३१ जुलै

आपण भगवंताचे झालो तरच सुखी होऊ.

आपल्याला साधायचे काय हे ध्यानात धरले पाहिजे. परमात्मा साधायचा आहे, आणि शरीर आणि प्रपंच ही साधने आहेत, हे पक्के समजावे. आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो, म्हणून आपले चुकते. एका गृहस्थाला मुलाबाळांसह मुंबईला जायचे होते. आता आगगाडीत बसायला मिळेल या आनंदात मुले गाडीत बसली, पण मुंबईस जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला. गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटले, त्या गृहस्थाला नाही तसे वाटले.

वसिष्ठांनी रामाला सांगितले की, “ रामा, तू प्रपंचात वागताना अंतर्यामी नि:संग रहा. ” ‘ मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे, नि:संग आहे, ’ ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा. जमीन सोडून कुणाला राहाता येत नाही, त्याप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही. पण त्यात ‘राम कर्ता’ मानून वागणारा तो पारमार्थिक, ‘ मी कर्ता ’ असे मानून वागणारा तो प्रापंचिक. ‘ मी कर्ता ’ असे म्हणूनही जर प्रपंच दु:खरूप राहतो, सुखरूप होत नाही, तर त्याचा कर्ता मी नाही हे सिद्धच झाले ! प्रपंच हा अर्धवटच आहे, पूर्ण फक्त राम आहे. मिठाचे पोते कितीही धुतले तरी त्याचा खारटपणा जात नाही, तसे प्रपंचाचे आहे. म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असे साधन जे नामस्मरण, ते अखंड करावे. प्रपंचात आपण किती कष्ट करतो ! तितका मोबदला मिळत नाही, तरीही कष्ट करतो. परमार्थात तसे नाही. परमार्थ जितकाजितका करावा तितकेतितके समाधान अधिकाधिक असते. आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्युसमयीही प्रपंचच आठवेल. म्हणून प्रपंचाचा हव्यास धरू नये. प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून, त्यांच्याबाबत अलिप्तपणाने वागावे. ही वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार विचाराने वाढवावी. प्रपंचात, प्राप्त झाले त्याचा हर्ष न करावा, गेल्याचा शोक न करावा. देह प्रारब्धावर टाकावा. हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती आहे : आपण रामाचे व्हावे. राम ठेवील तसे समाधानाने राहावे. हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे; तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळे व्हावे.

सर्व ईश्वराचे आहे, माझे काही नाही, असे समजणे म्हणजे ईश्वरार्पण करणे आहे. आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ, नाहीतर दु:खी होऊ. धान्यातले दगड, माती, पाकड, निवडून बाजूला काढून, धान्य जे सार, ते घ्यावे; त्याचप्रमाणे, अहंकाराचे खडे, ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड, आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दु:खरूप प्रपंच होतो. ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरेल ते सारे सुखच !

२१३. 'रामा, सर्व तुझेच आहे, तू देशील ते घेईन.' अशी भावना ठेवावी. यानेच अत्यंत समाधान होते.