८ जुलै

भगवंताचे अनुसंधान कसे ठेवावे ?

ज्या गोष्टीचे अत्यंत प्रेम आहे तिचे अनुसंधान मनुष्याला आपोआप राहते. ते इतके टिकते की ते अनुसंधान मला आहे ही जाणीवही राहत नाही. ‘ अनुसंधान ठेवतो ’ असे म्हणताना ‘ मी ’ त्याच्याहून वेगळा असतो; आणि प्रेमाचे जे अनुसंधान असते तिथे मी एकजीवच होतो. आपण कितीही गडबडीत असलो तरी वाटेने जात असताना आपल्या नावाने कुणी हाक मारली की आपण वळून पाहतो. हे आपले अनुसंधान आहे; कारण या देहावर आपले इतके काही प्रेम आहे, की मी त्याच्याहून वेगळा नाहीच ! असे देहाचे अनुसंधान कसे ठेवावे हे सांगावे लागत नाही. ‘ देहाचा विसर पाडा ’ म्हणून सांगावे लागते, ‘देहाचे स्मरण ठेवा ’ म्हणून नाही सांगावे लागत !

आम्हांला भगवंताचे अनुसंधान ठेवायचे आहे. हा एक प्रकारचा अभ्यास आहे. भगवंताचे प्रेम वाढले तर अनुसंधान टिकेल. परीक्षा पास होण्याकरिता जसा अभ्यास करावा लागतो तसा भगवंताचे प्रेम वाढविण्याकरिता अभ्यास करणे जरूर आहे. यासाठी, जे जे काही मी करीन ते ते मी भगवंताच्या साक्षित्वाने करतो आहे ही जाणीव ठेवून करायला पाहिजे. आज आम्हांला नाना तऱ्हेचे उद्योग करावे लागतात. प्रपंच म्हटला म्हणजे किती गोष्टी कराव्या लागतात ! त्या सगळ्या गोष्टी करीत असताना भगवंताचे स्मरण ठेवून करणे, हे आपले खरे कर्तव्य आहे.

सर्कशीमध्ये आपण पाहतो ना ! वाघ, सिंह, घोडे, हत्ती काय जे प्राणी असतील ते खेळ खेळतात. घोडा कसा सुंदर नाचतो असे आपण म्हणतो ! पण त्या घोड्याचे लक्ष प्रेक्षकांकडे नसते. त्या घोड्याचे, त्या वाघाचे, त्या सिंहाचे लक्ष आतमध्ये चाबूक उगारणारा जो मनुष्य असतो त्याच्याकडे असते ना ? प्रेक्षक काय म्हणतील ते तो प्राणी पाहत नाही. आणि आपण काय करतो ? भगवंत काय म्हणेल हे पाहतच नाही, जग काय म्हणेल हे पाहतो ! हे जर आम्ही सोडले ना, तर भगवंताला काय हवे आहे हे आम्हाला बरोबर कळेल. भगवंताचे स्मरण ठेवून कर्म केल्याने त्याला काय हवे तेच आमच्या हातून घडेल. त्याचे संधान न सोडता कर्म करणे हे अनुसंधानाचे लक्षण आहे. हे कशाने होईल ? अत्यंत प्रेमाने होईलच.

एक बाई नुकतीच बाळंत होऊन सासरी आल्यावर तिने मूल पाळण्यात निजविले, आणि मागच्या परसामध्ये ती भांडी घाशीत होती. ते मूल थोडेसे कुठे रडले. घरात पुष्कळ माणसे होती, कुणाला ऐकू नाही गेले. ती पोरगी मात्र धावत पाळण्यापाशी आली, आणि ‘ मूल उठलेले दिसते आहे ’ असे म्हणाली. काम करताना तिचे कान जसे पाळण्याकडे होते, तसे प्रपंच करताना आपले लक्ष मात्र भगवंताकडे असले पाहिजे. याचे नाव अनुसंधान !

१९०. अखंड मुखी रामनाम, आत असावे अनुसंधान, देहाने करावे प्रपंचाचे काम.