६ सप्टेंबर
' राम कर्ता ' या भावनेने समाधान मिळते.
पहाटेची वेळ खरोखर फार चांगली. ह्या वेळी कोणी मानसपूजा करीत असतील तर फारच उत्तम. दुसरे कोणी या वेळी झोपेत असतील, तर आणखी कोणी मनोराज्येही करीत असतील. पहाटेपासून तो रात्रीच्या झोपेपर्यंत, मग तो राजा असो किंवा रंक असो, सर्वांची एकच धडपड चालू असते, आणि ती म्हणजे समाधान मिळवायची. प्रत्येकाच्या जीवनाला समाधानाची ओढ लागलेली असते. वास्तविक, खरे समाधान हे कशावरही अवलंबून नाही. ते ‘ राम कर्ता ’ ही भावना बाळगल्यानेच मिळू शकते. समाधान मिळवायचे एक अत्यंत सोपे साधन सर्व संतांनी स्वत: अनुभव घेऊन आपल्याला सांगितले आहे, आणि ते म्हणजे नामस्मरण. खरी तहान लागली म्हणजे सहजपणे कोणत्याही नदीचे पाणी प्याले तरी तहान भागते. त्याचप्रमाणे खरी तळमळ असली, म्हणजे सहजपणे नामस्मरण होऊन समाधानाची प्राप्ती होते. पहाटेच्या वेळी केलेला अभ्यास चांगला होतो असे म्हणतात. तेव्हा या नामस्मरणाच्या अभ्यासाला आपण पहाटेपासून सुरुवात करू या. काकड आरती झाली म्हणजे देवाचे स्मरण संपवावे असे नाही, किंवा सारखी काकड आरतीच करावी असेही नाही. भगवंताचे अखंड स्मरण आणि भाव पाहिजे, यात सर्व काही आले. मला खात्री आहे, तुम्ही आवडीने आणि तळमळीने हा अभ्यास चालू ठेवाल, तर राम तुमचे कल्याण करील.
नाम घेत असताना इतर विचार मनात येत राहतात, अशी सर्वांचीच तक्रार आहे. परंतु असे पाहा, एखादा मनुष्य रस्त्याने चालला असला, की त्याला रस्त्यात कोण भेटावे हे काही त्याच्या हातात नसते. शिवाय, त्याला कोणी विचारले की, ‘ तुला रस्त्यात कोण कोण भेटले ? ’ तर तो म्हणतो, ‘ माझे लक्षच नव्हते.’ त्याप्रमाणे आपण नाम घेत असताना या विचारांकडे दुर्लक्ष करावे. त्यांच्या पाठीमागे जाऊ नये, किंवा त्यांच्याबद्दल विचार करीत वेळ फुकट घालवू नये. मला विचार विसरला पाहिजे, विसरला पाहिजे, ’ असे म्हणून का त्याचे विस्मरण होणार आहे ? नामाकडेच जास्त लक्ष द्यावे, म्हणजे विचारांचा आपोआप विसर पडतो, आणि पुढे ते येईनासे होतात.
एकदा वाट चुकल्यावर ती चुकीची वाट परत उलट दिशेने चालावी लागते; आणि मग योग्य रस्ता आल्यावर त्या रस्त्याला लागायचे, हाच अभ्यास; आणि हे सर्व, ध्येय गाठेपर्यंत चालू ठेवणे हीच तपश्चर्या ! ब्रह्मानंदबुवांनी खरी तपश्चर्या केली. ते एवढे विद्वान्, परंतु त्यांनी आपली सर्व बुद्धी रामचरणी लावली. जगातल्या इतर गोष्टींपेक्षा हे केल्याने आपले खचितच कल्याण होईल असे वाटले, म्हणून त्यांनी हा मार्ग पत्करला, आणि त्याला सर्वस्वी वाहून घेतले. तेव्हा, मोठे साधक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण संशयरहित होऊन चालावे, त्यात आपले कल्याण आहे.