२४ सप्टेंबर

कुटुंबात कसे वागावे ?

 देहात आल्यावर, आपले ज्याच्याशी जे कर्तव्य आहे ते बरोबर करावे. घरात अत्यंत समाधान असावे. मुलांनी वडील माणसांचे दोष पाहू नयेत. बाप जसा सच्छील आहे तसे मुलांनी व्हावे, म्हणजे कुळाची कीर्ति वाढते. मोठ्या माणसाने, पेन्शन घेतल्यावर मनाने भगवंताचे नोकर होऊन राहावे. बाईनेही पतीपरते दैवत न मानावे. सर्वांनी भगवंताच्या नामात राहावे. जो मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने वागेल त्याला म्हातारपणीही स्वाभाविक रीतीने वागता येईल; म्हणजेच म्हातारपण त्याला मुळीच दु:खदायक होणार नाही. आपण अस्वाभाविक रीतीने, म्हणजेच आसक्तीने वागत असल्यामुळे, म्हातारपणी कर्तेपण कमी होते आणि आसक्ती मात्र टिकते; आणि ती तापदायक बनते. ज्या माणसाची आसक्ती किंवा आग्रह म्हातारपणी सुटलेला असतो, त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल. अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल, त्याला दिसायला कमी लागेल, त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही, त्याची झोप कमी होईल; पण हे सर्व होऊनही त्याचा कोणी कंटाळा करणार नाही, आणि त्याला स्वत:लाही जीवनाचा कंटाळा येणार नाही. म्हातारपणी आपण कसे मीपणाने वितळून जावे ! ‘पण मी सांगतो ना !’, ही कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी, म्हणजे मग दु:ख नाहीच नाही.

प्रपंचात वागत असता प्रत्येकाने अंतर्मुख होऊन, आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावेत आणि ते घालविण्याचा प्रयत्न करावा. वयाची सोळा ते पंचवीस वर्षे हा काल असा असतो की, मनुष्याची बुद्धी वाढीला लागलेली असते. ती वाढ योग्य मार्गाने व्हायला बंधनांची अत्यंत आवश्यकता असते. बंधनात उत्तम बंधन म्हणजे आईबाप सांगतील त्याप्रमाणे वागणे हे होय; कारण आपले हित व्हावे यापलीकडे त्यांचा दुसरा हेतू नसतो. जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपण स्वत:च्या अनुभवाने शिकणे कसे शक्य आहे ? म्हणून आईबापांच्या अनुभवाचा फायदा आपण जरूर करून घ्यावा. आपले आईबाप एखादे वेळी चुकणार नाहीत असे नाही, कारण चुकणे हा मनुष्याचा धर्मच आहे; परंतु आपल्याविषयी त्यांची जी हितबुद्धी असते, तिच्यामुळे त्यांची चूक आपले कायमचे नुकसान करणार नाही. कोणता काल कुणाच्या भाग्याने येतो हे सांगता येत नाही. म्हणून आपण कधी कष्टी होऊ नये. सत्कर्म जेवढे मोठे तेवढी विघ्ने अधिक; भगवंताचे अनुसंधान हे सर्वांत मोठे सत्कर्म आहे. आपण निश्चयाने आणि नि:शंकपणे त्याचे नाव घेऊ या आणि आनंदात राहू या.

२६८. आपले अवगुण शोधावेत व त्यांचा त्याग करून गुण घ्यावेत.