३१ जानेवारी
नाम हाच भगवंताचा अवतार.
आजच्या युगात नाम हाच भगवंताचा अवतार आहे. ‘‘सुष्टांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्याकरिता मी अवतार घेतो’’ असे भगवंतांनी गीतेत सांगितले आहे; त्यावरून असे ठरते की, सुष्ट आणि दुष्ट या दोघांचेही अस्तित्व असून, त्यांत दुष्टांकडून सुष्टांना त्रास होण्यातच भगवंताच्या अवताराची उत्पत्ती आहे. आजकाल पाहू गेले तर असे दिसते की, सुष्टांचे अस्तित्त्वच जवळजवळ दुर्मिळ झाले आहे. म्हणजे, ज्यांचा छळ झाला असता भगवंताने अवतार घ्यावा, ते सुष्टच नामशेष झाले आहेत. मग अवतार तरी कुणासाठी, कसा व्हावा ? याचा अर्थ, अवतार होणारच नाही असे नाही; पण वस्तुस्थिती काय आहे ते यावरून आपल्याला समजेल. आजची परिस्थिती आणि पूर्वीच्या काळजी परिस्थिती यांत फरक आहे. पूर्वी सद्भावना जिवंत होती, पण ती उघडपणे कृतीत आणणे कठीण होते. आता सद्वासनाच नाहीशी झाली आहे, म्हणजे पायाच ढासळला आहे, तिथे कृतीचा प्रश्नच उद्भवत नाही. पूर्वी सद्वासना सूक्ष्मपणे का होईना जिवंत होती, पण स्थूल प्रकट कृती दुर्घट झाली होती; त्या वेळी भगवंताला स्थूलात येऊन कार्य करणेच जरूर होते, आणि अशा वेळी अवतार घेऊन, म्हणजे सगुण रूप धारण करून, भगवंताने कार्य केलेही. आताचा प्रश्न, दुर्वासना जाऊन सद्वासना कशी उत्पन्न होईल हा आहे; म्हणजेच कार्य सूक्ष्मांतले आहे. म्हणजे ‘जसा रोग तसे औषध’ किंवा ‘काट्याने काटा काढावा’ या न्यायाने, उपाययोजना सूक्ष्मातच केली पाहिजे. वासना बदलायला वासनेइतकाच जबरदस्त इलाज पाहिजे; आणि तो म्हणजे भगवंताचे नाम. चालू परिस्थितीशी झगडून मार्ग काढून देणारा असा जर कोणता अवतार असेल तर तो भगवंताच्या नामाचाच आहे, आणि त्याकरिता सर्वांनी भगवंताच्या नामाचा टाहो फोडणेच जरूर आहे. हे कार्य भगवंताने सगुणरूप धारण करून होणे कठीण आहे; ज्याअर्थी कारण सूक्ष्मांतले आहे त्या अर्थी त्याला इलाजही सूक्ष्मांतला पाहिजे. म्हणून नामावताराची आज गरज आहे. प्रत्येक नामागणिक त्याचा अवतार आहे, आणि त्याची कास धरणे, म्हणजेच नाम घेणे, हे आमचे आजचे मुख्य कर्तव्य आहे. तेवढे केले की नाम आपले अवतारकार्य करून दाखवील. आपण आपले प्रेम प्रपंचाकडे लावले आहे, ते नामाकडे लावावे, म्हणजे नामस्मरणात फार आनंद येईल. मनाला नामाची चटक लागली आणि नामाच्या प्रेमातच मन रंगून गेले म्हणजे जन्म सफल झाला.