२३ ऑक्टोबर

तुम्ही नाम घ्यायला लागा, भगवंताचे प्रेम येईलच.

ज्या माणसाला आपला स्वार्थ साधायचा नाही, त्याला कमी पडणे शक्यच नाही. जिथे नि:स्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही. जो भगवंताच्या प्रेमात तल्लीन झाला, त्याला बाकीच्या गोष्टींची आठवण राहात नाही. ज्याप्रमाणे मालक घरात आला की चोर पळालाच म्हणून समजा, त्याचप्रमाणे जो भगवंताच्या प्रेमात रमला, तो खात्रीने सुखी बनला; कारण त्याची देहबुद्धी पळून जाते. म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे, की त्याच्या डोळ्यांत पाणी यावे. आळवताना आपल्या डोळ्यांत पाणी आले की भगवंताच्या डोळ्यांत पाणी येते.

भगवंताचे प्रेम लागायला सत्संगतीचा मार्ग अतिशय उत्तम आहे यात शंकाच नाही. परंतु सत्संगती सर्वांनाच मिळेल असे काही निश्चयाने सांगता येणार नाही. दुसरा मार्ग विचाराचा आहे. नेहमी चांगले आणि पवित्र विचार मनात बाळगावेत. भगवंताने सर्वांवर कृपा करावी, त्याने सर्वांचे कल्याण करावे, त्याचे प्रेम सर्वांना यावे, असे विचार नेहमी मनात ठेवून संतांच्या विचारांचे मनन करावे. सर्वांचे कल्याण चिंतण्यात स्वत:चे कल्याण अनायासे होत असते. पण आपण असे पाहातो की, आपले विचारसुद्धा नेहमी स्थिर राहात नाहीत. नामस्मरणाला बसल्यानंतरसुद्धा किती अपवित्र विचार आपल्या मनात येत असतात, याचा सर्वांना अनुभव आहे ना ? तेव्हा चांगले विचार मनात बाळगणे हेही आपल्या हातात नाही. आता तिसरा मार्ग म्हणजे नाम. नाम हे एकच साधन असे आहे की, आपल्याला ते प्रयत्नाने घेता येईल. ते नाम तुम्ही सर्वांनी नि:शंकपणे घ्या. त्या नामाच्या विरुद्ध तुम्हाला कुणीही काहीही सांगितले तरी त्याचे ऐकू नका. ते नाम कसे घ्यावे वगैरे चिकित्सेत तुम्ही पडू नका. तुम्ही नाम घ्यायला लागा, भगवंताचे प्रेम तुम्हाला आल्याशिवाय रहाणार नाही. अगदी सतत निश्चयाने नाम घ्या. जिथे नाम तिथे माझा राम आहे, हा माझा विश्वास तुम्ही बाळगा. दुसरे काही एक न करता सतत निश्चयाने नामात राहाणाऱ्या माणसाला संतांची भेट होऊन ते त्याचे कल्याण करतील. भगवंताचे नाम ही ठिणगी आहे. ती फुलवली तर सबंध जग भरून जाईल एवढी मोठी होऊ शकते. ही नामाची ठिणगी आपण सतत जागृत ठेवू या. जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला आणि दैन्यपणा संपला. ते नाम तुम्ही सर्वांनी मनापासून घ्या, आणि सर्वांनी अगदी आनंदात राहून सुखाने संसार करा.

२९७. विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल. मग आपले कर्तेपण आपोआप मरून जाईल.