५ नोव्हेंबर

भगवंत हाच एकमेव आधार वाटला पाहिजे.

एक भगवंत सत्य आहे. आपले कुठे चुकत असेल तर ते हेच की, आम्ही प्रपंच सत्य मानतो. फणस कापायला ज्याप्रमाणे हाताला तेल लावावे लागते त्याप्रमाणे, राजकारण घ्या, किंवा प्रपंच घ्या, हरिप्रेमाचे तेल आधी हाताला लावावे. समर्थांनी ‘ मुख्य हरिकथानिरूपण ’ असे सांगितले; म्हणजे बाकीच्या गोष्टी आपोआप मागे येतील. आम्ही कर्तेपण मिरवू पाहतो इथेच सर्व बिघडते. हरीचे अधिष्ठान ठेवण्याआधी आम्ही आपल्या कर्तेपणाचेच अधिष्ठान ठेवतो. लग्नाच्या आधी देवाला नमस्कार करतो, पण पुढे प्रपंचात देवाला विसरतो, हे चुकते. नुसते विषय घातुक नाहीत; त्यांच्यात आम्ही आपल्या आवडीने जीव घालतो हे घातक आहे, विषयाच्या ताब्यात जाणे घातुक आहे. इमारत मोठी करावी, कळस सुंदर, सोन्याचा करावा म्हटले, पण पायाच जर चांगला नाही घातला तर देऊळ कसे टिकावे ?

अमुक एका कार्याला कुणाची मदत नको म्हटले, तर आपण जे म्हणू ते व्हायला पाहिजे. ते होत नाही. तेव्हा मदत कोणाची तरी घ्यायचीच, तर मग आपल्यासारख्या बुडत्याचीच घेऊन काय उपयोग ? भगवंताचीच घेतली पाहिजे. आम्ही जर भगवंताजवळ विषय मागितले तर त्याचे फळही घ्यावे लागेल. दुर्योधन आणि अर्जुन भगवंताची मदत मागायला आले. एवढे सैन्य सोडले आणि अर्जुनाने भगवंताला मागितले. दुर्योधनाने जे मागितले तेच नाही का आम्ही आज प्रपंचात मागत ? आमचे कार्याकडे लक्षच नसते, सर्व लौकिकाकडेच असते. ‘ मी दुसऱ्या कशाचाही नाही ’ असे म्हटले म्हणजे भगवंताला अनन्य शरण होता येते. ‘ परमात्मा हवा ’ ही नाही आम्ही जाणीव करून घेत, ‘ जग हवे ’ असे म्हणतो; आणि तिकडे, सर्व जग मला नावे ठेवते असेही म्हणतो ! मी म्हणतो, जगाला नावे ठेवू द्या, पण राम काय म्हणतो इकडे पाहणे जरूर आहे. आपण परमेश्वराचे परमेश्वरालाच दिले तर कुठे बिघडले ? जो दिसत नाही, भासत नाही, त्याचे हे सर्व आहे असे म्हणण्यात कुठे बिघडते ? ते म्हणण्यात जे समाधान मिळते ते नाही आम्हाला समजत. खरोखर परमात्मा साक्षात् कल्पवृक्ष आहे. आपण नेहमी चिंता वाहतो, म्हणून तो आपल्याला चिंताच देतो. आपण जर त्याच्याकडे आनंद मागितला तर तो आपल्याला आनंदच देईल. भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचे महत्त्व नाही.

राम हा त्रैलोक्याचा स्वामी आहे, आपण त्याचे सेवक आहोत. पण आम्ही नोकरी दुसऱ्याची करतो आणि पगार मात्र रामाजवळ मागतो ! तसे करू नये, खरे-खुरेच रामाचे दास व्हावे. ज्ञान, योग, प्राणायाम वगैरे भगवंतावाचून येऊ शकेल, पण भक्ती मात्र भगवंतावाचून येणार नाही. भक्ती ही भगवंताची देणगी आहे.

३१०. प्रपंच करणे हा आपण स्वार्थ म्हणतो. पण तो खरा स्वार्थ नाही; खरा स्वार्थ भगवंताचे होण्यात आहे.