२० जुलै
नामांतच राहे समाधान । ही सद्गुरूची आहे खूण ॥
रामापायीं ठेवावें मन । त्यासी कर्तव्य नाहीं उरलें जाण ॥ देहभोग आजवरी नाहीं सुटला कोणाला । त्याचा त्रास मात्र नाहीं रामभक्ताला ॥ तुम्हांला आतां करण्याचेंच नाहीं कांहीं । भाव ठेवा रामापायीं ॥ नामांतच राहे समाधान । ही सद्गुरूची आहे खूण ॥ रामास जावें अनन्य शरण । कृपा करील तो दयाघन । देह सोडावा प्रारब्धावर । ज्या ज्या वेळीं जें जें होईल तो मानावा आनंद ॥ दृश्यातें नाहीं मानूं सत्य । रामरूपीं ठेवावें चित्त ॥ विषयासी नाहीं देऊं थारा । दया येईल रघुवीरा ॥ नाहीं देवाजवळ मागूं दुजें जाण । तुमचे नामीं लागो मन । ऐसें प्रार्थिता जो झाला । राम कृपा करील त्याला ॥ नाहीं भंगूं द्यावें समाधान । रामापायीं ठेवावें मन ॥ लोभ्याच्या मनात जसें वित्त । तसें साधकाचें नामांत चित्त ॥ एवढें ज्यानें केलें काम । त्याला नाहीं रामाचा वियोग ॥ पाण्यावाचून जसा मासा तळमळतो । तसें नामाशिवाय व्हावें मन॥ एक मानावी आज्ञा प्रमाण । नाहीं याहून दुसरें साधन जाण ॥ साधनाच्या आटाआटी । नाहीं देह करू कष्टी ॥ रामावाचूंन नाहीं कोणी सखा । त्याला नाहीं कोठें धोका ॥
प्रपंचीं ज्याचा राम सखा । भय चिंता दु:ख नाहीं देखा ॥ रामसेवेपरतें हित । सत्य सत्य नाहीं या जगांत ॥ मनानें होऊन जावें भगवंताचें । त्यानें खास केलें सार्थक जन्माचें । सर्व कर्ता राम । हा भरवसा ठेवावा ठाम ॥ राम कर्ता हा ठेवितां विश्वास । काळजीचें कारण उरत नाहीं खास ॥ रामरायाचें सान्निध्य राखता। भय, चिंता, शोक, यांची नाही वार्ता ॥ सतत करावें नामस्मरण । सर्व इच्छा राम करील पूर्ण ॥ नामाचें चिंतन, भगवंताचें ध्यान, गुरुआज्ञा प्रमाण । तीच गुरुपुत्राची आहे खूण । नाहीं यावांचून दुसरें स्थान। जिथें राहे समाधान ॥ रामापायीं व्हावें लीन । याहून नाहीं दुसरें लिहिणें जाण ॥ आतां याहून दुजे नाही करणें काहीं । असा भाव ज्यानें ठेविला हृदयीं । त्याला राम नाहीं राहिला दूर ॥ नामाविण न मानावे हित। त्यानेंच जोडेल भगवंत ॥ नाहीं करूं देहाचा कंटाळा । राम ठेवील त्यांत राहावें सदा । जे जे होतील देहाचे हाल । ते ते परमात्म्यापासून आले असें जाणावें ॥ नाहीं करूं काळजीला । मी नाहीं सोडलें तुम्हांला ॥ ज्याची वाटते महति । त्याचेंच चिंतन होय चित्तीं । रामावांचून न ठेवा दुजा भाव । चित्तास येईल तेथेंच ठाव ॥ देहासकट माझा प्रपंच जाण । हा रामा तुला अर्पण । ऐसें वाटत जाणें चित्तीं । कृपा करील रघुपति ॥ सर्व ठिकाणीं पाहावें रामाचें अधिष्ठान । तेणें मिळेल मनास समाधान ॥