१९ मार्च

प्रपंचात परस्परांशी प्रेमभाव कसा वाढेल ?

निसर्गत:च प्रेम हे प्रत्येक व्यक्तीत आणि प्राणिमात्रांत असते. फार काय, प्रेमाशिवाय मनुष्यप्राणी जिवंत राहू शकणार नाही. प्रेमाने सर्व जग वश करून घेता येते. प्रेम ठेवण्यात पैसा खर्च होत नाही, कष्ट नाहीत. परंतु प्रत्येकाचा अनुभव पाहावा तर प्रेम करणे तितकेसे सोपे आहे असे दिसत नाही. याचे कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव निराळा, आवड निराळी आणि दैवयोगाने आलेले ऋणानुबंध निरनिराळे असतात. आपल्या विचाराचे लोक असतील त्यांच्यावर स्वाभाविकच प्रेम जडते; विरुद्ध असतील त्यांच्याबद्दल प्रेम वाटत नाही, किंबहुना द्वेषही उत्पन्न होतो. द्वेष उत्पन्न का होतो, तर आपला आणि दुसऱ्याचा विचार आणि आवड जमत नाही म्हणून. परंतु थोडा विचार केला तर असे दिसते की, आपण ज्या कारणामुळे दुसऱ्याचा द्वेष करतो, तेच कारण दुसऱ्याने आपला द्वेष करायला पुरेसे होते. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट आपल्याला न आवडली आणि तीच दुसऱ्याला आवडली, तर मला न आवडलेली गोष्ट दुसऱ्याला आवडल्यामुळे दुसऱ्याचा द्वेष करायला मला तेवढे कारण पुरेसे होते. मग त्याच न्यायाने, त्याला न आवडलेली गोष्ट मला आवडते हेच कारण त्याने माझा द्वेष करायला पुरेसे नाही का ? ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी म्हण आहे. त्याचा अर्थच असा की, स्वभावाप्रमाणे प्रत्येकाची आवड ही निराळी असणारच. म्हणून द्वेषबुद्धी नाहीशी करण्याकरिता प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी सवलत ठेवणे जरूर आहे; आणि प्रेम जडण्याकरिता, सर्वांना आवडणारी जी गोष्ट असेल तिकडे लक्ष देणे जरूर आहे. प्रेम करण्याचा धडा गिरवताना सुरुवात आपल्या घरापासून करावी; घरातली माणसे, नंतर शेजारी आणि त्यानंतर आजूबाजूला आपलेपणाची भावना आपल्या कृतीने वाढवावी; म्हणजे क्रमाक्रमाने प्रेमाची वाढ होऊन सर्व वातावरण प्रेममय होऊन जाईल. सर्वांशी निष्कपट प्रेमाने वागावे; आपल्या बोलण्यामध्ये नव्हे, पाहण्यामध्येसुद्धा प्रेम असावे. आपले बोलणे अगदी गोड असावे. आपल्या अंगी सहजता यावी. घरामध्ये ‘अमुक एक गोष्ट कराच’ किंवा ‘नकाच करू’ असे हट्टाने न म्हणता आपण राहावे. जसे घडेल तसे घडू द्यावे. देह असा प्रारब्धावर टाकणे मला फार आवडते.

प्रेम करायला गरिबी आड येत नाही किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावे लागत नाही. जसे आई आणि मुलाचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लागावे. ज्याला भगवंताचे प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहील. भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे; ते मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी आणि त्याच्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न ठेवावा.

७९. घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भीतीचा असू नये.