२४ ऑगस्ट
जेथे संत तेथे आनंद व समाधान असणारच.
काही संत वरून अज्ञानी दिसतात पण अंतरंगी ज्ञानी असतात. खरोखर, संतांची बाह्यांगावरून पुष्कळदा ओळख पटत नाही. संतांचे होऊन राहिल्याने, किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनात राहिल्यानेच त्यांना नीट ओळखता येईल. मनातले विषय काढून टाकले म्हणजे संतांची प्रचीती येईल. आपले दोष जोपर्यंत नाहीसे होत नाहीत, किंवा लोकांचे दोष दिसणे जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत संतांची पूर्ण ओळख आपल्याला होणार नाही. संतांचे दोष दिसणे, म्हणजे आपलेच दोष बाहेर काढून दाखविण्यासारखे आहे. संत हा हिरव्या चाफ्याच्या फुलाप्रमाणे असतो : सुंदर वास तर येतो, पण हिरव्या पानांत ते फूल शोधून काढता येत नाही. त्याप्रमाणे जिथे संत आहे तिथे आनंद आणि समाधान असते, पण तो सामान्य माणसासारखाच वागत आणि दिसत असल्यामुळे आपल्याला ओळखता येत नाही. वेदान्त आपण नुसता लोकांना सांगतो, पण संत तो स्वत: आचरणात आणतात. त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाहीत. संत हे नि:संशय असतात तर आपण संशयात असतो. त्यामुळे त्यांना समाधान मिळते, तर आपल्या पदरात असमाधान पडते. संशय नाहीसा करायला आपली वृत्ती बदलली पाहिजे.
संतांना जे आवडते ते आपल्याला आवडणे म्हणजेच त्यांचा समागम करणे होय. ‘मी करतो’ हे बंधनाला कारण असते; ते नाहीसे करणे म्हणजे ‘ गुरूचे होणे ’ समजावे. कधी चुकतो आणि कधी बरोबर असतो, तो साधक समजावा, आणि जो नेहमी बरोबर असतो तो सिद्ध समजावा. नुसते इंद्रियदमन हे सर्वस्व मानू नये; ते ज्याच्याकरिता आहे, त्याचे अनुसंधान पाहिजे. ज्याला काहीतरी करण्याची सवय आहे, त्याने काही काळ मुळीच काही करू नये, आणि नंतर भगवंताचे अनुसंधान ठेवायला शिकावे. आपण परीक्षा एकदा नापास झालो तर पुन्हा परीक्षेला बसतो, पण भगवंताचे अनुसंधान ठेवण्यात एकदा प्रयत्न करून यश आले नाही तर ते मात्र आपण सोडून देतो, हे बरे नाही. देवाचे बोलणे हे बापाच्या बोलण्यासारखे आहे; त्याच्याजवळ तडजोड नाही. पण संत हे आईसारखे आहेत, आणि आईपाशी नेहमीच तडजोड असते.
जो भगवंताविषयी सांगेल तोच संत खरा. संत जो बोध सांगतात त्याचे आपण थोडेतरी आचरण करू या. भगवंताचे अधिष्ठान ठेवून प्रत्येक कर्म करावे. जिथे भगवंताचे स्मरण तिथे माया नाही; जिथे माया, अभिमान आहे, तिथे भगवंत नाही. दानाचेही महत्त्व आहे. पैसा आणून गळ्यापाशी बांधला तर तो बुडवील; त्याचे यथायोग्य दान केले तर तो तारील. भगवंतच खरा श्रीमंत दाता आहे; तो श्रीमंतांचा श्रीमंत आहे. त्याचेच होऊन आपण राहिलो तर तो आपल्याला दीनवाणे कसा ठेवील?