१० नोव्हेंबर

शेजार असतां रामाचा । दुःखाची, काळजीची, काय वार्ता ॥

ज्याला म्हणावें मी ‘ माझें ’ । त्यावर माझी सत्ता न गाजे ॥ स्वत:चा नाहीं भरंवसा हें अनुभवास येई । परि वियोगाचें दु:ख अनिवार होई ॥ तुम्ही विचारी, सुज्ञ आहांत । थोडासा करावा विचार ॥ सर्व सत्ता रामरायाचे हातीं । तेथें आपल्या मानवाची काय गति ? ॥ विचारानें दु:ख सारावें । सर्वांचें समाधान राखावें ॥ सर्व केलें रामार्पण । हा नव्हे शब्दांचा खेळ जाण । अर्पण केल्याची खूण । न लागावी काळजी तळमळ जाण ॥ परमात्म्याचे रक्षण । कोणतेही स्थळीं, कोणतेही काळीं, असतें हा भरंवसा। याचा अनुभव प्रत्येकास आहे खासा ॥ ठेवा रामावर पूर्ण विश्वास । न करावे उपासतापास॥ उपास हा शब्द अलिकडील जाण । त्याच्यापुढें एक पाऊल टाकून । उपासनेंत राहावें आपण । तेथें आहे निर्धास्तपण । उपासापुढील ठाण । उपासना मुख्य जाण ॥ उपासनेंत राहावें आपण । हेंच रामाचें सान्निध्य जाण ॥ शेजार असतां रामाचा । दु:खाची, काळजीची काय वार्ता ? । जैसा सूर्य प्रकाशतां । काळोखाचा नाश होईल तत्त्वता । एवढें आता ऐकावें माझें । राम उतरील सर्व ओझें ॥ स्मरतां रामाला । तो देईल समाधानाला ॥ देवाकडे करावी विनंति । देहदु:ख अति फार । होई रामाचा विसर । आतां द्या नामाचें अखंड स्मरण । देवा, देह केला तुला अर्पण ॥ परमात्मा दयाळू फार । आपले हिताचें करील हा ठेवावा निर्धार ॥ मी आहे तुमच्यापाशीं हा ठेवावा विश्वास। न सोडावा आतां धीर । सदा घ्या भगवंताचें नाम । जेणें कृपा करील रघुनंदन ॥ राम कृपाळू, दीनांचा नाथ । तो सर्व कांहीं पाहात ॥ आपले प्रारब्धानें आलेलें कर्म । ते त्यास न विसरतां करावें अर्पण ॥ सुखानें घ्या नामस्मरण । कृपा करील रघुनंदन ॥ हा करावा उपाय । तोच समाधानाला नेईल खास ॥

मागील गोष्टींची आठवण । पुढील गोष्टींचें चिंतन । हेंच दु:खाला खरें कारण ॥ स्वार्थ म्हणजेच आपलेपण । म्हणून माझा मीच दु:खाला कारण ॥ आपण आपलेपणानें वागत गेलें । सुख, दु:ख, चिंता, शोक यांचे मालक व्हावें लागलें ॥ सुखदु:खांत चित्ताची न राहे स्थिरता ॥ तीच त्याची खरी अवस्था ॥ सुखदु:ख परिस्थितीवर नसतें । आपल्या जाणीवेवर अवलंबून राहतें ॥ दु:खाचें मूळ कारण। जगत् सत्य मानलें आपण ॥

३१५. जोपर्यंत 'देही मी' ही भावना । तोपर्यंत दुःखाच्या यातना ॥ सारांश, देहातादात्मक । याचेंच नांव दुःख ॥