२९ मार्च
प्रपंचात आपण साक्षित्वाने वागावे.
सत्य वस्तू ओळखणे हा परमार्थ, आणि असत्य वस्तूला सत्य मानून चालणे हा प्रपंच होय. आपल्याला वस्तू दिसते ती खरी असेलच असे नाही. पण ती मुळीच नाही असे मात्र नाही; ती काहीतरी आहे. एका दृष्टीने सत्य वस्तू अशी आहे की, प्रत्येकजण जे गुण त्या वस्तूला लावतो ते सर्व गुण तिच्या ठिकाणी आहेतच, शिवाय आणखी कितीतरी गुण तिच्या ठिकाणी आहेत; म्हणून ती निर्गुण आहे. दुसऱ्या दृष्टीने ती अशी आहे की, प्रत्येकजण जो गुण तिला लावतो तो कल्पनेनेच तिच्या ठिकाणी आहे असे आपण म्हणतो; म्हणून ती वस्तू गुणांच्या पलीकडे आहे. या अर्थानेसुद्धा ती निर्गुणच आहे. जशी आपल्या देहाची रचना, तशीच सर्व सृष्टीची रचना आहे. देहामधले पंचकोश सृष्टीमध्येदेखील आहेत. फरक एवढाच की, देहामध्ये ते मूर्त आहेत तर सृष्टीमध्ये ते अमूर्त स्वरूपात आहेत. भगवंताला एकट्याला करमेना म्हणून तो एकाचा अनेक झाला. त्याचा हा गुण माणसाने घेतला. आपण हौसेसाठी आपला व्याप वाढवितो. पण फरक हा की, भगवंताने व्याप वाढविला तरी त्यामध्ये तो साक्षित्वाने राहिला, आणि आपण मात्र व्यापामध्ये सापडलो. भगवंत सुखदु:खाच्या पलीकडे राहिला, पण आपण मात्र दु:खात राहिलो. व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दु:ख होणार नाही. खरे पाहिले तर व्यापातून वेगळेपणाने राहण्यासाठीच सर्व धडपड आहे. व्याप दु:खदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण साक्षित्वाने राहायला शिकले पाहिजे.
आपण जगामध्ये व्याप वाढवितो, तो आनंदासाठी वाढवितो. पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. म्हणून खरा आनंद कोठे मिळतो ते पाहावे.
जगणे म्हणजे शरीरात चैतन्य असणे होय. चैतन्य हे केवळ सच्चिदानंदात्मक आहे. म्हणून, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंद असलाच पाहिजे. हा आनंद आपण भोगावा. ब्रह्मानंद आणि सुषुप्ती यांमध्ये फरक आहे. ब्रह्मानंद हा आहेपणाने आहे, तर सुषुप्तीचा आनंद हा नाहीपणाने आहे. आपल्याला झोप लागली की काय ‘जाते’ आणि जागे झालो की काय ‘येते’ हे नित्याचे असूनसुद्धा आपल्याला कळत नाही. भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि तोच सर्व करतो अशी भावना ठेवणे यासारखे समाधान नाही. कृतीमध्ये आनंद आहे, फळाच्या किंवा फळाच्या आशेत तो नाही. नामस्मरणरूपी कृती केली असता शाश्वत आनंदाचा सहज लाभ होईल.