२६ ऑक्टोबर

भगवत्कृपेचा लोंढा म्हणजे काय ?

कोणतेही बी पेरताना ते अत्यंत शुद्ध असावे; म्हणजे किडलेले किंवा सडलेले नसावे. भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही फळाच्या हेतूने केलेली भक्ती ही सडलेल्या बीजासारखी आहे. आता, सुरुवातीलाच उत्तम बी पैदा होईल असे नाही, परंतु प्रयत्नाने ते साधता येते. पुष्कळ वेळा काही तरी ऐहिक सुखाच्या इच्छेने मनुष्य भक्ती करायला लागतो; म्हणजे त्यावेळी तो सडके बी पेरीत असतो. प्रारंभी अशा तऱ्हेचे काही तरी निमित्त होतच असते, परंतु थोड्याशा विचाराने, शुद्ध बीजाची पेरणी होणे जरूर आहे असे चित्ताला पटते. भगवंताची तशी अनन्य भावाने प्रार्थना करावी. पाऊस पडणे वा न पडणे ही गोष्ट सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन आहे, आणि तो यथाकाळ पाडतोही. असे पाहा की, एखादे शेत खोलात असले की त्यात पाणी इतके साचते की, ते जर बाहेर काढून लावले नाही तर सबंध पीक कुजून जाते. त्याच अर्थाने भगवंताच्या कृपेचा लोंढा जर जोराचा असला तर बंधारा फोडून तो बाहेर सोडणेच जरूर असते. असे करण्यात दोन्हींकडून फायदा असतो. एक म्हणजे शेतात जास्त झालेले पाणी बाहेर काढून लावल्याने शेतातले पीक न कुजता शेत उत्तम वाढते; आणि दुसरे म्हणजे, ते बाहेर घालविलेले पाणी आजूबाजूच्या शेतात पसरून तिथलेही पीक वाढवायला मदत होते. बंधारा फोडून पाणी बाहेर लावणे याचेच नाव परोपकार. साधकाची जशी प्रगती होत जाईल त्याप्रमाणे मध्यंतरी सिद्धी प्राप्त होऊन, बोललेले खरे होणे, दुसऱ्याच्या मनातले समजणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अदृश्य गतीने जाणे, इत्यादि प्रकार घडू लागतात. अशा वेळी मोहाला बळी न पडता, त्यांचा उपयोग स्वार्थाकडे न होईल अशी खबरदारी घेणे जरूर असते. उपयोग करायचाच झाला तर दुसऱ्याचे काम करण्यात, परोपकारांत व्हावा; यालाच बांध फोडून पाणी बाहेर लावणे असे म्हणता येईल.

शहाण्या माणसाने आपले सुख बाहेरच्या वस्तूवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा. बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणे अवश्य असते. अशी वस्तू म्हणजे भगवंत होय. भगवंत हा नेहमी राहणारा, स्वयंपूर्ण, आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात. अर्थात् मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाला जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी. मी त्याचा आहे आणि हे सर्व त्याचे आहे अशी सारखी जाणीव पाहिजे. किती आनंद आहे त्यात !

३००. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल.