१४ मार्च

प्रपंचातले आपलेपण भगवंताकडे वळवा.

प्रेम हे सर्वांना उपजतच येत असते. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी यांच्यावर प्रेम कसे करावे हे कुणी शिकवावे लागत नाही. एकदा आपले मानले की प्रेम आपोआप निर्माण होते. पण हे प्रेमसुद्धा खरे बघितले तर स्वार्थी आहे. मुलगा ऐकत नाही, तो वाटेल तसे वागतो अशी आपण तक्रार करतो. त्याच्यावर जर आपले खरे प्रेम असेल तर आपण तशी तक्रार करणार नाही परंतु त्याच्यामागे ‘हा माझे ऐकत नाही’ हा अहंकार, स्वार्थ आहे. एक गृहस्थ मला भेटले, त्यांना मी विचारले, “झाले का मुलाचे लग्न ?” ते म्हणाले, “नाही, उद्या आहे.” “मुलगा चांगला वागतो का ?” असे मी विचारल्यावर ते म्हणाले, “आत्ताच नाही सांगत, सहा महिन्यांनी सांगेन.” स्वार्थाचे प्रेम इतके अशाश्वत आहे ! मला सांगा, अशा स्वार्थाच्या प्रेमापासून सुख कसे लाभेल? प्रपंचात आपण केवळ कर्तव्यबुद्धीने वागावे; मग ‘मुलगा माझे ऐकत नाही’ हा प्रश्नच उद्भवणार नाही.

खरोखर प्रपंच हा एखाद्या प्रयोगशाळेसारखा आहे. कॉलेजचे शिक्षण पुरे करण्यासाठी काही महिने तिथे शिकावे लागते असे म्हणतात. त्या प्रयोगशाळेतून काही उत्पादन काढण्याचा उद्देश नसतो, फक्त मुलांना शिकविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तिथे सर्व काही शिकून घ्यायचे असते; ते किती उपयोगी पडेल, त्यापासून किती फायदा होईल याची अपेक्षा ठेवायची नसते. त्याप्रमाणे प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा समजावी.

आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर आपण ‘केले’ असे थोडेच असते. म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे योग्य रीतीने करावे, आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये. प्रत्येक गोष्ट घडायला योग्य वेळ-काळ यायला लागतो. तेव्हा कर्तव्यबुद्धीने वागून काय ते करा आणि ‘भगवंता, हा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे’ असे म्हणा, म्हणजे आपोआप भगवंताचे प्रेम लागेल. प्रपंचातले जे आपलेपण आहे ते भगवंताकडे वळवा. घरातल्या मंडळींवर नि:स्वार्थबुद्धीने प्रेम करायला शिका म्हणजे परमार्थ आपोआप साधेल आणि आपलेपणा भगवंताकडे वळविल्यामुळे भगवंतावर प्रेम जडेल; याकरिता काही वेगळे करणे नको. हा आपलेपणा निर्माण होण्यासाठी, भगवंतावाचून आपले नडते ही भावना झाली पाहिजे. याकरिता आपण त्याच्या अखंड सहवासात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्या नामस्मरणानेच ही गोष्ट सहज शक्य आहे.

७४. वाचलेले विसरेल, पाहिलेले विसरेल, कृती केलेली विसरेल, पण अंतःकरणात घट्ट धरलेले नाम कधी विसरायचे नाही.