२ ऑगस्ट
आपल्या 'मी'चे स्वरूप आनंदमय आहे.
इच्छित वस्तू मिळणे यात समाधान असतेच असे नाही. ती इच्छाच नाहीशी करणे यात समाधान आहे. हाव संपेल तेव्हाच समाधान होईल. याकरिता वासनाक्षय कशाने होईल ते पाहावे. कशात सुख आहे, कशाची कास धरावी, इकडे लक्ष द्यावे. खरा आनंद आणि समाधान भगवंताचे होण्यातच आहे. ‘ भगवंता, तुझ्यावाचून माझे कोणी नाही ’ हे ज्या दिवशी मनाने पक्के ठरेल, त्याच दिवशी समाधान मिळेल. जितकी विषयाची आवड धरावी, तितके दु:खच पदरात येते. विषयसुख न मागताही येते; परंतु जे परमार्थाच्या आड येणार आहे, ते मागत कशाला राहायचे ? माझ्या मागे राम आहे म्हटले, म्हणजे प्रपंचातल्या विषयात जरी राहिलो तरी भिण्याचे कारण नाही. भगवंताचा आधार कायम ठेवला की मग विषयांची नाही भीती वाटत. नेहमी अनुसंधानात राहिले म्हणजे मग ‘ सावधच ’ राहिल्यासारखे आहे.
दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो, पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसांसारखाच असतो. इतकेच नव्हे, तर आदल्या दिवसाची परिस्थिती, संकटे आणि अडचणी त्या दिवशीही कायम असतात. याचा अर्थ असा की, परिस्थितीत बदल होत नाही. दिवाळीचा दिवस, हा दिवस या नात्याने निराळा नाही. पण काल आपण जे केले, ते दिवाळीच्या दिवशी आपण करीत नाही, हाच मुख्य फरक होय. आपणच दिवाळीच्या दिवसाला आनंदाचा दिवस करतो. हे जर खरे, तर तसा तो आपण नेहमीच का करू नये ? आपल्याला नेहमीच दिवाळी असावी; आपण नेहमीच आनंदात असावे; आणि त्याकरिता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा. आपण दिवाळीच्या सणाचा आधार घेऊन आनंदी-आनंद करतो. मग आनंद जो निर्माण करतो त्या भगवंताच्याच आश्रयाला नेहमी का न जावे ? भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचे महत्त्व वाटत नाही. भगवंताचे स्वरूपच मुळी आनंदमय आहे. असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दु:ख भोगतो याला कारण, भगवंताला प्रकट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आडकाठी करीत असतो. आपल्या आतमध्ये भगवंत तर आहेच, पण त्याचबरोबर ‘ मी ’ सुद्धा आहे. हा ‘ मी ’ कोण हे जाणण्याकरिता, इंद्रियांची गडबड शांत करून आतमध्ये आपण आनंदाचा शोध करावा; म्हणजे आपल्याला या ‘ मी ’ चे स्वरूपही आनंदमय असल्याचे प्रत्ययाला येईल. अशी परमात्म्याची ओळख करून घेणे ही खरी जीवनाची सुरुवात आहे; आणि परमात्म्यात विलीन होणे हेच जीवनाचे सर्वस्व होय.