१४ फेब्रुवारी
आनंद हवा असेल तर नाम घ्यावे.
शरीरस्वास्थ्याला लागणाऱ्या शरीरातल्या द्रव्यांत जेव्हा कमी-अधिकपणा उत्पन्न होतो तेव्हा शरीरस्वास्थ्य बिघडते; त्यालाच आजार म्हणतात. सुंठ हे असे औषध आहे की, ते शरीरात कमी झालेल्या द्रव्याची भरपाई करते आणि जास्त झालेले द्रव्य कमी करून आरोग्य राखते. नाम हे सुंठीसारखे आहे. पारमार्थिक प्रगतीच्या मार्गात प्रत्येक व्यक्तीतल्या ज्या ज्या गुणदोषांमुळे अडथळा येतो, ते गुणदोष दूर करून भगवंताचे नाम प्रगतीच्या मार्ग मोकळा करते. म्हणून कोणात कोणतेही गुणदोष असोत, त्याने निष्ठेने नाम घेतले की, त्याचे काम बिनचूक होऊन तो ध्येय गाठतो. आपल्यात तेलाचा नंदादीप लावण्याची पद्धत आहे. तो अखंड तेवत ठेवायचा असतो. त्यात तेलाचा पुरवठा करावा लागतो. तसे, ज्याला आनंदरूपी नंदादीप हवा असेल त्याने सतत नामरूपी तेलाचा पुरवठा करीत राहिले पाहिजे. थोडक्यात म्हणजे, ज्याला आनंद हवा असेल त्याने सतत नाम घेतले पाहिजे. आनंदाचा उगमच नामात आहे. केव्हाही आणि कुठेही पाहिले तरी बर्फामध्ये गारपणा हा असायचाच, त्याचप्रमाणे परमात्म्याजवळ नेहमी आनंद हा असायचाच असे समजावे. आपण जगामध्ये व्याप वाढवितो तो आनंदासाठीच वाढवितो; पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणांवर अवलंबून असल्याने, ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. म्हणून हा आनंद अशाश्वत होय. ‘खावे, प्यावे आणि मजा करावी’ हे तत्त्वज्ञान मला थोडेसे पटते, पण त्यामध्ये मोठा दोष असा की, ते देहबुद्धीवर आधारलेले असल्याने कायमचे म्हणजे टिकणारे नाही; कारण आजची चांगली परिस्थिती उद्या बिघडली, की याची मजा गेली ! उलट, येईल त्या परिस्थितीमध्ये आपण आनंद निर्माण करावा. रोज अगदी पाचच मिनिटे का होईना, भगवंताशी अनन्य व्हायला शिका. अशा त्या पाच मिनिटांचा आनंद शंभर वर्षे नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडपणाबद्दल तासन्तास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो, तसेच इथे आहे. जगण्यामध्ये आनंद आहे ही गोष्ट खरी, पण आनंदाचे जगणे नसेल तर ते मेल्यासारखेच आहे. ज्याच्याजवळ भगवंत आहे, त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल. म्हणून ज्याला जगायचे आहे त्याने नाम घ्यावे.
‘सदा सर्वदा योग तुझा घडावा’ असे श्रीसमर्थांनी मागितले, ‘तुझा विसर न व्हावा’ असे श्रीतुकारामबुवांनी मागितले. याचे कारण हेच की, जिथे भगवंत तिथे आनंदीआनंद असतो. व्यापारी लोक ‘आज रोख, उद्या उधार’ अशी पाटी लावतात. त्याप्रमाणे आपणही ‘आनंद रोख, दु:ख उधार’ अशी वृत्ती ठेवावी. ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे.