१२ ऑक्टोबर
वृत्ति भगवंतमय होणे याचेच नाव भक्ति.
भगवंतापासून पंचमहाभूते निर्माण झाली; आणि तसे बघितले तर सर्व चमत्कार भगवंताच्या सामर्थ्याने पंचमहाभूतांचेच असतात. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. भगवंत हा जगाचा मालक आहे. त्याच्या सत्तेने सर्व व्यवहार घडतात. आपण जीव त्याचा अंश आहोत. म्हणून आपण कर्तव्य करावे, आणि फळ भगवंताच्या इच्छेवर सोपवावे. आता प्रश्न असा आहे की, सर्व गोष्टी जर भगवंताच्या इच्छेने घडतात, तर माझी इच्छाही भगवंतच उत्पन्न करतो; आणि असे जर आहे तर मी माझी इच्छा का मारावी ? अगदी बरोबर आहे. रात्री अंधार पडतो त्याला कारण कोण ? त्याला कारण सूर्य ! कारण सूर्य मावळला की अंधार पडतो. याचा अर्थ असा की, ज्याप्रमाणे प्रकाशाचे कारण सूर्य आहे त्याचप्रमाणे अंधाराचे कारण पण सूर्यच आहे; फरक इतकाच की, प्रकाशाचे कारण तो असणेपणाने आहे, आणि अंधाराचे कारण तो नसणेपणाने आहे. हे जसे खरे, तसे माझ्या इच्छेचे कारणसुद्धा भगवंतच आहे, पण तो नसणेपणाने कारण आहे इतकेच. सारांश, भगवंताचा विसर पडला की माझी इच्छा जन्म पावते. म्हणून, ज्याला भगवंत हवा असेल त्याने त्याचे स्मरण करावे आणि आपली इच्छा त्याला अर्पण करावी.
आपली देहबुद्धी नष्ट झाली की भगवंत ओळखता येतो. ज्याप्रमाणे इमारतीचा नकाशा कागदावर असतो, त्याचप्रमाणे सगुणमूर्ती हेच आपले परब्रह्म. एकदा नकाशा पक्का झाल्यावर मग इमारत बांधणे जड जात नाही. सगुणमूर्तीचे ध्यान करावे. ‘ब्रह्म निराकार आहे, त्याला आकारात आणणे ही चूक आहे,’ असे कुणी कुणी म्हणतात. पण मी स्वत: जिथपर्यंत आकारात आहे तोपर्यंत सगुणमूर्तीचे पूजन आवश्यकच आहे. ‘ मी रामाचा आहे ’ म्हणणे म्हणजे ‘ मी ब्रह्म आहे ’ असे म्हणणे होय. तदाकार वृत्ती होणे याचे नाव अनुसंधान; आणि अनुसंधानाने वृत्ती भगवंतमय होणे याचे नाव भक्ती. ‘ब्रह्म सत्य आणि जग मिथ्या’ याचा थोडक्यात अर्थ म्हणजे ‘ जग जसे आहे असे आपण समजतो तसे ते नाही. ’ अंतर्बाह्य परमात्मा दिसू लागणे हेच भक्तीचे लक्षण आहे. याकरिता, आपल्या कृतीकडे भगवंत पाहतो ही जाणीव नेहमी कायम ठेवावी. भगवंतापासून मी दूर आहे ही भावनाच मनात आणू नये. भगवंताच्या प्राप्तीकरता देहाचा सांभाळ करावा. मन रामाकडे गुंतलेले असले म्हणजे देहाचा विसर पडतो. म्हणून नामस्मरणाच्या योगाने मन भगवंताच्या ठिकाणी विलीन करावे. हेच परमार्थाचे सर्व सार आहे.