१ सप्टेंबर
आपले ज्ञान हे देहबुद्धीचे.
प्रापंचिक लोक म्हणतात की, विषयाचा अनुभव तात्काळ येतो, पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे. हे त्यांचे म्हणणे मला पटते. प्रापंचिक लोक प्रपंच सोडीत नाहीत याचे मला नवल वाटत नाही, पण ते सुख चिरकाल टिकणारे आहे ही समजूत करून घेऊन त्यामध्ये रमतात, याचे मला वाईट वाटते. मी असे म्हणतो की, तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरे आहे तेवढेच तुम्ही खरे माना, पण ते तुम्ही करीत नाही. भगवंताचा आनंद मिळाला नाही तर हरकत नाही, पण कायम टिकणारे सुख विषयामध्ये नाही एवढी जरी खात्री झाली तरी पुष्कळ काम होईल. त्यामधूनच भगवंताचा आनंद उत्पन्न होईल. भगवंताचा आनंद बाहेरून आणायचा नसून तो आपल्यामधेच उत्पन्न होणारा आहे.
सध्याच्या सुधारणेने देहाचे सुख पुष्कळ वाढविण्याचा प्रयत्न केला, पण ते शेवटी दु:खालाच कारण झाले. समजा, देहाचे पुष्कळ सुख समोर आहे, पण ते भोगण्याची जर आपल्याला शारीरिक शक्ती अथवा सांपत्तिक सुबत्ता नसेल तर त्याच्या प्राप्तीमुळेसुद्धा दु:खच पदरात पडेल. सगळ्यांना सगळे सुख मिळणे केव्हाच शक्य नसल्यामुळे प्रत्येकजण धडपड करून शेवटी दु:खीच राहतो. सुख आणि दु:ख ही दोन्ही वस्तुत: उत्पन्न झालीच नाहीत. ती आपण आपल्या भ्रमाने उत्पन्न केली आहेत. मनाच्या सुलट झाले की सुख होते, आणि मनाच्या उलट झाले की दु:ख होते. मुळात सुखही नाही आणि दु:खही नाही. ‘ मी देही ’ ही भावना जोपर्यंत आहे, तोपर्यंत अनुभवाच्या बरोबर भ्रम हा असायचाच. सृष्टी ही आनंदमय असूनही तशी ती आपल्याला दिसत नाही, हा आपला भ्रम आहे; त्या भ्रमाचे मूळ आपल्या आतमध्ये आहे. भगवंत तिथे माया, काया तिथे छाया, हे जसे खरे, त्याप्रमाणे अनुभव तिथे भ्रम असायचाच हा नियम आहे. पाचजण मिळून प्रपंच बनतो. त्यांमध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो; मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे?
एका गावाहून दुसऱ्या गावी बदली झालेला मनुष्य आता दोनतीन वर्षे तरी निदान आपली बदली होत नाही म्हणून निश्चिंत असतो. या प्रपंचामध्ये आपली आयुष्याची तितकीसुद्धा निश्चिंती नाही. याकरिता, आपण आयुष्याचा एक क्षणसुद्धा फुकट न घालविता सत्कर्मांत, म्हणजेच भगवंताच्या अनुसंधानात व्यतीत करावा. आपला शत्रू भेटून त्याच्याशी भांडण झाल्यामुळे गाडी चुकली काय, किंवा कोणी मित्र भेटून त्याच्याशी प्रेमाने बोलण्यात गाडी चुकली काय, दोन्ही सारखेच. त्याप्रमाणे प्रपंचामध्ये आघात झाल्यामुळे भगवंताला विसरले काय, आणि प्रपंच अत्यंत अनुकूल असून त्यामध्ये गुंतून राहिल्यामुळे भगवंताला विसरले काय, दोन्ही सारखेच; नुकसान एकच.