ्याकरिता जग नसून मी जगाकरिता आहे,’ ही वृत्ती आपण ठेवावी.

९४. सर्व चराचर भगवद्रूप जो पाहतो तो साधू.