२६ ऑगस्ट

कारणावाचून आनंद, तो खरा.

जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणे हे आनंददायक आहे, मग आपल्याला दु:ख का होते ? म्हणजे, मनुष्य आनंदासाठी जगतो आणि दु:ख करतो. याचे कारण असे की, आपण कशाकरिता काय करतो हेच विसरतो. मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते. अर्थात् तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो.

मी आनंदात राहावे असे प्रत्येकाला वाटते; म्हणजेच भगवंताकडे जावे असे वाटते, कारण भगवंत आनंदस्वरूप आहे. आपल्याला अशी एक सवय लागली आहे की, काहीतरी कारणाशिवाय आपण आनंद भोगूच शकत नाही. प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचे राज्य उत्पन्न करतो, आणि त्यापासून आनंद भोगतो. आनंद मिळविण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे; पण कारणावर अवलंबून असणाऱ्या आनंदाची वाट दु:खामधून आहे, आणि त्या आनंदासाठी मनुष्य दु:खदायक प्रपंचाची कास धरतो. म्हणून, कोणतेही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी. कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अशाश्वत असणार, म्हणून तो खरा आनंद नाही. कारणाशिवाय आनंद मिळविण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावे. हे ‘ काहीही न करणे ’ ही फारच उच्च अवस्था आहे. काही तरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे. भगवंताशी अगदी अनन्य होणे, आपले कर्तेपण पूर्ण मारणे, ही ती अवस्था आहे. आनंद पाहिजे असेल तर तुम्ही आनंदातच राहा ! कशाही परिस्थितीत आनंद राहावा. आपल्या मनासारखी गोष्ट घडून आली तर समाधान वाटावे. कुणीही मनुष्य स्वत:साठीच सर्व करतो. समजा, आपल्याला त्रास देणारा कुणी आहे; आपल्याला त्रास दिला तर त्याला बरे वाटते; म्हणजे आपल्याला दु:ख दिले तर त्याला आनंद होतो, म्हणून तो नुसता स्वत:साठीच माझ्याशी तसा वागतो; हे जसे खरे, तसेच, त्याने दिलेला त्रास मी का घ्यावा ? त्याने काहीही केले तरी आपला आनंद का बिघडू द्यावा ? असे आपण वागावे. काल जे झाले त्याबद्दल दु:ख करू नये, उद्या काय होणार याची काळजी करू नये, आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करावे आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे. यातच सर्व आले.

२३९. भगवंताची प्राप्ती व्हावी असे वाटणे हे जन्माचे सार्थक आहे.